Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

हरिदास जगदाळे पुन्हा शिवसेनेत
सातारा, २३ जुलै/प्रतिनिधी

शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष हरिदास जगदाळे, नरेंद्र पाटील यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षात गेले होते ते पुन्हा शिवसेनेत आले. त्यांचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी

 

पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पक्षात प्रवेश दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. जिल्ह्य़ातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे या वेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बाबर यांनी सांगितले. कराड (उत्तर) व माण हे दोन मतदारसंघ भाजपला सोडण्यात येणार आहेत. सातारा, कोरेगाव, वाई, फलटण, कराड (दक्षिण) पाटण या शिवसेनेच्या वाटय़ाला येणाऱ्या जागा लढविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे या वेळी सांगण्यात आले.
या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बेकायदेशीर साठेबाजाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्य़ातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात साखरेचा साठा केला आहे तो तपासून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली व शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. उपजिल्हाप्रमुख संजय मोहिते, लोकसभेचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव, महेश िशदे, काशिनाथ धनावडे, बाजीराव घाडगे, एकनाथ संकपाळ, जयवंत शेलार, संजयसिंह देशमुख आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.