Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कबूलनामा कबूल!
कसाबचा खटला सुरूच राहणार
मुंबई, २३ जुलै / प्रतिनिधी

गेल्या सोमवारी न्यायालय सुरू होताच नाटय़मयरीत्या आपल्या गुन्ह्याची कबुली देऊन त्याबाबतच्या घटनाक्रमाचा पाढा न्यायालयासमोर वाचून खटल्याला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याचा कबुलीनामा न्यायालय स्वीकारून त्याला शिक्षा सुनावणार की

 

तो स्वीकारून खटलाही पुढे सुरू ठेवणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी आज याबाबतच्या शक्यतांवर पडदा टाकत कसाबचा कबुलीनामा नोंद म्हणून दाखल करून घेतला व खटल्याचे कामकाज पुढे सुरू केले.
कसाबने सोमवारी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर व त्याबद्दल तपशीलवार माहिती न्यायालयात विशद केल्यानंतर खटल्याला नवे वळण मिळाले होते. त्यातच त्यावर युक्तिवाद करताना अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी, कसाबने कबुलीनाम्यात सीएसटी स्थानकावरील गोळीबार व स्कोडा गाडी चोरीवगळता अन्य गुन्हे अमान्य केल्याचा व बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्याचा आरोप केला होता. याशिवाय पाकिस्तानने याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींसाठी फायदेशीर ठरावा म्हणून त्याने कबुलीनामा दिल्याचा आरोप केला होता. तसेच कसाबचा कबुलीनामा काही प्रमाणात मान्य करून खटलाही पुढे ठेवण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. तर कसाबचे वकील अब्बास काझ्मी यांनी कसाबचा कबुलीनामा स्वीकारून त्याला शिक्षा सुनवावी अथवा तो पूर्णत: फेटाळून लावावा, अशी मागणी केली होती.
न्यायालयाने आज याबाबत निर्णय देताना म्हटले की, कसाबने त्याच्या कबुलीनाम्यात त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या ८६ आरोपांपैकी बहुतांश आरोप अमान्य केले आहेत. तसेच सद्य:स्थितील खटल्यात तीन चतुर्थाश पुरावा नोंदविण्यात आलेला आहे. अशा स्थितीत कसाबचा कबुलीनामा काही प्रमाणात स्वीकारावा हे अभियोग पक्षाचे म्हणणे मान्य केले तर ते त्याच्यावर पूर्वग्रदुषितपणाचे ठरेल तसेच त्यामुळे खटल्यात पुढे गंभीर व गुंतागुंतीची समस्या निर्माण होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करता कसाबचा कबुलीनामा सध्या नोंद म्हणून दाखल करण्यात येत असून योग्य वेळी त्याचा विचार केला जाईल, असे सांगत न्यायालयाने खटल्याचे कामकाज सुरू केले.
काझ्मी सोडणार होते वकीलपत्र
न्यायालयाने कसाबचा कबुलीनामा नोंद म्हणून दाखल करून घेत खटला पुढे सुरू करण्याचे आदेश दिल्यावर अ‍ॅड. काझ्मी यांनी, कसाबच्या चर्चेवरून त्याचा आपल्यावर विश्वास नसल्याचे व केवळ त्याचमुळे आपण वकीलपत्र मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने कसाबकडे याबाबत विचारणा केली असता त्याने अ‍ॅड. काझ्मींचा गैरसमज झाल्याचे न्यायालयाला सांगितले. परंतु काझ्मी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे लक्षात आल्यानंतर न्या. टहलियानी यांनी काझ्मी आणि कसाबला एकमेकांशी चर्चा करण्यास सांगत त्यांच्यातील गैरसमज दूर केला.