Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सुशिक्षित घरातील मुले खूनप्रकरणी गजाआड!
पनवेल/प्रतिनिधी - चांगल्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील चार तरुणांना पनवेल शहर पोलिसांनी

 

एका खूनप्रकरणी अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विंचुबे गावातील गणपत म्हात्रे (५२) यांचा १७ जुलै रोजी पनवेलमध्ये खून झाला होता, पोलिसांनी अल्पावधीमध्ये तपास करून याप्रकरणी बादल पेंडसे (२२), अविनाश साफल्य (१९, दोघेही रा. दत्तगुरू अपार्टमेंट, पनवेल), सूरज राणे (२३, रा. जयनगर सोसायटी, पनवेल) आणि सुमित कदम (२३, रा. बापटवाडा) या चौघांना बुधवारी अटक केली. या चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पनवेल परिसरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना गणपत म्हात्रे हे गांजा, चरस आदी अमली पदार्थ विकायचे असा आरोप होता. त्यांची ही बेकायदा कृत्ये या तरुणांना माहीत असल्याचा संशय आता व्यक्त केला जात असून, त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूने या तरुणांनी आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी म्हात्रे यांना मोटारसायकलवरून पळवून नेले. कर्नाळा क्रीडासंकुलाच्या परिसरात आणल्यानंतर या तरुणांनी म्हात्रे यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील ७०० रुपये घेऊन पलायन केले. त्यानंतर १८ जुलै रोजी सकाळी अमरधामसमोरील गॅस पंपाजवळ म्हात्रे यांचा मृतदेह पोलिसांना आढळला. हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी या तरुणांच्या मोटारसायकलच्या अर्धवट क्रमांकाच्या आधारे गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता मिळविला आणि या चौघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार फरारी असल्याचे समजते.
म्हात्रे यांना मारहाण करण्यापूर्वी या चारही तरुणांनी मद्यप्रश्नशन केले होते, असेही उघड झाले आहे. गांजाच्या खरेदी-विक्रीत त्यांचाही काही सहभाग होता का, यादृष्टीने आता तपास सुरू आहे.
दरम्यान, चांगल्या घरातील तरुणांनी खून करण्यापर्यंत मजल मारावी, याबाबत केवळ नागरिकांमध्येच नाही, तर पोलिसांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. यातील काही तरुण राजकीय पक्षांशीही संबंधित असल्याने त्या पक्षांच्या प्रतिमेवरही याचा परिणाम होणार आहे. आपला मुलगा कोठे जातो, त्याला कोणाची संगत आहे, त्याची दिनचर्या काय आहे, याकडे पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे, असे मत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केले.