Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गव्हाचा काळाबाजार करणारे अटकेत
नवी मुंबई, (प्रतिनिधी) गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी रेशनवर दिल्या जाणाऱ्या गव्हाची काळ्या

 

बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला वाशी पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मालाड येथील गोदामातून हा गहू कोल्हापूर येथे विक्रीसाठी नेण्यात येत होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासकीय गोदामातून अशा प्रकारे गव्हाची पोती बाहेर पडलीच कशी, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला असून या प्रकरणी राज्याच्या शिधावाटप यंत्रणेतील काही वरिष्ठ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. अन्नधान्याचा काळाबाजार करणारे एक मोठे रॅकेट या तपासातून उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास आता नवी मुंबई पोलीस कशा पद्धतीने करतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
मारुती महाडिक, विलास होस्के, चंद्रकांत माने, येदू चव्हाण, संभाजी कदम या पाच जाणांच्या टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती नवी मुंबईचे नवे पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी वृत्तान्तला दिली. यापैकी चौघे मुंबईतील मालाड येथील रहिवासी असून चंद्रकांत माने यास सांगली येथून ताब्यात घेण्यात आले आहे, असे दिघावकर यांनी सांगितले. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर चौगुले तसेच रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दातार यांना मुंबईहून मोठय़ा प्रमाणावर गहू काळ्याबाजारात विकण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराड यांच्या नेतृत्वाखाली वाशी खाडीपुलाजवळील टोल नाक्यालगत पोलिसांनी एक ट्रक अडविला. यामध्ये गव्हाची ६३७ पोती आढळून आली. या सर्व पोत्यांवर फू ड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे सील आढळून आले आहेत, अशी माहिती दिघावकर यांनी दिली. शासकीय गोदामातून हा गहू बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व पोती कोल्हापूर येथे काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होती, हे स्पष्ट झाले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गव्हाची पोती शासकीय गोदामातून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाल्याने यामध्ये आणखी कुणाचे साटेलोटे आहेत का, याचा तपास केला जात आहे, असे दिघावकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी राज्याच्या शिधावाटप यंत्रणेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशीही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.