Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

हिरा लपून राहात नाही, तो बरोबर चमकतोच!
चहाची टपरी चालवून २० पुस्तके लिहिणाऱ्या लक्ष्मणरावांच्या साहित्यसेवेने राष्ट्रपती भारावल्या
नवी दिल्ली, २३ जुलै/खास प्रतिनिधी

हमाली व मोलमजुरी करून, चहाची टपरी चालवून, असंख्य हालअपेष्टा व उपेक्षा सहन करून सरस्वतीची निरंतर आराधना करणारे मूळचे अमरावतीचे हिंदूी साहित्यिक लक्ष्मणराव यांनी आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना ‘रेणु’ ही आपली कादंबरी अर्पण केली. ‘हिरा लपून राहात नाही.

 

तो बरोबर चमकतोच. तुमच्यात प्रतिभेची ठिणगी असेल तर ती विपरित परिस्थितीतही विझू शकत नाही आणि ती यशाच्या शिखरावर पोहोचविते’ असे गौरवोद्गार लक्ष्मणरावांची साहित्यसाधना बघून राष्ट्रपतींनी काढले.
पस्तीस वर्षांंपूर्वी अमरावतीत भीषण दुष्काळ पडल्यामुळे तळेगाव-दशासर (तालुका धामणगाव)मध्ये जन्मलेले लक्ष्मणराव यांना उदरनिर्वाहासाठी रोजगाराच्या शोधात आपले गाव सोडावे लागले. त्यांनी काही काळ भोपाळमध्ये हमालीचे काम केले. पण तिथे जम बसला नाही. मग त्यांनी दिल्ली गाठली. ढाब्यांवर भांडी धुण्याचे काम करून व मोलमजुरी करीत त्यांनी आयटीओ परिसरातील विष्णु दिगंबर मार्गावर स्वतची चहाची टपरी सुरु केली. त्याचवेळी अपूर्ण राहिलेले शिक्षणही नेटाने पूर्ण करीत त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी. ए. ची पदवी मिळविली आणि राष्ट्रभाषेतून लेखन करण्यास सुरुवात केली. गेल्या तीस वर्षांंत त्यांच्या २० साहित्यकृती प्रकाशित झाल्या. दिल्लीतील साहित्य वर्तुळातही त्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो. त्यांची पुस्तके दिल्लीतील शाळा व महाविद्यालयांच्या ग्रंथालयामध्ये वाचली जातात. पण त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन चहाची टपरीच आहे. आपल्याच अमरावती जिल्ह्यातील लक्ष्मणरावांचा हा जीवनसंघर्ष ऐकून राष्ट्रपती थक्क झाल्या. लेखक आणि कवी होणे कोणालाही जमत नाही. त्यातही झाडू मारणारी आणि चहाचे दुकान चालविणारी व्यक्ती एवढे गहन लेखन करू शकते, याचा तर कोणी विचारही करू शकणार नाही. त्यामुळेच लक्ष्मणराव यांचे पुस्तक स्वीकारताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. मराठीत लेखन केले काय, असा प्रश्नही राष्ट्रपतींनी त्यांना विचारला. त्यावर आपण राष्ट्रभाषेतच लिहण्याचे ठरविले होते, असे लक्ष्मणराव यांनी सांगितले.