Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

नांदेडचे दहशतावादविरोधी पथक नायकाविनाच
गणेश कस्तुरे, नांदेड, २३ जुलै

‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी), तसेच अन्य जात्यंध संघटनांच्या हालचाली मराठवाडय़ात वाढल्यानंतर नांदेडमध्ये स्थापन करण्यात आलेले दहशतवादविरोधी पथक नावालाच असल्याचे सांगण्यात आले. या पथकाला गेल्या सहा महिन्यांपासून अधिकारीच मिळाला नाही.
मराठवाडय़ाच्या वेगवेगळ्या भागात सिमी, दीनदार- ए-अंजुमन या बंदी घातलेल्या संघटनांसह अन्य संघटना देशविघातक कृत्याला पाठबळ देत असल्याचे काही घटनांतून स्पष्ट झाले.

व्हॉलीबॉल सेवेचे फळ - जाधव
औरंगाबाद, २३ जुलै/खास प्रतिनिधी

‘‘गेल्या चार दशकांपासून व्हॉलीबॉलची सेवा केली. त्याचेच फळ शिवछत्रपती पुरस्काराच्या रूपाने मिळाले,’’ अशी प्रतिक्रिया व्हॉलीबॉल संघटनेचे विभागीय संघटक के. एम. जाधव यांनी आज व्यक्त केली. क्रीडा संघटक म्हणून श्री. जाधव यांना शिवछत्रपती पुरस्कार आज जाहीर झाला. ते फुलंब्री तालुक्यातील पाल या गावचे. राज्याच्या व्हॉलीबॉल संघात नऊ वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. चंद्रपूर येथे अखिल भारतीय सब ज्युनियर मुले, मुली व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुलींच्या गटाने अजिंक्यपद मिळविले.

‘प्रशांतच्या परिश्रमाचे चीज झाले’
नांदेड, २३ जुलै/वार्ताहर

‘प्रशांत बालपणापासून सातत्याने बॅडमिंटनचा सराव करत होता. वेगवेगळ्या स्पर्धेत त्याने देदीप्यमान यश मिळवले. आज त्याच्या परिश्रमाचे चीज झाले,’ अशा शब्दांत शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेल्या प्रशांत बहात्तरेच्या माता-पित्यांनी आज भावना व्यक्त केल्या. शहरातल्या हर्षनगर परिसरात राहणाऱ्या व सध्या ठाणे येथे रेल्वेत नोकरीस असलेल्या प्रशांत बहात्तरेला आज शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. पीपल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या प्रशांतला लहानपणापासूनच बॅडमिंटनची आवड होती.

उदगीरचा वरुण कुलकर्णी शिष्यवृत्ती परीक्षेत मराठवाडय़ात पहिला
उदगीर, २३ जुलै/वार्ताहर

फेब्रुवारी २००९ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा वरुण कुलकर्णी २७१ गुण मिळवून राज्यात आठवा व मराठवाडय़ात तसेच लातूर जिल्ह्य़ातून पहिला आला. या विद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक बनण्याचा मान पटकावला. जिल्ह्य़ातील एकूण ७० शिष्यवृत्तीधारकांपैकी ३४ विद्यार्थी या एकाच विद्यालयाचे आहेत.

परप्रांतीय दरोडेखोरांच्या टोळीतील चार जणांना अटक
चाकूर, २३ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील घरणी पथकर नाक्याजवळ चाकूर पोलिसांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास परप्रांतीय दरोडेखोरांच्या टोळीतील चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर, गावठी पिस्तुल, काडतुसे आणि चॉपर आदी हत्यारे जप्त केली. टोळीतील एक जण पळून गेला.
पोलिसांनी सांगितले की, घरणी पथकर परिसरात परप्रांतीय दरोडेखोरांची टोळी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व शिपाई रामचंद्र गुंडरे यांना मिळाली. पोलीस तपासासाठी गेल्यावर घरणी परिसरातील पथकर नाक्याजवळील नदीच्या नाल्यात पाच जण दडून बसल्याचे दिसून आले.

अंबाजोगाईच्या रुग्णालयाला अवकळा
रमाकांत उडाणशिव
अंबाजोगाई, २३ जुलै

एके काळी आशिया खंडात नावाजलेले स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय आणि महाविद्यालयात राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे त्याची वाटचाल आता तबेल्याकडे सुरू झाली आहे. रुग्णालयात गैरव्यवहाराने कळस गाठला असून यात दोषी ठरलेल्या डॉक्टरांचा मुजोरपणा वाढला आहे. सरकारी निवासस्थानात कर्मचाऱ्यांऐवजी दुसरेच वास्तव्यास असून कर्मचारी मात्र भाडय़ाने घरे घेऊन राहतात. या सर्व प्रकाराला वरिष्ठांची मूकसंमतीच असल्याचे दिसून येते.

परभणीत दोन खून
परभणी, २३ जुलै/वार्ताहर

शहरात दोन दिवसांमध्ये दोन खून झाले. घरगुती कारणावरून महिलेने आज दुपारी पतीचा खून केला. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाचा खून झाला. अलिबागनगरमध्ये शेख सुलतानाबी (वय ४०), तिचा नवरा शेख सिराज शेख जफर (वय ४५) व मुलगा शेख रियाज राहतात. फिट येण्याचा त्रास असल्यामुळे शेख सिराज कधी तरी कामाला न जाता घरी झोपत असे. घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत. आज दुपारी १२ वाजता शेख सिराज झोपला असताना भांडणाचा राग आल्याने सुलतानबीने मोठा दगड त्याच्या डोक्यात घातला. त्यामुळे तो ठार झाला. शेख रियाजने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख सुलतानबीला अटक केली आहे. ‘आर. के. हॉटेल’जवळील जिजामाता रस्त्यावर काल रात्री ८.३० वाजता तरुणाचा खून झाला. महाविद्यालयीन विद्यार्थी शशिकांत शंकरराव सालपे (वय १८) या रस्त्याने चालला होता. त्याच्या अंगावर सुरेश घनश्याम चोपडे याने खरकटे पाणी टाकले. जाब विचारल्यावर सुरेशने त्याला वायरने मारले व गुप्तीने पोटावर वार केले. नानलपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पाच प्रवासी जखमी
गेवराई, २३ जुलै/वार्ताहर

शहागडहून गेवराईकडे येणारी सहा आसनी रिक्षा उलटून पाच प्रवासी जखमी झाले. नागझरी फाटय़ाजवळ आज दुपारी ३ वाजता हा अपघात झाला. अच्युत साहेबा आहेर (वय ४५), ज्ञानोबा बाबुराव देवकुळे (वय ३८), ज्ञानेश्वर लक्ष्मण नरवडे (वय ३०), भागाजी ज्ञानेश्वर नरवडे (वय २५), कौशल्या राम नरवडे (वय ६०, खळेगाव) या जखमींवर येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून बीड जिल्हा पाठविण्यात आले.

अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या उद्घाटन
लातूर, २३ जुलै/वार्ताहर

दुर्मिळ वैद्यकीय सुविधांची सोय आता शहरातील अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. रुग्णालयाचे उद्घाटन येत्या शनिवारी (दि.२५)होणार आहे. महिन्यातून दोन दिवस गरीब रुग्णांसाठी अल्प दरात वैद्यकीय उपचार ही या रुग्णालयाची वैशिष्टय़े आहेत. लवकरच मूत्राशयरोपणाची सोय उपलब्ध करण्यात येणार असल्याचे डॉ. दिनेश वर्मा यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी १ वाजता मुक्ताई मंगल कार्यालयात उद्घाटन होणार आहे. विकास कारखान्याचे अध्यक्ष अमित देशमुख व हैदराबाद येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सी. रघु उपस्थित राहणार आहेत.

पुरवठा विभागाकडून नऊ दुकानांची तपासणी
हिंगोली, २३ जुलै/वार्ताहर

जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव पाहता साठेबाजीला आळा घालण्याच्या हेतूने पुरवठा विभागाच्या पथकाने शहरातील नऊ दुकानांची आज अचानक तपासणी केली. पथकाच्या हाती काही लागले नाही. तहसीलदार एस. जी. भुसेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या पथकाने साखर व डाळीचा साठा तपासण्यासाठी आज काही दुकानांची पाहणी केली. या दुकानांमध्ये साखर व डाळीचा साठा सापडला नाही. साखर व डाळी विक्रेत्या दुकानदारास आता विक्री परवाना घेणे आवश्यक असून मोठय़ा दुकानदाराला दोन हजार क्विंटल साखर व १०० क्विंटल डाळ तर किरकोळ विक्रेत्या दुकानदारांना २०० क्विंटल साखर, १०० क्विंटल डाळीचा साठा ठेवता येत असल्याची माहिती तहसीलदार भुसेवाड यांनी या दुकान तपासणी मोहिमेत दिली.

‘निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक’
औरंगाबाद, २३ जुलै/खास प्रतिनिधी

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत महापौर विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्व. प्रमोद महाजन मराठी पत्रकार भवन परिसरात गुरुवारी वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे हे होते. वृक्षाची तोड होत असल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. हे मानवासाठी हिताचे नाही. त्यामुळे वृक्षारोपणाची अधिकाधिक गरज आहे, असेही महापौर म्हणाल्या. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, ‘वेलवर्थ’चे संचालक वसंतभाई हौजवाला, अरविंद हौजवाला, उपमहापौर भाऊसाहेब वाघ, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, माजी आमदार श्रीकांत जोशी, गृहवित्त मंडळाचे अध्यक्ष सुभाष झांबड, पंजाबराव वडजे, बाबूराव कदम आदी उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संघटनेचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केले.

