Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापूर जिल्ह्य़ातील नद्यांच्या पाण्यात झपाटय़ाने घट
कोल्हापूर, २३ जुलै / प्रतिनिधी

पावसाचा जोर ओसरल्यानंतर जिल्ह्य़ातील पूरसदृश परिस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. नद्यांचे बंधाऱ्यांवरून वाहणारे पाणी नदीच्या पात्रात परतू लागले आहे. राजापूर बंधारा येथून सध्या ५८ हजार ९४५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर

 

कर्नाटकातील अलमट्टी
धरणातूनही ६४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ातील नद्यांचे पाणी झपाटय़ाने उतरू लागले आहे.
दरम्यान आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी ३०.३८ मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस राधानगरी तालुक्यात झाला असून तिथे १२५ मि.मी. पावसाची नोंद आहे. त्या खालोखाल चंदगड ६३, गगनबावडा ४२, भुदरगड ३२, पन्हाळा ३२, शाहूवाडी ३२ मि.मी. पावसाची नोंद आहे. इतर तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. आजतागायत राधानगरी तालुक्यात ३०२४ मि.मी., गगनबावडा तालुक्यात १९०१ मि.मी., चंदगड तालुक्यात १५९० मि.मी., आजरा तालुक्यात १०६६ मि.मी., भुदरगड तालुक्यात ८८९ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या आठवडय़ात जिल्ह्य़ातील सुमारे ९० गावांचा अंशत: संपर्क तुटला होता. सध्या या गावांची संख्या आठवर येऊन पोहोचली आहे. पन्हाळा तालुक्यातील दिघवडे, तिरपण, आळवे, ठाणे, तसेच राधानगरी तालुक्यातील राशिवडे, येळवडे, मोहर्डे, कोदवडे या गावांचा संपर्क अंशत: तुटला आहे.