Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक
एनडीसीए विरुध्द एनसीए यांच्यातील वाद हा मुख्य मुद्दा
अविनाश पाटील / नाशिक

मुंबईसह इतर अनेक बडय़ा क्रिकेट संघटनांवर खेळाडूंपेक्षा राजकारणी मंडळींनीच अधिक

 

वर्चस्व प्रस्थापित केले असताना आतापर्यंत या ‘राजकीय लागण’ पासून दूर राहिलेली नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना येत्या निवडणुकीतही आपली ही प्रतिमा कायम ठेवण्यात यशस्वी होईल अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. गेल्या दोन निवडणुकांपासून जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी मांड ठोकलेले विनोद उर्फ धनपाल शहा यांच्याकडे आपल्या कारकिर्दीत रणजी सामन्यांच्या यशस्वी आयोजनाचा मान जात असला तरी नाशिक क्रिकेट अकॅडमीविरुध्दच्या वादविवादांच्या घेऱ्यात तेही सापडल्याने आगामी निवडणुकीत हाच महत्वाचा मुद्दा राहणार, हे निश्चित. त्यातच अकॅडमीचे सचिव यांनी व्यस्त निवडणूक कार्यक्रमाबाबतच संशय व्यक्त केला आहे.
जिल्हा क्रिकेट संघटनेची त्रवार्षिक निवडणूक एक ऑगस्ट रोजी होणार असून निवडणूक किती रंगतदार होईल, याची झलक मिळण्यासही सुरूवात झाली आहे. नाशिक क्रिकेट अकॅडमीचे सचिव मकरंद ओक यांनी निवडणूक जाहीर झाल्याचे आम्हांला वृत्तपत्रांमधूनच कळले, आपणास तसेच अनेक सदस्यांना अद्याप त्यासंदर्भात अधीकृतरित्या कळविण्यात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमावरही त्यांनी टीकास्त्र सोडले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवसाची मुदत मिळणे हे अनाकलनीय आहे. २४ जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, दुसऱ्या दिवशी लगेच अर्ज माघारी घेणे हा काय प्रकार आहे, सूचक कोण, अनुमोदक कोण, याविषयी उमेदवारांना विचार करण्यास वेळ देणार की नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. या सर्व कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होत नसल्याची तक्रारही आपण संघटनेचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्राव्दारे केली असल्याचेही ओक यांनी सांगितले. ओक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे नवीनच वाद उभा राहू पाहात आहे.
ओक यांनी ही खदखद व्यक्त करण्यामागे गेल्या पाच सहा वर्षापासून जिल्हा संघटनेबरोबर सुरू असलेल्या वादविवादांची पाश्र्वभूमि कारणीभूत आहे. प्रश्नरंभी किरकोळ वाटणाऱ्या वादाची परिणती पुढे थेट ओक हे सचिव असलेल्या नाशिक क्रिकेट अकॅडमीवर तीन वर्षासाठी बंदी घालण्यात झाली. २८ जानेवारी २००७ पासून अकॅडमी व तिच्या खेळाडुंवर लागू झालेली ही बंदी २०१० मध्ये उठेल. बंदी लागू झाली त्यावेळी सुयश बुरकूल, आशिष टिबरीवाल, अमीत पाटील यांच्यासह यंदा आयपीएल स्पर्धा गाजविणाऱ्या अभिषेक राऊत या रणजीपटूंचाही अकॅडमीच्या खेळाडुंमध्ये समावेश होता. अकॅडमीच्या खेळाडुंवर गैरवर्तणुकीमुळे बंदी घातल्याचे एनडीसीएचे म्हणणे आहे. बंदीनंतर अलिकडे ज्या खेळाडुंनी विनाशर्त माफी मागितली, त्यांची एनडीसीएकडून निवडही करण्यात आली. त्यामुळे एनडीसीए विरूध्द एनसीए यांच्यातील तप्त वातावरण निवळण्यास सुरूवात झाली आहे, असे वाटत असतानाच मानापमानाच्या खेळपट्टीवर ‘बॅकफूट’ वर जाण्यास कोणीच तयार न झाल्याने अखेर निवडणुकीपर्यंत हा विषय ताणला गेला आहे.
निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन ओक यांनी मागील महिन्यात काही सदस्यांशी पत्राव्दारे संपर्क साधून विशेष सर्वसाधारण सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या पत्रात त्यांनी अकॅडमीच्या खेळाडुंवरील बंदीसह अनेक प्रश्न उपस्थित केले. जिल्हा संघटनेच्या १३ जानेवारी २००९ रोजी प्रश्नप्त आजीव सदस्यांच्या यादीतून दोनशेपेक्षा अधिक सदस्यांची नावे का वगळली, ऑडीट रिपोर्टमधील अनेक खर्चाचे आकडे अवास्तव का, २००६-०७ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या दोन रणजी सामन्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून नक्की किती निधी प्रश्नप्त झाला, अशा प्रश्नांचा त्यात समावेश आहे. निवडणुकीत आपण जय्यत तयारीसह लढविणार असून राजेश टिळे, रवींद्र लोणारी, डॉ. राजेंद्र जाधव यांच्याशी विचारविनिमय करून पॅनल निश्चित करण्यात येईल, असे ओक यांनी सांगितले.
दुसरीकडे विनोद शहा यांनीही सत्तापदाची हॅट्रिक साधण्याच्या उद्देशाने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला असून आपल्या पॅनलमध्ये सध्याच्या समर्थक पदाधिकाऱ्यांसह सर्वाचाच समावेश राहणार असून अपवादात्मक बदल केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या सर्व पाश्र्वभूमिवर जिल्हा संघटनेच्या निवडणुकीला कमालीचे महत्व प्रश्नप्त झाले आहे.