Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

किनारपट्टय़ांवर सशस्त्र पोलीस दल तैनात
उरण/वार्ताहर - परदेशी जहाजातून समुद्रमार्गे अतिरेकी अत्याधुनिक शस्त्रसाठय़ांसह उतरणार

 

असल्याची खबर मिळताच उरण पोलिसांनी सागरी किनारपट्टीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून सशस्त्र पोलीस दल तैनात केले आहे. समुद्रकिनारपट्टीची पाहणी करीत डीसीपी अशोक दुधे, एसीपी बी.एन. शिरसाठ यांनी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
घातपाती कारवाई करण्यासाठी उरण समुद्रकिनाऱ्यावरून सशस्त्र अतिरेकी उतरणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या विश्वसनीय खबऱ्यांकडून मिळाली होती. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून बुधवारी उरण पोलिसांनी उरण परिसरातील किनारपट्टय़ांची पाहणी केली. तसेच उरण, न्हावा-शेवा, मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजा, मोरा, केगाव, नागाव, पीरवाडी, गव्हाण, न्हावा, पाणजे, डोंगरी आदी गावाच्या किनारपट्टीवर सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
बुधवारी दुपारपासूनच डीसीपी अशोक दुधे, एसीपी बी.एन. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संभाव्य किनारपट्टय़ांवर कसून तपासणी केली, मात्र या ठिकाणांवर संशयास्पद असे काहीही आढळले नाही, तरीही खबरदारीची उपाययोजना म्हणून या किनारपट्टय़ांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, काल रात्री ११ वाजेपर्यंत वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवर उरणमध्ये सहा अतिरेकी ताब्यात घेतल्याच्या बातम्या झळकू लागल्या होत्या. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते, मात्र असा कोणताही प्रकार घडला नसून, ही अफवाच असल्याची माहिती एसीपी शिरसाठ यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.