Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राधानगरी एसटी आगाराचा‘प्रवासी वाढवा’ अभियानात दुसरा क्रमांक
राधानगरी, २३ जुलै / वार्ताहर

सातत्याने होणाऱ्या तोटय़ामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असलेले राधानगरी एसटी आगार नफ्यात आले. प्रवासी भारमानासह उत्पन्नातही वाढ झाली असून, ‘प्रवासी वाढवा’ अभियानात पुणे

 

विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
राधानगरीसारख्या दुर्गम व डोंगराळ तालुक्याला आगार व्हावे ही मागणी वर्षांनुवर्षे लावून धरण्यात आली होती. १९९२ साली स्वतंत्र आगाराच्या माध्यमातून तालुक्यात एसटी धावू लागली. त्यामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच गावागावांत एसटीचे दर्शन होऊ लागले. सुरुवातीच्या दहा वर्षांत आगाराने चांगली कमाई करण्यासह काही काळ जिल्हय़ात अव्वल स्थानही पटकावले होते. मात्र त्यानंतर हळूहळू आगाराला घरघर लागली होती. वडापची वाढलेली दादागिरी, अपुरे कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे असणारा नियोजनाचा अभाव यामुळे आगाराला उतरती कळा लागली होती. आगाराचा तोटा वाढू लागल्याने ते बंद करण्याच्याही हालचाली सुरू होत्या.
मात्र तीन वर्षांपूर्वी येथे आगारप्रमुख म्हणून किरण कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी दूरदृष्टीने आगाराची गाडी मार्गावर आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले होते. तालुक्याच्या डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे एका फेरीत एका मार्गावर धावणारी गाडी रिकामीच धावते. त्याचा परिणाम भारमानावर होतो. म्हणून भारमान वाढवण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुरू करण्यात आल्या. मुंबईसाठी पाच, सोलापूर व पुणे प्रत्येकी तीन व पणजीसाठी एक गाडी वाढवली आहे. पूर्वी गाडय़ांचे प्रमाण स्थानिक साठ टक्के व लांब अंतराच्या चाळीस टक्के असे होते. मात्र उत्पन्नाची स्थिती उलटी म्हणजे स्थानिक चाळीस आणि लांबच्या साठ टक्के अशी होती. यातही बदल केला गेला. गतवर्षी गाडय़ांची एकूण धाव ५३.६३ लाख किमी होती ती यंदा ५६.६८ लाख किमी झाली. भारमान ५४.२३ टक्क्यांवरून ५६.६० टक्क्यांवर पोहोचले. उत्पन्न ८ कोटी ७५ लाख ८७ हजार वरून ९ कोटी ९१ लाख ८७ हजार पर्यंत पोहोचले. एकूण उत्पन्नाबरोबरच खर्चात वाढ झाल्याने एकत्रित तोटा २६ लाख रुपये झाला.
आगारात सध्या पन्नास गाडय़ा आहेत. त्यासाठी चालक-वाहकांच्या १३३ जोडय़ांची गरज आहे. मात्र ही संख्या अनुक्रमे १०७ व ११३ अशी आहे. जुन्या कर्मचाऱ्यांचा पगार जास्त होतो. त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. एकतीस आसनक्षमतेच्या दोन गाडय़ांसह एक एशियाड बसही आगारात दाखल झाली आहे. या गाडय़ांचे भारमान ७५ टक्के आहे. तोटय़ात जाणारे आगार सावरू लागले असले तरी तालुक्यात असणारे वडापचे जाळे अद्यापही मजबूत आहे. त्यामुळे एसटी नफ्यात आणण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे.