Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

तलाव भरणार.. पाणीटंचाई टळणार?
मुंबई, २३ जुलै / प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असून पाऊस असाच सुरू राहिल्यास तलाव भरून वाहू लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी टंचाईचे संकट टळणार आहे. प्रमुख तलावांत गेल्या वर्षी जो पाणीसाठा होता त्यापेक्षा आज अधिक

 

पाणीसाठा असल्याचे पालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
गेल्या वर्षी आजच्या दिवशी वापरण्यात येणारा एकूण साठा चार लाख ४६ हजार ३७७ दशलक्ष लिटर होता तर आज हा साठा चार लाख ७० हजार ११ दशलक्ष लिटर इतका आहे. तलाव क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने प्रमुख तलाव लवकरच भरून वाहतील, अशी आशा पालिका प्रशासनाने व्यक्त केली.
मुंबई आणि उपनगरात आज दिवसभर बऱ्यापैकी पाऊस सुरू होता. त्यातुलनेत गेल्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात दडी मारलेल्या पावसाने दमदार आगमन केले आहे. मोडकसागर तलावांत आज १०१ मिमी, तानसा ९९ मिमी, विहार ७२ मिमी, तुलसी ५१ मिमी, अप्पर वैतरणा १३५ मिमी तर भातसामध्ये १३६ मिमी पावसाची नोंद झाली. मोडकसागरची पूर्ण क्षमता १६३.१५ मीटर असून आजची पातळी १६२.२३ मीटर एवढी आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत मोडकसागर पूर्ण भरून वाहू लागेल, अशी शक्यता आहे. तानसाची क्षमता १२८.६३ मीटर असून सध्या तानसाची पातळी १२३.७६ मीटपर्यंत पोहोचली आहे. तुळशी तलावांत सध्या १३६.६१ मीटर पाणीसाठा असून या तलावाची क्षमता १३९.१७ मीटर इतकी आहे तर अप्पर वैतरणाची सध्याची पातळी ५९५.१३ मीटर इतकी आहे.