Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

नवनीत

इसवी सनाच्या सुमारे ४७ वर्षांपूर्वी जेव्हा ज्युलियस सीझरच्या हस्ते एका लढाईत इजिप्तमधील अलेक्झांड्रियाचे ग्रंथालय उद्ध्वस्त करण्यात आले. जेथे सुमारे सात लाख ग्रंथ, हजारो बखर, ताम्रपत्र इ. वस्तू होत्या. त्याचे अवशेष सुमारे दोन हजार वर्षांपर्यंत तेथेच पडून राहिले. मागील शतकात इजिप्त सरकार आणि फ्रान्सच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथालयाच्या पुनर्उभारणीचे काम हाती घेण्यात आले आणि जगातील एक अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक इमारत तेथे बांधण्यात

 

आली. भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर स्थित एका लगूनच्या कडेला बांधण्यात आलेली अशी सहा मजली अजब इमारत मी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. अजब अशाकरिता की, इमारतीचा तळमजला लगूनच्या पाण्याला भिडलेला आहे. लगूनच्या कडेला उभे राहून इमारत पाहिली की, तळमजल्यापासून सहावा मजला एका दृष्टिक्षेपात एका विशाल काचेरी घसरगुंडीसारखा दिसतो. कारण इमारतीचे संपूर्ण छत फायबरच्या जाड काचेने आच्छादित करण्यात आले आहे. इमारतीच्या कुठल्याही मजल्यावर आत जाऊन पाण्याला पाहिले तर वाटते की, आता लाटा आत येतील. ग्रंथपालाची खोली सहाव्या मजल्याच्या मध्यभागी आहे. तिथे बसल्यावर संपूर्ण ग्रंथालय डोळय़ांसमोर असते. कुठे काय चालले आहे हे पाहण्याकरिता ग्रंथपालाला क्लोज सर्किट कॅमेऱ्याची आवश्यकता नाही. ग्रंथालयाच्या मुख्य द्वारावर एक अर्धवर्तुळाकार विशाल भिंत आहे. ज्यावर जगात लिहिल्या जाणाऱ्या हजारो भाषांची प्रथमाक्षरे म्हणजे ‘अ’ किंवा ‘अलिफ़’ किंवा ‘अल्फ़ा कोरलेले आहेत. वारंवार प्रयत्न करूनसुद्धा आपल्या भाषेतला ‘अ’ तेथे पाहावयास मिळाला नाही. हजारो मुळाक्षरांमधून नजरचुकीने निरीक्षणात आला नसेल तर सांगता येत नाही. या ग्रंथालयात ५० लाख पुस्तके, शिवाय लाखो सीडी, फ्लॉपीन आणि मायक्रो फिती आहेत. ज्यांचे वेगवेगळे आगार आहेत, तसेच पाच हजार हस्तलिखित ग्रंथ (पांडुलिपी) आहेत. अधिकतर पुस्तके अरेबी, इंग्रजी, पर्शियन, इटालियन, जपानी, रोमन वगैरे भाषांमधून आहेत. ग्रंथालयात काम करणाऱ्या संशोधकास असे वाटते की, जणू काही आपण पाणी आणि आकाशाच्या दरम्यान बसून काम करीत आहोत.
अनीस चिश्ती

पृथ्वी स्वत:भोवती फिरायची अचानक थांबली तर त्याचे काय परिणाम होतील?
असं काही घडण्याची अजिबात शक्यता नाही. पण तरीही पृथ्वीचं स्वत:भोवती फिरणं अचानकपणे थांबलं तर पृथ्वीवर हलकल्लोळ माजेल. समजा, आपण एखादी गोफण वेगानं फिरवत आहोत. अशावेळी जर गोफणीची दोरी अचानक तुटली तर गोफणीचा दगड त्या वर्तुळाच्या परिघाला लंब दिशेनं फेकला जाईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या वस्तू गोफणीच्या दगडांप्रमाणे वर्तुळाकार फिरत असतात. ही गती त्यांना अर्थातच पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे आलेली असते. पृथ्वीची ही गती जर अचानक नाहीशी झाली तर पृथ्वीवरच्या सगळय़ा वस्तू क्षणार्धात वातावरणात फेकल्या जातील. त्यांचा वेग ताशी सुमारे १७६० कि.मी. एवढा प्रचंड असेल. पृथ्वीवरचं २४ तासांचं दिवस-रात्रीचं चक्र अर्थातच संपुष्टात येईल. त्याऐवजी सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र असा विलक्षण अनुभव येईल. सूर्य सहा महिने सतत तळपत राहिल्यानं तापमानात प्रचंड वाढ होईल. ज्या प्रदेशावर सूर्यकिरणे लंबरूपात पडतील तेथे अधिक तापमान निर्माण होईल. त्यामुळे त्या भागातील हवा जास्त तापेल. तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन इतर भागातून त्या भागाकडे जोरदार वारे वाहू लागतील. पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याचा एक परिणाम म्हणजे चुंबकीय क्षेत्राची निर्मिती. हे परिभ्रमणच थांबलं तर चुंबकीय क्षेत्रही हळूहळू क्षीण होत जाईल. ध्रुव प्रदेशात दिसणारा अनोखा ध्रुवीय प्रकाश दिसेनासा होईल. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र तिच्यासाठी एक संरक्षक कवच आहे. अंतराळातून येणारे विद्युतभारित कण आणि सौर वारे यापासून पृथ्वीचं रक्षण करण्याचं काम हे क्षेत्र करीत असतं. पृथ्वी थांबली तर हे कवचही नाहीसं होईल व पृथ्वीला या कणांच्या तीव्र माऱ्याला तोंड द्यावे लागेल.
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

