Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

काम राहिले बाजूलाच, दालने बळकावण्यातच फुशारकी!
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

राग, चीड, संताप आणि नंतर अगतिकता, असहायपणा व हताश होणे.. महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीत दालनासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या भांडणाबद्दलच्या या प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्य नागरिक, प्रशासन आणि अपवादानेच आढळणाऱ्या काही सुजाण नगरसेवकांच्यादेखील.

‘माध्यमिक’मध्ये मिलिंद मोळके जिल्ह्य़ात पहिला
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांदगावचा सुयश शिंदे राज्यात प्रथम

नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

पूर्व माध्यमिक (चौथी) शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश सुदर्शन शिंदे (चांदगाव, ता. नेवासे) ३०० पैकी ३०० गुण मिळवून राज्यात पहिला आला. ‘माध्यमिक’मध्ये (सातवी) मिलिंद श्रीधर मोळके (समर्थ विद्या मंदिर, नगर) याने २६५ गुण मिळवून जिल्ह्य़ात प्रथम व राज्याच्या गुणवत्तायादीत १४वे स्थान मिळवले.

धरणांच्या क्षेत्रावर पाऊस मेहेरबान
‘मुळा’ १० टीएमसी
राहुरी, २३ जुलै/वार्ताहर
पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने मुळा धरणात या हंगामात प्रथमच सव्वा टीएमसीपेक्षा जास्त (१२९० द.श.घ.फू.) नवीन पाणी आले. रात्री ८ वाजता धरणात ९ हजार ७५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. पाणीपातळी पावणेपाच फुटांनी वाढली.

पांजऱ्यात १६ इंच वृष्टी ‘भंडारदरा’ निम्मेअधिक भरले
अकोले, २३ जुलै/वार्ताहर
भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने रौद्ररूप धारण केले असून, कालपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. पांजरे येथे २४ तासांत १६ इंच (४०१ मिमी) असा विक्रमी पाऊस पडला. पावसामुळे धरणातील पाणीसाठा ३६ तासांत तब्बल १७ टक्क्य़ांनी वाढला. धरण ५० टक्के भरले.

कुकडी पाणलोटात चांगला पाऊस
श्रीगोंदे, २३ जुलै/वार्ताहर

तालुक्यात भीज पावसाने दोन दिवसांपासून शिडकावा दिला असतानाच कुकडी धरण मालिकेतील पाच धरणांसह घोड धरणातही पावसाने चांगली हजेरी लावली. कुकडी धरण मालिकेत आज सकाळपर्यंत २४ तासांत सरासरी ४० मिमी पाऊस झाला, पण दिवसभरात पुन्हा हा जोर ओसरला.

दारणा, गंगापूरच्या पाणीसाठय़ांत वाढ
कोपरगाव, २३ जुलै/वार्ताहर
नाशिक जिल्ह्य़ातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने दारणा धरणात १३ टक्के, तर गंगापूर धरणात १४ टक्के पाणी आल्याची माहिती नाशिक पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी दिली. गेल्या ३ दिवसांपासून तालुक्यात दिवसभर संततधार व रिमझिम भीज पाऊस पडत आहे. दुपारी काही वेळ सूर्यदर्शन झाले. काही काळ उघडीप मिळाली.

‘निळवंडे’ही निम्मे भरले
अकोले, २३ जुलै/वार्ताहर

पाणलोटक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे निळवंडे धरणातील पाणीपातळी दिवसभरात पाच मीटरने वाढली. आढळा खोऱ्यातील पाडोशी येथे लघुपाटबंधारे प्रकल्पात नव्याने पाणी येण्यास सुरुवात झाली, तर अंबितपाठोपाठ मुळा धरण पाणलोटक्षेत्रातील बलठाण, घोटी, शिलवंडी, कोथळे व देवहांडी हे तलावही भरून वाहू लागले आहेत. निळवंडय़ाच्या खाली प्रवरानदी वाहती झाली.

तीन गावे, पाच वस्त्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा
कोपरगाव, २३ जुलै/वार्ताहर
तालुक्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या भीज व रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. निम्मा पावसाळा उलटला, तरी गोदावरीचे पात्र कोरडेच आहे. अजूनही तीन गावे व पाच वाडय़ा-वस्त्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येसगावच्या साठवण तलावातून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात २००१मध्ये ३८१, २००२मध्ये ३८१, २००३मध्ये ४१३, २००४मध्ये ४६६, २००५मध्ये ४०९, २००६मध्ये ६११, २००७मध्ये ५६६, २००८मध्ये ३९७ व २००९मध्ये आतापर्यंत ९५ मिमी पाऊस पडल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आल्याचे नायब तहसीलदार राजेंद्र नवले यांनी सांगितले.

