Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गणसंख्यापूर्ती न झाल्याने कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द
कोल्हापूर, २३ जुलै / प्रतिनिधी

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक महापालिकेमध्ये हजर होते. महापौर हे आपल्या केबिनमध्ये उपस्थित होते. नगरसचिव सभागृहात आपल्या खुर्चीवर बसले होते. काही महिला सदस्याही सभागृहात येऊन बसल्या होत्या. मात्र सभेचे कामकाज सुरू करण्याइतपत गणसंख्या नव्हती. त्यामुळे दुपारी दोन वाजता महापौर उदय साळोखे यांनी सभाच रद्द

 

करून टाकली. नगरसेवकांना विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भागातील विकास कामांसाठी प्रत्येक ५ लाख रुपयांचा निधी हवा होता आणि हा निधी देण्यास प्रशासनाने असमर्थता व्यक्त केल्याने बहुतांशी नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहाकडे पाठ फिरविली.
राज्य शासनाकडून महापालिकेसाठी विशेष अनुदान मिळालेले आहे. या अनुदानातून प्रभागातील विकास कामांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये द्यावेत असा आग्रह नगरसेवकांनी धरला होता. जोपर्यंत प्रशासनाकडून हा निधी देत असल्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहात येणार नाही अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली होती. त्यासाठी हे नगरसेवक सभागृहाऐवजी उपायुक्त गणेश देशमुख यांच्या कार्यालयात याच विषयावर चर्चा करण्यासाठी बसले होते. प्रशासनानेही असा निधी देण्यामागील तांत्रिक अडचणी या नगरसेवकांना सांगितल्या.त्यामुळे नाराज झालेले हे नगरसेवक महापालिकेच्या सभागृहाकडे फिरकले नाहीत. सभेच्या कामकाजाची वेळ होऊनही सभा चालू होत नाही, पदाधिकारी सभागृहात येत नाहीत, नगरसेवकही सभागृहाच्या बाहेरच आहेत म्हणून मग सभागृहातील काही महिला सदस्या निघून गेल्या. दुपारी दोन वाजेपर्यंत हा घोळ सुरू होता. शेवटी महापौर उदय साळोखे यांनी सर्वसाधारण सभाच गणसंख्यापूर्ती होत नाही म्हणून रद्द करून टाकली.