Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

महावितरणच्या सहायक अभियंत्यास पाचशे रूपये लाच घेताना अटक
पंढरपूर, २३ जुलै/वार्ताहर

पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील वगरे याच्या शेतीला वीज कनेक्शन देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता अरविंद धोंडिबा इंगळे यास सोलापूरचे लाचलुचपत उपअधीक्षक संजय ताठे व त्यांचे सहकारी यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकाराने वीज

 

कंपनीत खळबळ उडाली आहे.
तिसंगी येथे दत्तात्रेय बबन वगरे यांची जमीन असून शेतजमीनकरिता विजेचे कनेक्शन मिळावे या करता अर्ज केला होता. परंतु वीज वितरण कंपनी ग्रामीण विभाग १ चे सहायक अभियंता इंगळे यांनी कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ लावली. या प्रकाराने वगरे त्रासले होते. अखेर त्यांनी लाचलुचपत खात्याशी संपर्क केला.
वीज कंपनीच्या अधिकाऱ्यास जाळ्यात पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक विश्वास पांढरे, उपअधीक्षक फत्तेसिंह गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे उपअधीक्षक संजय ताठे, फौजदार संजय पोतनिस व सहकारी यांनी बुधवारी सायंकाळी वीज कंपनी कार्यालय गडम बिल्डींग येथे सापळा लावला आणि वगरे हे इंगळे यांना भेटण्यास गेले.
आत प्रवेश करताच त्यांना अधिकाऱ्यांनी इशारा करताच वगरेकडून पाचशे रुपयांची लाच घेताना इंगळे यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी इंगळे यांच्यावर रात्री उशिरा शहर पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने वीज कंपनीतील पैशाला चटावलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.