पिंपळनेरच्या शाळेचा निकाल ९७ टक्के
वाडेगव्हाण, २३ जुलै/वार्ताहर

पिंपळनेर येथील जिल्हा परिषद प्रश्नथमिक शाळेचा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ९७ टक्के लागला. त्यामध्ये सचिन कळसकर याने गुणवत्तायादीत तिसरा क्रमांक मिळविल्याची माहिती मुख्याध्यापिका खामकर यांनी दिली. अजिंक्य जेकरे (२९०), मंगल पेटारे (२८२), नीलम रासकर (२७८) शिष्यवृत्तीस पात्र ठरले. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका भोर, ए. बी. गाडगे, श्रीमती संगीता खोमणे व मुख्याध्यापिका खामकर यांचे मार्गदर्शन लाभले.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाघमारे केंद्रात पहिला
पारनेर, २३ जुलै/वार्ताहर
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील जिल्हा परिषद प्रश्नथमिक शाळेतील विद्यार्थी कौस्तुभ विजय वाघमारे ३०० पैकी २७६ गुण मिळवून पारनेर केंद्रात प्रथम आला. त्याला केंद्रप्रमुख संपत जाधव, मुख्याध्यापक शिवाजी औटी, वर्गशिक्षिका पुष्पा कारखिले यांचे मार्गदर्शन लाभले. पारनेर केंद्रातून शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण २९७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. केंद्राचा निकाल ८३.२७ टक्के लागला. केंद्रातील दोन शाळांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती केंद्रप्रमुख संपत जाधव यांनी दिली.

निवृत्त मुख्याध्यापक अंभोरे यांचे निधन
कोल्हार, २३ जुलै/वार्ताहर
येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व कासार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनीराज दत्तात्रेय अंभोरे (गुरुजी) यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, चार विवाहित मुली असा मोठा परिवार आहे. कोल्हार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश अंभोरे, भांडय़ाचे व्यापारी सुरेश तथा बाळासाहेब अंभोरे, राहाता तालुका कासार समाज संघटनेचे अध्यक्ष अविनाश अंभोरे यांचे ते वडील होत. सरपंच सुरेंद्र खर्डे, डॉ. संजय खर्डे, अशोकलाल आसावा, भास्करराव बोऱ्हाडे, शशिकांत कडूस्कर, पत्रकार दादासाहेब कोळसे, सुहास वैद्य, प्रमोद कुंभकर्ण, पाठक गुरुजी यांनी अंभोरे यांना श्रद्धांजली वाहिली. व्यापारी व कासार समाजाने व्यवहार बंद ठेवून दुखवटा व्यक्त केला.

शेवगावला शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत
शेवगाव, २३ जुलै/वार्ताहर
गेले सप्ताहभर तालुक्यात ढगाळ हवामान असून, बारीक भुरभुरीच्या स्वरूपात पाऊस अधूनमधून पडत आहे. शेतकरी अद्यापि जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यापासून तालुका आभ्राच्छादित आहे. कोठेही जोरदार पाऊस पडत नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी पिके पिवळी पडत आहेत. त्यातच बारीक पाऊस चालू असल्याने खुरपण्या करता येत नाहीत. परिणामी शेतामध्ये तण वाढत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. आजवर अशाच स्वरुपाचा पाऊस झाल्याने कोठेही विहिरींना नवीन पाणी आलेले नाही. कपाशी, बाजरी, तूर ही पिके चांगल्या प्रकारे उगवली. मात्र, जोरदार पावसाशिवाय या पिकांना खते देणे अशक्य आहे. पावसाच्या या परिस्थितीने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कडबा पंधराशे रुपये शेकडा, तर बाजरीचे सरमाड चारशे रुपये शेकडय़ांपर्यंत महागल्याने जनावरांना अक्षरश अर्धपोटी ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