आयक्तालय कृतिसमितीची मुख्यमंत्र्यांविरोधात अवमान याचिका
लातूर, २३ जुलै/वार्ताहर

विभागीय आयक्तालयाच्या निर्मितीसंबंधी न्यायालयाने प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले असताना नांदेड जिल्ह्य़ात ‘नांदेड महसूल विभाग’ या नावाने शासकीय कार्यालयात काही ठिकाणी कामकाज सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाच्या विभाजनप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश बासनात गुंडाळून ठेवल्यामुळे हे प्रकार घडत आहेत. त्यांच्या विरोधात अवमान याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय लातूर येथील विभागीय आयक्तालय कृतिसमितीने घेतलेल्या बैठकीत घेतला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उफाळून येऊ नये, असा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठांनी घेऊन आयक्तालयाच्या निर्मितीला स्थगिती दिली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी नांदेड येथे आयक्तालय निर्मिती प्रक्रियेला वेग देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे लातूर येथील विभागीय आयक्तालय कृतिसमितीही आता सक्रीय झाली आहे. वकील मनोहर गोमारे, उदय गवारे, माजी नगराध्यक्ष यंकट बेद्रे, समद पटेल यांच्यासह कृतिसमितीचे सदस्य पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत.

वसमत तालुक्यात पुन्हा खताची कृत्रिम टंचाई
वसमत, २३ जुलै/वार्ताहर

सध्या तालुक्यात पुन्हा खताची कृत्रिम टंचाई करून व्यापारी चढय़ा भावाने खतविक्री करीत आहेत. पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून याकडे डोळेझाक होत आहे. वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी खताची चढय़ा भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तालुक्यात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे मोंढय़ात खत घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. युरिया, डीएपी खताची मागणी होत आहे. व्यापारी खत नाही, असे सांगतात. जास्त पैशांचे आमिष दाखविल्यावर खत मिळेल, पण बिल मिळणार नाही असे सांगून खत गोदामातून देण्याची व्यवस्था या व्यापाऱ्यांनी करून ठेवली आहे. वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी खताची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

ओबीसी मेळाव्याची लातूरमध्ये जय्यत तयारी
लातूर, २३ जुलै/वार्ताहर

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात इतर मागासवर्गीय समाजासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्या (शुक्रवारी) सायंकाळी ६ वाजता टाऊन हॉलच्या मैदानावर सोहळा आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसने आयोजिलेल्या या कार्यक्रमासाठी मैदानावर खास वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. या मेळाव्यास श्री. देशमुख, क्रीडामंत्री दिलीप देशमुख, खासदार जयवंत आवळे, अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत. विलासराव देशमुखांनी इतर मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ज्यामुळे उपेक्षित समाजाला न्यायाची दारे उघडी झाली. त्यांनी केलेल्या कामाबद्दल समाजातील विविध घटांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

जातप्रमाणपत्रासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
जालना, २३ जुलै/वार्ताहर

घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील जातीची प्रमाणपत्रे तातडीने वाटप करावे अन्यथा शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी उपजिल्हाप्रमुख देवनाथ जाधव यांनी दिला. निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे, घनसावंगी-अंबड तालुक्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रक्रिया परतूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून केली जात होती. मात्र दोन महिन्यांपासून तत्कालीन जिल्हाधिकारी शिंदे यांनी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकानिहाय एका उपजिल्हाधिकाऱ्याची नेमणूक केली. त्याप्रमाणे घनसावंगी तालुक्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची नेमणूक केली. परंतु यामुळे प्रमाणपत्रे त्वरित मिळणे सोडाच पण त्यास एवढा उशीर होत आहे की, काही विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश मिळाला नाही. घनसावंगी तालुक्यातील ५०० विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रांचे प्रस्ताव संबंधित उपजिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. प्रमाणपत्र वाटप न झाल्यास शिवसेनेच्या वतीने इतर मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

नाटय़ व लोककलावंत गजानन बोधले यांचे निधन
तुळजापूर, २३ जुलै/वार्ताहर

शहराच्या सांस्कृतिक चळवळीत गेल्या अर्धशतकापासून अग्रणी राहणारे नाटय़कलावंत गजानन बाजीराव बोधले यांचे अलीकडेच दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. निजामी राजवटीत पूर्वजांनी जोपासलेले कलगीतुरा वाङ्मय पुढील पिढीस ज्ञात व्हावे यासाठी बोधले यांनी तुरा पक्षाच्या संचात राहून ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. लोकगीते, पोवाडे, लावणी यासारख्या संगीत प्रकारांची रुची बाळगणाऱ्या गजानन बोधले यांनी शाहिरी व लोककला पथकाची निर्मिती केली होती. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या अंत्यसंस्कारास सर्व थरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव नरसिंग बोधले यांनी रंगकर्मी नाटय़ संस्थेच्या माध्यमाने चालू ठेवला आहे.