विप्रो कंपनीचे संचालक अझीम प्रेमजी यांचा जन्म मुंबईत २४ जुलै १९४५ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचा अमळनेर येथे वनस्पती तुपाचा छोटा कारखाना होता. अमेरिकेत शिकत असणाऱ्या अझीमभाईंना खरंतर नोकरी करायची होती जागतिक बँकेत. पण वडिलांच्या अकाली निधनानंतर कंपनीची धुरा वाहण्याचे ठरवले. कंपनीची आज तीन हजार कोटींच्या वर उलाढाल गेली आहे.
तेल बनवणाऱ्या या कंपनीने अमेरिकेच्या ‘जनरल इलेक्ट्रिकल’ या कंपनीशी भागीदारी करून विजेच्या दिव्यांचे उत्पादन सुरू केले. यानंतर साबण, शाम्पू, पावडर या ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात सुरू केले. काळाची पावले ओळखून अझीमभाईंच्या विप्रोने संगणकाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. आज संगणक क्षेत्रात विप्रो ही एक आघाडीची कंपनी असून, १४ हजार कर्मचारी आहेत. फोब्र्ज मासिकाने जगातल्या १० श्रेष्ठ उद्योजकांमध्ये त्यांची निवड केली आहे. ‘बिझनेस वीक’ने भारतीय तंत्रज्ञानाचा राजा असा त्यांचा सन्मान केला आहे. भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याचे सदस्य असणाऱ्या अझीमभाईंना अनेक मान्यवर विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन गौरवले आहे.
संजय शा. वझरेकर

मायाला दहावीच्या परीक्षेत ९० टक्के मार्क पडले होते. शहरातल्या तिच्या काका-काकूंना केवढे कौतुक वाटले. लिंबवडे गावासारख्या छोटय़ा ठिकाणी राहून मायाने हे यश मिळविले होते. शिवाय धाकटय़ा भावंडांचे करायचे, आईला विहिरीवरून पाणी भरणे, स्वयंपाक करणे, धुणेभांडी सगळय़ांत ती मदत करायची. काका-काकू आणि चार चुलतभावंडे पुण्यात राहात होती. सगळय़ांनी मायाला आग्रह करून बोलावले. दादा आणि आईही तिला म्हणाले, जाऊन ये आप्पाकाकांकडे पुण्याला. मायाला मात्र जरा संकोच वाटत होता. भीतीही वाटत होती. शहरातल्या राहणीमानाची, औपचारिकतेची, वागण्याच्या पद्धतींची आपल्याला सवय नाही, उगीच हसे होईल असे वाटून तिने जाणे टाळले. पण एके दिवशी तिला थोरला चुलतभाऊ राजा न्यायलाच आला, तसा मात्र तिचा नाईलाज झाला. पुण्यात आप्पाकाकांचे भलेथोरले घर, नोकरचाकर, भोवतालची बग, आलिशान गाडी सगळय़ांचेच तिला दडपण आले. पण मीरा, शुभदा, चेतन ही तिची भावंडे तिच्याशी फार समजुतीने वागायची. एखादी गोष्ट तिला ठाऊक नाही हे समजले की, तिला समजून सांगायची. तरी मायाला मात्र सारखी भीती वाटायची की, आपल्याला हसतील, आपली थट्टा करतील. आपण गावठी म्हणून आपल्याला बाहेर न्यायला त्यांना लाज वाटेल. धुण्याचे मशीन चालवता येत नाही म्हणून ती गुपचूप स्वत:चे कपडेही रोज धुवून टाकायची. तिला वाटे, मशीन कसे वापरायचे हे विचारायचं कसं! एका संध्याकाळी मीरा, शुभदा, चेतनने ‘बरिस्टा’मध्ये कॉफी प्यायला मित्रमैत्रिणींना बोलावले. मायालाही आग्रह करून ते बरोबर घेऊन गेले. प्रत्येकाने स्वत:ला हवी असलेली कॉफी सांगितली. गोंधळलेल्या मायाने मेन्युकार्डमध्ये सगळय़ांत कमी किंमत असलेली कॉफी पाहून तिच्यावर बोट ठेवले. थोडय़ाच वेळात कडू, काळी आणि दोन-तीन घोटभर कॉफी समोर आली. मायाने वेडीवाकडे तोंड करीत कॉफी कशीबशी पिऊन टाकली. तिच्या मनात आले, आपण कुठली कॉफी घ्यायची ते शुभदाला विचारले असते तर? आपल्याला एखादी गोष्ट ठाऊक नाही हे कबूल करणे कठीण असते. पण माहीत नाही ते विचारणे यात कमीपणा वाटण्याचे कारण नाही. दुसऱ्याला प्रश्न विचारल्याने नवी माहिती मिळते.
संकल्प : मी प्रश्न विचारेन.
ज्ञानदा नाईक

dnyanadanaik@hotmail.com