‘नव्या ईदगाह मैदानासाठी जमीन उपलब्ध करून देऊ’
कोपरगाव, २३ जुलै/वार्ताहर

नगरपालिकेत सत्तांतर झाले आहे. पालिकेच्या माध्यमातून मुस्लीम समाजासाठी नव्या ईदगाह मैदानासाठी जमीन उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही आमदार अशोक काळे यांनी दिली.
स्थानिक विकास निधीतून ३ लाख ५० हजार रुपये खर्चाच्या खडकी ते मदरसा रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मालेगावचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल होते. या वेळी माजी नगराध्यक्ष बाबूराव गवारे, जगन्नाथ आढाव, संजय सातभाई, दत्तोबा जगताप, नगराध्यक्ष उज्ज्वला जाधव, उपनगराध्यक्ष मीनल खांबेकर, विजय आढाव, सतीश कृष्णानी, अनिल जाधव आदी उपस्थित होते. भारतातील प्रत्येक मुस्लिमाला देशाबद्दल अभिमान असून, मदरशांमधून सर्वधर्माची शिकवणूक दिली जाते. या वेळी प्रतोद डॉ. अजेय गर्जे यांचे भाषण झाले. मौलाना अबुझर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केले.

नाटय़गृहाच्या निर्णयाचे नाटय़ परिषदेतर्फे स्वागत
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

नाशिक महसूल विभाग पॅकेजअंतर्गत नगरला नाटय़गृह मंजूर करण्याच्या निर्णयाचे अ. भा. नाटय़ परिषद, नगर शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. परिषदेतर्फे गेली अनेक वर्षे या नाटय़गृहासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शाखाध्यक्ष सतीश लोटके, तसेच सर्वश्री. राहुल भिंगारदिवे, मोहनीराज गटणे, शशिकांत नजान, श्रेणिक शिंगवी, रियाज पठाण, क्षीतिज झावरे आदी रंगकर्मीनी किमान आता तरी महापालिकेने लवकर हे काम मार्गी लागावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. परिषदेच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

महालक्ष्मी आईची यात्रा रामवाडीत उत्साहात
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

रामवाडी येथे महालक्ष्मी आईची यात्रा उत्साहात पार पडली. मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते. यात्रेचे संयोजक भाऊसाहेब उडाणशिवे व नगरसेविका गीरिजा उडाणशिवे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. जलाभिषेकासाठी परिसरातील ५१ भाविकांनी प्रवरासंगम येथून कावडीने गंगेचे पाणी आणले होते. पोतराजांचे नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले. नगरसेवक नज्जू पहिलवान यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र बँकेच्या सहायक महाव्यवस्थापकपदी देशपांडे
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

महाराष्ट्र बँकेचे येथील सहायक महाव्यवस्थापकपदावर पी. एन. देशपांडे यांची बढतीवर नियुक्ती झाली. त्यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली. यापूर्वीचे विभागीय व्यवस्थापक दयानंद पै यांची पुणे येथे बदली झाली. देशपांडे यांना बँकिंग क्षेत्राचा ३१ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते उत्कृष्ट वक्ते असून, बँकिंग, क्रेडिट, औद्योगिक संबंध या विषयांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी यापूर्वी नांदेड, सोलापूर, पुणे, दिल्ली येथे काम केले आहे. सन २००२ ते २००८ दरम्यान त्यांनी अधिकारी प्रतिनिधी म्हणून बँकेच्या संचालक मंडळावर काम केले.

‘वर्षभरातच रस्ते उखडले; ठेकेदार, अभियंत्यांची चौकशी करा’
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

दोन वर्षाची हमी घेऊन महापालिकेने तयार केलेले रस्ते एका वर्षातच उखडले असून, त्याबद्दल संबंधित ठेकेदार व त्यांना दर्जेदार काम केल्याचे प्रमाणपत्र देणारे मनपाचे अभियंते यांची चौकशी करावी, अशी मागणी हरजितसिंग वधवा यांनी आयुक्तांकडे केली. प्रेमदान चौक ते प्रश्नेफेसर कॉलनी, गुलमोहोर रस्ता ते टीव्ही सेंटर रस्ता, टीव्ही सेंटर ते झोपडी कॅण्टिन, गोविंदपुरा, मुकुंदनगरमधील अंतर्गत रस्ते अशी १ वर्षात खराब झालेल्या रस्त्यांची यादीच वधवा यांनी आयुक्तांकडे सादर केली आहे. करदात्या नगरकरांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी यात झाली असून, चौकशीअंती दोषी असणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यांकडून या रकमेची वसुली करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

स्टेट बँक पेन्शनर्स संघटनेची वार्षिक सभा
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

स्टेट बँक पेन्शनर्स संघटनेची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा सावेडी येथील आम्रपाली हॉल येथे नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. गोखले होते. संघटनेचे सल्लागार दांडेकर यांनी सदस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. बँक अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. स्वागत संघटनेचे सचिव चंद्रकांत गुजराथी यांनी केले. आभार शीतल पटवर्धन यांनी मानले. नंतर पवन नाईक यांचा संगीत रजनी कार्यक्रम झाला. कार्यक्रमास आर. एन. ललिंगकर, पी. एम. नारकर, व्ही. पी. भावे, एस. पी. देसाई, एस. बी. गोखले, भरत गुप्ते, एस. पी. बर्वे आदी उपस्थित होते.

