Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

एमएमआरडीए पाच धरणे विकसित करणार!
प्रतिनिधी - सूर्या धरणामधील पाण्यापैकी १५ टक्के हिस्सा मिळाल्यामुळे एमएमआरडीएने मुंबई, नवी मुंबई वगळता पाच महानगरपालिका व १३ नगरपालिका क्षेत्रातील पाण्याचे नियोजन करण्याचे ठरविले असून येत्या १० वर्षात इतर पाच धरणे विकसित करण्याचे ठरविले आहे. या धरणांच्या विकासासाठी एमएमआरडीएने दरवर्षी ४०० कोटी रुपयांप्रमाणे चार हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवली आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. एमएमआरडीए आता निव्वळ पायाभूत सुविद्यांपुरती मर्यादित न राहता पाणी आणि वीज यांसारख्या मुंबईला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीही पुढाकार घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गव्हाचा काळाबाजार करणारे अटकेत
नवी मुंबई, (प्रतिनिधी) गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी रेशनवर दिल्या जाणाऱ्या गव्हाची काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला वाशी पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मालाड येथील गोदामातून हा गहू कोल्हापूर येथे विक्रीसाठी नेण्यात येत होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासकीय गोदामातून अशा प्रकारे गव्हाची पोती बाहेर पडलीच कशी, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला असून या प्रकरणी राज्याच्या शिधावाटप यंत्रणेतील काही वरिष्ठ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

सुशिक्षित घरातील मुले खूनप्रकरणी गजाआड!
पनवेल/प्रतिनिधी - चांगल्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील चार तरुणांना पनवेल शहर पोलिसांनी एका खूनप्रकरणी अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विंचुबे गावातील गणपत म्हात्रे (५२) यांचा १७ जुलै रोजी पनवेलमध्ये खून झाला होता, पोलिसांनी अल्पावधीमध्ये तपास करून याप्रकरणी बादल पेंडसे (२२), अविनाश साफल्य (१९, दोघेही रा. दत्तगुरू अपार्टमेंट, पनवेल), सूरज राणे (२३, रा. जयनगर सोसायटी, पनवेल) आणि सुमित कदम (२३, रा. बापटवाडा) या चौघांना बुधवारी अटक केली. या चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मृत कामगाराच्या कुटुंबियांना मदत
उरण - येथील जीटीआय कंपनीतील मृत कामगार विक्रम घरत यांच्या कुटुंबियांना नवी मुंबई जनरल कामगार संघटनेने एक दिवसाचे वेतन देऊन आर्थिक मदत केली. या आर्थिक मदतीतून ७६ हजारांची विमा पॉलिसी त्यांच्या एक वर्षाच्या मुलाच्या नावे काढण्यात आली. ही विमा पॉलिसी मृत कामगाराची पत्नी रंजना यांच्याकडे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. विक्रम यांचे एनएनएमटीच्या अपघातात निधन झाले होते.

कोपरखैरणे येथे घरफोडी
बेलापूर - दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी घरातील ४६ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी फिर्यादी सुरेश राघवन यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राघवन हे घराबाहेर गेले असताना ही चोरी झाली.

एकटय़ा महिलांना लुटण्याचे प्रकार सुरूच
बेलापूर - कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळून तोतया पोलिसांनी एका वयोवृद्ध महिलेचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली. सावित्रीबेन भानुशाली असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. सावित्रीबेन या दुपारी दोनच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना स्वत: पोलीस असल्याचे सांगितले. पुढे तपासणी सुरू असल्याचे सांगून तुमचे दागिने पिशवीत काढून ठेवा, असे या तोतया पोलिसांनी सावित्रीबेन यांना सांगितले. सावित्रीबेन यांनी दागिने काढून पिशवीत ठेवत असताना चोरटय़ांनी त्यांचे दागिने चोरले. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नौदल कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी
उरण - महिलेला मारहाण केल्याप्रकरणी नौदल कर्मचारी ऋषीपाल जयस्वाल यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उरणमधील जागरूक महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. उरण पार्क सोसायटीत रविवारी खेळण्यावरून झरिना बुबेरे आणि नौदल कर्मचारी व सोसायटीचे सेक्रेटरी ऋषीपाल जयस्वाल यांच्यात वाद झाला. बाचाबाचीवरून प्रकरण हमरीतुमरी व हातघाईवर आले आणि जयस्वाल यांनी बुबेरे यांना मारहाण केली. यासंबंधात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही जयस्वाल यांना अटक केली. त्यानंतर त्यांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. मात्र पोलिसांनी योग्य प्रकारे गुन्हा दाखल करून कलमे लावली नसल्याने उरणमधील जागरूक महिलांनी पोलिसांना जाब विचारण्यासाठी मंगळवारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. उरण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा नाहिदा ठाकूर, अ‍ॅड. कांचन कशाळकर यांच्यासह २० महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन जयस्वाल यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी या महिलांना दिले.

१७ बांगलादेशींना अटक
पनवेल - पनवेलजवळील आदई गावातून पोलिसांनी बुधवारी रात्री १७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये चार पुरुष, नऊ महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर ‘फॉरेन अ‍ॅक्ट’खाली कारवाई करण्यात येणार आहे. आदई गावातील चाळींमध्ये हे बांगलादेशी दरमहा ७०० ते ८०० रुपये भाडे देऊन राहत होते. यातील काही जण मजुरीचे, तर काही जण किरकोळ कामे करतात. या चाळींच्या मालकांनी पोलीस ठाण्यात भाडेकरूंविषयी माहिती सादर न केल्याने त्यांच्यावरही कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.

उरणमध्ये गटारी उत्साहात
उरण - उरणमध्ये गटारीचा आनंद सर्वानीच लुटला. काही जणांनी मासळी, मटण, पर्यटनस्थळी, धबधबे, धरण, सागरी किनारे या ठिकाणी जाऊन गटारींचा आनंद लुटला. गटारीप्रसंगी कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.