Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सांगली जि. प. अध्यक्षांना कर्मचाऱ्यांचा घेराव
सांगली, २३ जुलै / प्रतिनिधी

जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वाघमारे यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीचा आज गुरुवारी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला व लेखी माफी मागावी, अशी मागणी केली. जिल्हा

 

परिषद अध्यक्षा व उपाध्यक्ष यांना घेराव घालून याप्रकरणी जाब विचारण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे यांनी मिरज तालुक्यातील एरंडोली येथील आरोग्य केंद्रासाठी आलेला गतवर्षीचा निधी का खर्च केला नाही, अशी विचारणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वाघमारे यांना केली होती. हुळ्ळे यांनी एरंडोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला होता. परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यातील तीन लाख रुपयांचा निधी खर्च झाला नाही. तो जिल्हा परिषदेकडे जमा झाला व सन २००९-१० वर्षांसाठी पाच लाख मिळाले. परिणामी या आरोग्य केंद्रास तीन लाखांच्या निधीला मुकावे लागले, असा आरोप हुळ्ळे यांनी केला होता. यासंदर्भात आरोग्य अधिकारी डॉ. वाघमारे यांना आरोग्य सभापती श्रीमती कमल शिंदे यांच्या दालनात बोलवून हुळ्ळे यांनी जाब विचारला होता. वाघमारे यांनी विकासकामांवर निधी खर्च करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे सदस्यच आहेत. त्यांच्याकडे चौकशी करा, असे सांगितले. तेव्हा दोघांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. याचा परिणाम सर्व जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी यांनी कामावर बहिष्कार टाकून या गोष्टीचा निषेध केला व हुळ्ळे यांनी लेखी माफी मागावी, अशी मागणी केली. जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती कांचन पाटील व उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांना घेराव घालण्यात आला. अधिकाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकल्यामुळे आज होणारी स्थायी समितीची बैठक रद्द करण्यात आली.