Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नाशिक जिल्ह्य़ात मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ
दीड महिन्यात आढळले ४२४ रुग्ण
किरण जाधव / नाशिक

शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यांनी डासांना पोषक

 

वातावरण उपलब्ध करून दिले असून त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दीड महिन्यात जिल्ह्य़ात मलेरियाचे तब्बल ४२४ रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण शंभरहून अधिक आहे. हे रुग्ण प्रश्नमुख्याने निफाड, ओझर, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी या भागात आढळून आले आहेत. या पाश्र्वभूमीवर, नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात पाण्याची डबकी साचणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच जर साचली तर औषध फवारणीसाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
डासांपासून होणाऱ्या मलेरिया या रोगावर उपाययोजना करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जात असताना अद्याप त्याचे अस्तित्व शहरी व ग्रामीण भागात अधोरेखीत होत आहे, हे विशेष. मलेरिया हा डासांच्या प्रश्नदुर्भावातून वाढणारा रोग. डबक्यात साचलेल्या पाण्यामध्ये या डासांच्या उत्पत्तीला बळ मिळते. मलेरियाचा डास डबक्यांमध्ये अंडी घालतो. संपूर्ण जिल्ह्य़ात डासोत्पत्तीची तब्बल ७३ हजार १६३ स्थाने असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डी. एम. गीते यांनी दिली. नाशिक जिल्ह्य़ात डासांची उत्पत्ती वाढण्यामागे पावसामुळे जागोजागी निर्माण झालेली डबकीच प्रश्नमुख्याने कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिक जिल्ह्य़ात यंदा एक जून ते २२ जुलै या कालावधीपर्यंत ४२४ मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत रुग्णांचे प्रमाण ३०४ होते. या आकडेवारीवरून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १२० ने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १५९ रुग्ण आढळून आले आहे. या पाश्र्वभूमीवर, मलेरिया नियंत्रण केंद्राने ठिकठिकाणी उपाययोजना हाती घेतल्याचे सांगण्यात आले.
मलेरियाच्या डासांची प्रजनन शक्ती रोखण्यासाठी साठविलेल्या पाण्यात डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याचे प्रयोग सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर प्रमाणात राबविले जात आहेत. अशा प्रकारचे गप्पी मासे पैदास करण्याची संपूर्ण जिल्ह्य़ात ७१७ केंद्र असून आदिवासी, बिगर आदिवासी व शहरी अशा तीन स्तरावर मलेरिया नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्ह्य़ात एकूण १५ तालुक्यात १३७३ ग्रामपंचायती, आठ नगरपरिषद व दोन महापालिका येतात. त्यामध्ये १०३ प्रश्नथमिक आरोग्य केंद्र तर ३७७ उपकेंद्र आहेत तर जिल्ह्य़ात एकूण २७ ग्रामीण रुग्णालय असून २७४ ताप उपचार केंद्र आहेत. आरोग्य केंद्रामार्फत रुग्णांचे सर्वक्षण केले जात आहे. ग्रामीण भागातून पंधरा दिवसातून एकदा तर आदिवासी भागात आठ दिवसातून एकदा सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे गीते यांनी सांगितले. जिल्हा मलेरिया नियंत्रण केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षणांतर्गत मनमाड येथे डेंग्युचा एक रुग्ण आढळून आहे.
मलेरियाच्या डासांची उत्पत्ती प्रश्नमुख्याने छोटे बंधारे, शेततळे, हलकासा पाऊस झाल्यानंतर खडकाखाली व सखल भागात कायम साचून राहणारी पाण्यात होत असते. अशी जागा शोधण्याचे व त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे काम मलेरिया नियंत्रण विभागाकडून केले जात आहे. ग्रामीण भागात मलेरियाच्या रुग्णांची चाचणी करून अचूक निदान होण्यासाठी ‘रॅपिड डायग्नोस्टिक किट’चा वापर करून प्रभावी उपाय केले जात आहे.
डेंग्यूच्या निदानासाठी सुविधा
डेंग्यू तापाचे निदान करताना होणारा कालापव्यय लक्षात घेऊन त्याच्या तपासणीकरिता नाशिक व धुळे येथे नुकतीच विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजाराच्या नियंत्रणाकरिता ‘इलायज टेस्ट’ नावाची नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी डेंग्यू सदृष्य रोगांचे निदान हे केवळ पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेमार्फत केले जात होते. तथापि, त्या करिता बराच वेळ खर्च होत होता. ही बाब लक्षात घेऊन या रोगाचे निदान करण्यासाठी राज्यात काही ठिकाणी ही खास यंत्रणा उभारण्यात आली आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयाबरोबर धुळे येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी डेंग्यू रोगाची तपासणी सुरू झाली असली तरी १०० चाचण्या केल्यानंतर त्यातील १० ते १२ टक्के चाचण्यांची पूनर्पडताळणी राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेकडे पाठविण्याची तरतूद नियमावलीत असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले.