Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणार
पुणे, २३ जुलै / प्रतिनिधी

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका गोपनीय न ठेवता त्यांच्या छायांकित प्रती शुल्क आकारून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्यात, असा ऐतिहासिक निर्णय राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाने आज दिला. चुकीच्या गुणपडताळणीमुळे तसेच उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटींमुळे

 

विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान या निर्णयामुळे यापुढे टळू शकेल.
चांगल्या गुणांची अपेक्षा बाळगणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना दहावी- बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यास केवळ फेर गुणपडताळणीवरच समाधान मानावे लागे. तथापि, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गोपनीय मानलेली उत्तरपत्रिका पाहून तिच्या तपासणीबाबत खातरजमा करून घेण्याची संधी विद्यार्थ्यांला कधीच मिळत नसे. पुढील वर्षांपासून विद्यार्थ्यांना या उत्तरपत्रिका पाहता याव्यात, असा प्रस्ताव शिक्षण मंडळाने शासनाकडे पाठविला होता. तथापि, राज्याचे माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांच्या या निर्णयामुळे येत्या नोव्हेंबरपासूनच आपली उत्तरपत्रिका केवळ पाहण्याचाच नव्हे तर तिची छायांकित प्रत मिळविण्याचा हक्कही विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती देण्यासाठी आकारावयाचे शुल्क, त्यांच्या विषयांची संख्या, त्यासाठीची कालमर्यादा व कार्यपद्धती इत्यादी तपशील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी निश्चित करावा व तो ऑक्टोबर २००९ अखेर जाहीर करावा. तसेच आयोगाने दिलेल्या या आदेशाच्या अनुपालनाचा अहवालही त्यांनी १० नोव्हेंबपर्यंत आयोगाकडे सादर करावा, असेही माहिती आयुक्तांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.
पुण्यातील अभिजित श्रीपाद जोशी या बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांने माहिती अधिकार कायद्याच्या कलम ८ नुसार केलेल्या तक्रारीमुळे शिक्षण मंडळाने गोपनीय ठरविलेल्या या उत्तरपत्रिका शिक्षण मंडळाला आता खुल्या कराव्या लागणार आहेत.