Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

जोरदार पावसाने धरणसाठय़ांत वाढ
* इगतपुरी तालुक्यातील ३८ गावांचा संपर्क खंडित
* गंगापूर धरण निम्मे भरले
* पाणी कपातीच्या संकटातून मुक्तता होण्याची चिन्हे
* गोदावरी खोऱ्यातील धरणांमध्ये सरासरी ३४ टक्के जलसाठा
* जळगावच्या हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले
प्रतिनिधी / नाशिक
सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी नाशिक जिल्ह्य़ात पावसाने दमदार हजेरी कायम ठेवल्याने गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या जलसाठय़ात जलदगतीने समाधानकारक वाढ होत आहे. यंदा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या पहिल्याच समाधानकारक पावसाने गंगापूर धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर असून त्यामुळे नाशिक शहरात लागू केलेली २० टक्के पाणी कपातही लवकरच दूर होण्याची चिन्हे

 

आहेत. पावसाअभावी अनेक दिवसांपासून स्तब्ध असणारी गोदावरीही दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील दारणा व कडवा नद्यांना आलेल्या पुराने ३८ गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरातील भातशेती पूर्णत पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटात नवीन रस्त्यावर मातीचे ढिगारे व दगड खाली येवू लागल्याने वाहतुकीवर परिणाम होऊ नये या दृष्टीने दक्षता घेतली जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार येथे पावसाची रिपरिप सुरू असताना जळगाव जिल्ह्य़ात पावसाने पुन्हा जोर पकडल्याच्या परिणामी हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सलग पावणे दोन महिने ओढ देणाऱ्या पावसाने या हंगामात प्रथमच धुव्वांधार हजेरी लावल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यास पावसाने चांगलेच झोडपले आहे. गेल्या चोवीस तासात या भागात १७२ मिलिमीटर (आतापर्यंत एकूण १०१३ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली. परिसरातील नद्या व नाले अक्षरश दुथडी भरून वाहू लागले आहेत. बुधवारी मध्यरात्री काळुस्ते-घोटी मार्गावरील दारणा नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने कांचनगाव, काळुस्ते, भरवट, निरपण, कुरुंगवाडी, शेणवड बुद्रूक आदी १४ गावांशी संपर्क खंडीत झाला तर टाकेद येथील कडवा नदीच्या पुरामुळे पूर्व भागातील २४ गावांशी संपर्क तुटला आहे. दरवर्षी या भागात मुसळधार पावसामुळे थोडय़ाफार फरकाने अशी स्थिती निर्माण होत असते. यंदा पाऊस लांबल्याने मुसळधार पावसाची अनुभूती काहिशी विलंबाने मिळत आहे. इगतपुरी ते घोटी दरम्यानची सर्व शेती जलमय झाली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटात काही ठिकाणी पावसाने घाटातील माती व दगड खाली येण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवारी सकाळी कसारा घाटातील नवीन रस्त्यावर येणारी ही माती तातडीने बाजूला काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा कामाला जुंपली. या भागातील रस्ताही काही प्रमाणात खचला असला तरी वाहतूक सुरळीत असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.
इगतपुरीप्रमाणे त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात १५४ तर पेठ १६९, सुरगाणा १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मालेगाव ५०, नाशिक ४६, दिंडोरी ५३, चांदवड ५०, कळवण ४९, बागलाण ४१, निफाड ३२, सिन्नर २२, येवला १९, नांदगाव २८, देवळा २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ातील सर्व भाग पावसाच्या रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्य़ात १०१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दमदार पावसाने टंचाईचे संकटही निकाली काढले असून धरणांच्या जलसाठय़ात समाधानकारक वाढ होत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात शुक्रवारी सकाळी २,४३६ दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ४४ टक्के जलसाठा झाला असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास अजून एक दिवसात हे धरण निम्म्याहून अधिक भरेल असा अंदाज आहे.
दरम्यान, पावसाअभावी तळ गाठलेल्या गंगापूर धरणात जलसाठा वाढू लागल्याने पाणी कपातीचा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात, जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील दोन ते तीन दिवसात संबंधित विभागांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. सध्याच्या पावसाने धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला असल्याचे ते म्हणाले. पाणी कपातीचे संकट दूर होणार असल्याने नाशिककरांनाही दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्य़ासह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश धरणांच्या जलसाठय़ात समाधानकारक वाढ होत आहे. गोदावरी खोऱ्यातील धरणांची एकूण क्षमता ३८ हजार २६१ दशलक्ष घनफूट इतकी असून सध्या या सर्व धरणांमध्ये १२ हजार ८९९ म्हणजे ३४ टक्के जलसाठा असल्याची माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ यांनी दिली. गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण ११ हजार ९९८ दशलक्ष घनफूट म्हणजे ३२ टक्के होते. गुरूवारी दारणा धरणात ३३४३ दशलक्ष घनफूट, नांदूरमध्यमेश्वर २३१, पालखेड ५१४, करंजवण १३२३, ओझरखेड ५२०, वाघाड ९२०, कडवा ४३०, मुकणे १२३४, आळंदी २४०, तिसगाव १३२, काश्यपी २३८, पुणेगाव १४४, वालदेवी २५२, चणकापूर ७१६, केळझर १६०, हरणबारी ३३०, गिरणा २४८४ आणि गौतमी गोदावरीमध्ये ३८५ दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे.
उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्य़ात पावसाचा जोर कायम असून शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. संततधारेमुळे हतनुर धरणाचे ३६ दरवाजे उघडावे लागले. सततच्या पावसामुळे जळगावकरांना तो कधी विश्रांती घेता याची प्रतीक्षा आहे. गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने चार दिवसांपासून तडाखा दिला असून नद्या व नाले दुथडी भरून वाहू लागले आहे.
जिल्ह्य़ात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. वाघूर व बोरी धरणांच्या साठय़ातही चांगली वाढ झाली आहे. शहरातील कोरडा पडलेला मेहरूण तलाव निम्म्याहून अधिक भरला आहे. गुरूवारी सकाळी पावसाने काहिशी विश्रांती घेतल्यानंतर रस्त्यांवर बऱ्यापैकी गर्दी दिसू लागली. परंतु, काही वेळानंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ात पावसाची रिपरिप सुरू असली तरी त्याने म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. धुळे शहरात दुपारी तर उन पडले होते.