पोलिसांना लुटणाऱ्या आत्मशा याला अटक
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी
पोलिसांना लुटणाऱ्या आत्मशा सावत्या भोसले (वय २५, रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) याला गुन्हे शाखेच्या व नगर तालुका पोलिसांच्या पथकाने आज कामरगाव शिवारात पकडले. शनिवारी रात्री कामरगाव घाटात गस्त घालणारे पोलीस भाऊसाहेब काळे, अंकुश ढवळे व काही ग्रामस्थांना लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या वेळी पोलिसांनी एकास पकडले, पण बाकीचे चोरटे पळून गेले होते.गुन्हे शाखेच्या पथकाने आज आत्मशाला अटक केली. तसेच नगर तालुका हद्दीत घडलेले १७६/०७ व १७६/०८ या क्रमांकाने दाखल असलेल्या दरोडा प्रकरणात संशयित आहे. नगर तालुका ठाण्याचे निरीक्षक बापूसाहेब महाजन, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कंजे, पोलीस सुनील चव्हाण, दीपक हराळ, अशोक रक्ताटे, सुनील गवळी, विष्णू भागवत, अर्जुन दहिफळे, संजय खंडागळे व नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.

चंदनाची दोन झाडे चोरटय़ांनी लांबवली
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

शेतातील दोन चंदनाची झाडे काल रात्री चोरांनी तोडून नेली. केडगाव येथील भूषणनगर भागात ही घटना घडली. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या झाडांची किंमत दोन हजार रुपये आहे. शशिकांत कांबळे (६० वर्षे रा. भूषणनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली. तपास उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.

अंजनाबाई चितळकर यांचे वृद्धापकाळाने निधन
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

अंजनाबाई नानासाहेब चितळकर यांचे हाकेवाडी (ता. पाथर्डी) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८० वर्षाच्या होत्या. निवृत्त मुख्याध्यापक सीताराम चितळकर व नगरचे बांधकाम व्यावसायिक शिवराम चितळकर यांच्या त्या मातुश्री होत. त्यांच्या मागे पती, ३ मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

पांढरी पूल परिसरात ८ फूट लांबीचा अजगर पकडला
सोनई, २३ जुलै/वार्ताहर

मुळा साखर कारखान्याचे सुरक्षाधिकारी सर्पमित्र डॉ. प्रवीण चौधरी यांनी आज सकाळी पांढरीपूल डोंगर पायथ्यानजीक रॉक पायथन जातीचा अजगर पकडला. घाटावरच्या मारुतीच्या दर्शनास जातना डॉ. चौधरी यांना डोंगर पायथ्याला एका खडकावर अजगर दिसला. त्यांनी लगेचच तिकडे धाव घेऊन मोठय़ा कौशल्याने या अजगरास पकडले. आठ फूट लांबीचा असलेला हा अजगर चौदा किलो वजनाचा आहे. डोंगर भागातील खडक व दगडाच्या मोठय़ा कपारीत रॉक पायथन जातीचा अजगर आढळतो. या अजगरास श्री. चौधरी व वन विभागाचे एस. ई. ढेरे यांनी पुन्हा डोंगर भागात सोडून दिले.

स्टेट बँक अधिकाऱ्यांचा ६ व ७ ऑगस्टला संप
नगर, २३ जुलै/प्रतिनिधी

बँक अधिकाऱ्यांच्या वेतन करारासंदर्भात अर्थ मंत्रालयाने नकारात्मक भूमिका घेतल्याने ६ व ७ ऑगस्ट रोजी संप करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया स्टेट बँक ऑफिसर्स फेडरेशनचे संयुक्त सरचिटणीस व्ही. डी. देशपांडे यांनी दिली. येथील स्टेट बँक अधिकारी संघटनेच्या विभागीय मेळाव्यात देशपांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे अध्यक्ष दिगंबर वाघमारे होते.