Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘ऊसतोडणी, वाहतूक कामगारांसाठी, महामंडळासाठी लढा चालूच राहणार’
कोल्हापूर, २३ जुलै / प्रतिनिधी

राज्य साखर महासंघ, राज्य शासनाचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघ यांच्या त्रिपक्षीय बैठकीत ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठीचा नवा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला असला तरी माथाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या स्वतंत्र महामंडळाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

 

बुधवारी येथे झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आला.
नव्या सामंजस्य करारानुसार आगामी तीन हंगामांचे २० टक्के फरक बील २५ टक्के मजुरीवाढ आणि १७ टक्के कमीशन दिले जाणार आहे. या कराराच्या पाश्र्वभूमीवर ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने येथील केशवराव भोसले नाटय़गृहात विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी राज्याचे कार्याध्यक्ष कुमार शिराळकर होते.
ऊस तोडणी व वाहतूक कर्मचाऱ्यांचा संघर्ष गेल्या ९ वर्षांपासून सुरू आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी वगळता जिल्ह्य़ातील कोणीही आमदार अगर लोकप्रतिनिधींनी या संघर्षांची दखल घेतलेली नाही. भविष्यातही त्यांनी या संघर्षांकडे गांभीर्याने पाहिले नाही तर आागमी निवडणुकीत त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष जाधव यांनी दिला. जिल्ह्य़ामध्ये ३५ हजार कामगार आहेत. प्रत्येकाकडे चार मते धरल्यास हे मतदान दीड लाखाच्यावर जाते. याकडेही त्यांनी आमदारांचे लक्ष वेधले.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कुमार शिराळकर यांनी महाराष्ट्राचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाच्या कळीचा मुद्दा साखर उद्योग आहे. या उद्योगाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि ऊस तोडणी व वाहतूक कर्मचारी हे कणा आहेत. यात ऊस तोडणी व वाहतूक कर्मचारी सर्वाधिक दरिद्री आणि सर्वाधिक कष्ट करणारा आहे. या गरीब आणि उपेक्षित घटकाच्या विकासासाठी सर्वानी संघर्षांसाठी सज्ज रहावे असे आवाहन केले.
संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रंगराव पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य ए.बी.पाटील, कॉ.दत्ता माने, चंद्रकांत यादव, निखिल नारकर, आनंद पाटील, संतू पाटील, प्रा. राजेंद्र गुंडे, सुनील दंडवते आदी उपस्थित होते. या मेळाव्यात ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या जीवनावरील ‘ऊस डोंगा’ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत शिवाजी मगदूम यांनी केले. प्रा. आबासाहेब चौगुले यांनी प्रास्ताविक केले. दिनकर आदमापुरे यांनी आभार मानले.