Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

प्रादेशिक

उधाण समुद्राला आणि मुंबईकरांनाही!
हाजीअली दग्र्याचा रस्ता पाण्याखाली
महापौर निवासस्थानाची भिंत कोसळली

मुंबई, २३ जुलै / प्रतिनिधी

मुंबईच्या किनारपट्टींवर गेल्या दोन दिवसांपासून समुद्राला आलेले उधाण आणि उसळत्या लाटांचा थरार पाहण्यासाठी उत्साही मुंबईकरांनी आज एकच गर्दी केली. उंच लाटांचा थरार अनुभवताना मुंबईकर चिंब भिजून गेले तर या भरतीने समुद्रकिनारी राहणाऱ्या झोपडीवासीयांना बेघर केले. महापौर निवासस्थानाची भिंत उंच लाटेची जोरदार धडक पचवू शकली नाही तर हाजीअली दग्र्याचा रस्ता संपूर्ण पाण्याखाली गेला. उद्या २४ जुलै रोजी आतापर्यंतची सर्वात मोठी भरती येणार असल्याचे आधीच जाहीर झाल्यामुळे उद्या समुद्राचे रुप काय असेल अशी उत्सुकता मुंबईकरांना लागून राहिली आहे.

अनेकांचे संसार वाहून गेले..
ठाणे, २३ जुलै /प्रतिनिधी

अरबी समुद्राला आलेल्या उधाणामुळे खाडीला आलेल्या भरतीचे पाणी घरात घुसल्याने कोपरीतील १५० हून अधिक लोकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले. आज समुद्राला आलेल्या प्रचंड उंचीच्या लाटांमुळे खाडीला मोठी भरती आली होती. त्याचा सर्वाधिक फटका कोपरीतील कोळीवाडय़ाला बसला असून, सावरकरनगरातील सुमारे १००, तर कृष्णानगरात ७० ते ८० घरात पाणी घुसले आहे. विशेष म्हणजे चार वर्षांंपूर्वी २६ जुलै रोजी झालेल्या पुरातही या भागात पाणी घुसले नव्हते.

अस्वीकृत दूध टँकर दुसऱ्याच दिवशी स्वीकृत
‘महानंद’मधील ‘आनंदीआनंद’
मुंबई, २३ जुलै / प्रतिनिधी

राज्यातील जवळपास २५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद) या संस्थेत निवडून आलेले संचालक मंडळ कार्यान्वित होऊन चार वर्षे लोटली असली तरी अद्यापही त्या संस्थेचा कारभार जुन्याच वळणाने चाललेला असल्याची बाब उजेडात आली आहे.

केंद्र सरकारचे आता.. रस्ते नये नये!
४१ हजार कोटींच्या रस्त्यांचे आराखडे सिद्ध
समर खडस, मुंबई, २३ जुलै

केंद्र सरकारच्या रस्ते आणि भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ४१ हजार ३८ कोटी रुपयांच्या निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. २००९-१० या आर्थिक वर्षांत तब्बल एक लाख कोटी रुपये रस्ते विकासावर खर्च करण्याचे या खात्याचे मंत्री कमलनाथ यांनी नक्की केले असून सध्या दररोज सुरू असलेली दोन किलोमीटर रस्तेबांधणी आता कमलनाथ यांना २० किलोमीटरवर न्यायची आहे. वेगाने काम करण्याच्या या नव्या ‘टार्गेट’मुळे देशातील रस्तेबांधणीला आता नवा आयाम मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाटय़लेखिका परिषदेचे १ नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजन
मुंबई, २३ जुलै/प्रतिनिधी

विमेन प्लेराईट्स इन्टरनॅशल या संघटनेतर्फे आठवी आंतरराष्ट्रीय नाटय़लेखिका परिषद १ नोव्हेंबर २००९ ते ७ नोव्हेंबर २००९ या कालावधीत मुंबईत आयोजित केली आहे. मुंबई विद्यापीठाचा नाटय़विभाग आणि स्त्री मुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर, मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकेडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक वामन केंद्रे व ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा देशपांडे हे या परिषदेच्या आयोजन समितीवर आहेत.

पॉलिटेक्निकच्या पहिल्या प्रवेश फेरीला सुरूवात
मुंबई, २३ जुलै / प्रतिनिधी

पॉलिटेक्निक संस्थांमधील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया गुरूवारपासून (२३ जुलै) सुरू झाली आहे. २७ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी यंदापासून ‘केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया’ राबविण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. या प्रक्रियेत ५७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.

तात्काळ आरक्षण दोन दिवस आगाऊ मिळणार
मुंबई, २३ जुलै / प्रतिनिधी

सध्या पाच दिवस आगाऊ मिळणारे तात्काळ आरक्षण येत्या १ ऑगस्टपासून दोन दिवस आधी मिळणार आहे. अचानक प्रवासाला निघावे लागणाऱ्या प्रवाशांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीस रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तात्काळ आरक्षणाचा कालावधी दोन दिवसांवर आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार येत्या १ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजाबणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतच्या प्रवासी तिकिटांचे तात्काळ आरक्षण पाच दिवस आधीपर्यंत करता येईल. मात्र १ ऑगस्टच्या तिकिटांचे तात्काळ आरक्षण दोन दिवस आधीपासून म्हणजे २९ जुलैपासून करता येईल.

विमानात बॉम्ब असल्याची धमकी;मनोरुग्ण तरुणाला अटक
मुंबई, २३ जुलै / प्रतिनिधी

दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याबाबत धमकावून कर्मचारी व प्रवाशांमध्ये घबराट माजविणाऱ्या एका तरुणास विमानतळ पोलिसांनी आज अटक केली. हा तरुण मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. इंडिगो एअरलाईन्सचे विमान मुंबई विमानतळावर उतरण्याआधी साधारणत: १५ मिनिटे आधी विमानातील प्रवाशांना सफरचंदाचा रस देण्यात आला. त्यावेळी एक तरुण अचानक उभा राहून विमानात बॉम्ब असल्याचे ओरडू लागला व विमान कराचीला नेण्याची भाषा करू लागला. त्यामुळे एकच घबराट माजली. त्यामुळे हे विमान मुंबई विमानतळावर उतरताच, सतर्क जवानांनी सदर तरुणास ताब्यात घेतले.