Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

मनसेला लागले ‘सेनाग्रहण’!
संदीप आचार्य

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ‘लाखमोलां’च्या मतांमुळे राजकारणात दबदबा वाढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाला शिवसेनेचे ‘ग्रहण’ लागले की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या सरचिटणीस श्वेता परुळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर दुसरे सरचिटणीस प्रकाश महाजन यांची राज ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गिर्यारोहकांची सामाजिक बांधिलकी
डोंगरात फिरताना, संवेदनशील भटकताना ग्रामीण जीवन, उपेक्षित दुर्गवैभव अशा गोष्टींची सल हमखास जाणवतो. काही तरी करायला पाहिजे असे वाटत राहते पण नेमके काय आणि कसे करावे किंवा जे काही थोडेफार करीत आहोत ते कसे टिकवावे याबद्दल तो संभ्रमित असतो. डोंगरवेडय़ाच्या अशाच काही प्रश्नांना उत्तर नुकतेच झालेल्या एका आगळ्या परिसंवादातून मिळाले. सामाजिक बांधिलकी ही कामे करताना काय करावे यासंदर्भात या क्षेत्रातील गेली २०-२५ वर्षे कार्यरत असणाऱ्या धनंजय मदन, शेखर बर्वे, पद्माकर गायकवाड, चंद्रशेखर वझे आदी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

पालिकेत दलालांचा सुळसुळाट !
बंधुराज लोणे

देशातील सर्वात श्रीमंत आणि अवाढव्य पसारा असलेल्या मुंबई महानगरपालिकेत गेल्या १५ वर्षापासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. ‘मराठी’च्या प्रश्नावर राजकारण करताना पालिकेची आर्थिक सूत्रे मात्र अमराठी भाषिक ठेकेदारांकडेच सुर्पूद केल्यासारखी दिसत आहे. हे सर्व ठेकेदार राजस्थानातील एकाच जिल्ह्यातील असून पालिकेच्या १९ हजार कोटींच्या अर्थसंकल्पातील जास्तीत जास्त मलिदा त्यांच्याच ‘खिशात’ जात आहे. त्यातच महानगरपालिकेतील प्रमुख पक्षांच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा दलालांचाच अधिक सुळसुळाट झाल्याचे चित्र दिसत आहे.

अभियांत्रिकीचे प्रवेश रखडले
तुषार खरात

अभियांत्रिकीची पदविका पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता यावा म्हणून ‘लॅटरल एन्ट्री’च्या नियमानुसार द्वितीय वर्षात १० टक्के जागा वाढविण्यात येतात. या जागांसाठी तसेच प्रथम वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांमुळे द्वितीय वर्षात रिक्त झालेल्या जागांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. प्रथम वर्षातील नापास विद्यार्थ्यांमुळे द्वितीय वर्षात रिक्त झालेल्या जागांवरील प्रवेश आतापर्यंत इच्छुक महाविद्यालयांतच राबविले जात होते.

फ्लीट टॅक्सींच्या काचांवर जाहिराती
आरटीओ व वाहतूक पोलिसांची मेहरनजर?
कैलास कोरडे
वाहनांच्या काचांवर ठराविक क्षमतेपेक्षा जास्त अपादर्शक काळ्या फिल्म लावणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्याचवेळी काही फ्लीट टॅक्सी कंपन्यांच्या टॅक्सींच्या मागील काचांवर पूर्णत: अपारदर्शक जाहिराती लावण्यात आल्या असून त्या शहरभर फिरत आहेत. परंतु वाहतूक पोलीस आणि प्रश्नदेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून (आरटीओ) या टॅक्सींकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे.

वनमंत्र्यांकडे तक्रार
सागाच्या २०० झाडांची कत्तल
सुहास धुरी

फर्निचरसाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या सागाच्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणात बेकायदा कत्तल होत असल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील वाडा वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. आतापर्यंत सुमारे २०० वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याची माहिती येथील वृक्षमित्र अजय जामसंडेकर यांनी दिली असून ही बाब वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता त्यांनी याबाबत थेट वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे तक्रार केली आहे.

‘इग्नू’चे मुलुंड येथे कार्यालय, प्रवेशाची मुदत ३१ जुलै
प्रतिनिधी

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात ‘इग्नू’चे क्षेत्रीय कार्यालय मुलुंड येथे नुकतेच सुरू झाले असून त्याचे उद्घाटन ‘इग्नू’चे कुलगुरू राजशेखर पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अन्य विद्यापीठांचे आजी-माजी कुलगुरू तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यालयामार्फत ‘इग्नू’च्या ३५० हून अधिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून अभ्यासक्रमाच्या पुस्तक वाटपाचे कामही या कार्यालयातून केले जाणार आहे. पीएच. डी; एमबीए, एमसीए तसेच अन्य विषयांतील पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हिंदी शिक्षक निबंध स्पर्धेत ‘यशस्वी भव’चे शिवाजी रसाळ द्वितीय पारितोषिक विजेते
प्रतिनिधी

मुंबई हिंदी सभा आयोजित स्व. इंदिरा गांधी निबंध लेखन राज्यस्तरीय स्पर्धा हिंदी शिकविणारे शिक्षक, हिंदी प्रेमी नागरिक तसेच हिंदी भाषा प्रचारक या गटांसाठी घेण्यात आली. या स्पर्धेत अनुयोग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन करणारे व ‘लोकसत्ता’मधून प्रसदिध् केल्या जाणाऱ्या ‘यशस्वी भव’ या मालिकेद्वारे दहावीतील विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे मार्गदर्शन करणारे शिक्षक शिवाजी रसाळ यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. ‘साहित्य का समाज पर प्रभाव’ या विषयावर शिवाजी रसाळ यांनी निबंध लेखन केले. चषक, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप असून, एका शानदार समारंभात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

कूपर रुग्णालयात नवीन वैद्यकीय साधने
प्रतिनिधी

कूपर रुग्णालयाच्या ओशिवरा मॅटर्निटी हॉस्पिटलमधील तीन महत्त्वाच्या वैद्यकीय साधनांचे उद्घाटन आमदार अशोक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कूपर रुग्णालयात लॅप्रश्नस्कोप विथ कॅमेरा, हिस्ट्रोस्कोप आमि कोल्पोस्कोपी ही अंदाजे १५ लाख रुपयांची वैद्यकीय साधने बसविण्यात आली आहेत. या वेळी कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सीताराम गावडे उपस्थित होते.

पॉलिटेक्निकची पहिली प्रवेश फेरी सुरू
प्रतिनिधी

पॉलिटेक्निक संस्थांमधील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी गुरूवारपासून प्रश्नधान्यक्रम अर्ज सादरीकरणाला सुरूवात झाली आहे. २७ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी यंदापासून केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. या प्रक्रियेत ५७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. यात मुंबई व ठाण्यातील ८६००, तर रायगडमधील १६३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासकीय ४०, अनुदानित १७ व खासगी ८६ संस्थाचा या प्रवेशप्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. या सर्व संस्थांमध्ये एकूण ४१ हजार ५०० जागा उपलब्ध आहेत.