Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पनवेलमधील सराफांमध्ये घबराट
पनवेल/प्रतिनिधी - अत्यंत गजबजलेल्या परिसरातील जयभारत नाक्याजवळील अंकित ज्वेलर्स या

 

दुकानातून बुधवारी रात्री दोघा तरुणांनी सव्वादोन लाख रुपयांचे दागिने लुटून पलायन केले. या घटनेमुळे येथील सोने-चांदीच्या विक्रेत्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास या पेढीत दाखल झालेल्या दोघा तरुणांनी ब्रेसलेट दाखविण्याची मागणी केली. दुकानमालकाने पुढय़ात ठेवलेल्या ब्रेसलेटपैकी पाच नग या दोघांनी उचलले आणि मालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पलायन केले. ही ब्रेसलेट प्रत्येकी दीडशे ग्रॅम वजनाची असून, त्यांची एकूण किंमत सव्वा दोन लाख असल्याचे समजते. विशेष म्हणजे या दुकानपासून शहर पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असूनही या चोरांच्या धाडसाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. कापड गल्ली, जोशी आळी, गांधी मार्ग येथे मिळून १०० हून अधिक सराफांची दुकाने आहेत. सराफांना दिवसाढवळ्या लुटण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून, याचा निषेध करण्यासाठी या व्यापाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी एक दिवसाचा बंदही पुकारला होता. गेल्या आठवडय़ात झालेले तीन खून, चोरीच्या असंख्य घटना यामुळे पनवेलमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याचे दिसत आहे.