Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सातारा जिल्हा युवक काँग्रेसची पाणीप्रश्नासाठी संघर्षयात्रा- रणजितसिंह देशमुख
सातारा, २३ जुलै / प्रतिनिधी

सातारा जिल्हा युवक काँग्रेस व शेतकरी संघटना दुष्काळी तालुक्यातील पाणीप्रश्नासाठी २६ जुलैपासून म्हसवड ते सातारा संघर्षयात्रा सुरू करण्यात येणार असल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष शंकरराव गोडसे

 

यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेलार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुभाषराव देशमुख, खटाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माण तालुक्याचे विष्णूअण्णा अवघडे, जिल्हा काँग्रेसचे खजिनदार बाबासाहेब कदम, जि.प. सदस्य मानाजीराव घाडगे, हिंदूराव पाटील, अविनाश धायगुडे, माजी जि.प. सदस्या विजयाताई बागल, किसनराव ननावरे यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले की, माण-खटाव दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या निहे-कठापूर, उरमोडी व टेंभू प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे, टेंभूची चाचणी सुरू झाली आहे. या प्रकल्पात माण तालुक्यातील शेनवडी, काळचौडी, विरळी, वळई, महाबळेश्वरवाडी, पालवण, जांभूळणी, बनगरवाडी, वरकुटे मलवडी, कापूसवाडी, कुर्णेवाडी, पळकोटी, शिरताव, गंगोत्री, पळसावडे, देवापूर आदी सोळा गावे टेंभू योजनेत समाविष्ट करून दिलेले आश्वासन पाळावे. तसेच मोगराळे, बिजवडी, राजवडी, पानवण, अनभुलेवाडी, यदाळे, शिंगणापूर, मोही, रंगीरेवाडी, वावरहिरे, खुरबाव, इंजबाव, पांगरी, वडगाव, सोकासन या गावांचा जिहे-कठापूर योजनेमध्ये समावेश करावा.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, गाई व म्हशीच्या दुधाच्या दरात भेदभाव न करता प्रतीफॅट चार रुपये दर मिळावा, उसाचा पहिला हप्ता विनाकपात १८०० रुपये देण्यात यावा, खतटंचाईच्या नावाखाली जिल्ह्य़ातील सर्व खत विक्रेते खत पोत्याबरोबर इतर अन्य खतद्रव्ये खरेदी करण्याची सक्ती करीत असल्याने शेतक ऱ्यांना दामदुपटीचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने यावर तातडीने उपाययोजना करून शेतक ऱ्यांची पिळवणूक थांबवावी, पाऊस उशिरा झाला, आता खतटंचाईमुळे शेतक ऱ्यांत असंतोष आहे.
दरोडे घाला - गोडसे
खासगीकरण करा, दरोडे घाला पण सिंचन प्रकल्पाची कामे करा. खासगीकरणाला आमचा विरोध नाही. सरकारला पैसा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे खासगीकरणाला पर्याय नाही, असे या वेळी शंकरराव गोडसे यांनी सांगितले. शेतकरी संघटना काँग्रेसबरोबर संघर्षांत उतरली आहे. सर्वच पक्षांना यात सामील होण्याचे आवाहन आहे. उदयनराजेंसह येईल त्या सर्वाचे या आंदोलनात स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.