Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘अखंडित वीजपुरवठा सुरू करावा’
फलटण, २३ जुलै / वार्ताहर

फलटण शहरातील विद्युत वाहिन्या भुयारी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब काढून टाकावेत. पाणीपुरवठय़ासाठी एक्स्प्रेस फिडरद्वारे अखंडित वीजपुरवठा सुरू करावा या मागणीचे निवेदन ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांना फलटण नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले.

 

राज्य वितरण कंपनीच्या लोणंद व सुरवडी येथे उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्राच्या भूमिपूजन व फलटण येथील वीज कंपनीच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी ऊर्जामंत्री सुनील तटकरे आले असता नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनामध्ये म्हटले आहे, की शहराचा शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक विकास झपाटय़ाने होत असून, अलिकडे नव्याने येत असलेल्या पाण्यामुळे आणि औद्योगिक विकासाच्या गतिमान प्रक्रियेमुळे शहराचा विकास व विस्तार झपाटय़ाने होत आहे. सुमारे ६० हजारांची लोकवस्ती औद्योगिक विकासामुळे वाढत आहे. त्याचबरोबर शेजारच्या ८० वाडय़ावस्त्यांवरील ग्रामस्थ दैनंदिन कामासाठी शहरात येत असतात. त्यामुळे नगरपालिकेच्या वीज, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राखणे आवश्यक आहे.
कंपनीने एक्स्प्रेस फिडरद्वारे अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा केल्यास शहर पाणीपुरवठा योजना सक्षम आणि स्वयंपूर्ण होईल, असे भोईटे यांनी ऊर्जामंत्र्यांना सांगितले. त्यावर एक्स्प्रेस फिडर तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या.
शहरात मोठय़ा प्रमाणात रस्तारुंदीकरणाचे व डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र रस्ता रुंदीकरणात विजेच्या खांबाचा अडथळा येत आहे. सर्व विजेचे खांब काढून वीज वाहिन्या भुयारी कराव्यात अशी मागणी करण्यात आली. या वेळी नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.