Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बंद पतसंस्था व बँकांच्या ठेवीदारांचा मेळावा होणार
सांगली, २३ जुलै / प्रतिनिधी

सांगली जिल्हय़ातील बंद अवस्थेतील नागरी सहकारी बँका व पतसंस्थांच्या हजारो ठेवीदारांना राज्य शासनाने वाऱ्यावर सोडू नये, अशी मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे खादी ग्रामोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी सांगितले. तसेच या मागणीसाठी सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगली येथे लवकरच ठेवीदारांचा

 

एक मेळावा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगली महापालिका क्षेत्रातील नागरी सहकारी बँका व पतसंस्था बुडाल्याने हजारो ठेवीदारांचे कोटय़वधी रुपये ठेवीच्या रूपाने अडकून पडले आहेत. परंतु संस्थाचालक बेफिकिरीने वागत असून राज्य शासनही बघ्याची भूमिका घेत आहे. बँका व पतसंस्था डबघाईस आणणारे राजकारण करीत निवांत फिरत आहेत. त्यांना हात लावण्याची िहमत सहकार खात्याने दाखवावी, यासाठी आपण स्वस्थ न बसता ठेवीदारांचा हा प्रश्न लावून धरणार आहे. त्यासाठी सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगली येथे लवकरच ठेवीदारांचा मेळावा घेणार असून त्यात त्यांच्या ठेवी परत कधी मिळतील, याचे स्पष्टीकरण शासकीय अधिकाऱ्यांनी करावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ठेवीदारांचा लढा टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र करण्याचा इशाराही जाधव यांनी दिला.
सांगली महापालिकेच्या सांगली व कुपवाड शहरावर अन्याय करणारे अंदाजपत्रक तात्काळ बदला. अन्यथा, तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देऊन महापालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरांच्या समतोल विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. यंदाच्या अंदाजपत्रकात सांगली व कुपवाड शहरावर अन्याय झाला असून सांगलीच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधारी विकास महाआघाडीच्या महापौरांनी स्वत:च्या मिरज शहरासाठी अतिरिक्त निधी नेला आहे. मात्र त्यांना विरोध करण्याची हिंमत ना सत्ताधारी गटातील कोणाकडे आहे ना विरोधकांकडे आहे, अशी खंतही दिगंबर जाधव यांनी व्यक्त केली आहे.