Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

नाशिक जिल्ह्य़ात मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ
दीड महिन्यात आढळले ४२४ रुग्ण
किरण जाधव / नाशिक

शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यांनी डासांना पोषक वातावरण उपलब्ध करून दिले असून त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दीड महिन्यात जिल्ह्य़ात मलेरियाचे तब्बल ४२४ रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण शंभरहून अधिक आहे. हे रुग्ण प्रश्नमुख्याने निफाड, ओझर, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी या भागात आढळून आले आहेत. या पाश्र्वभूमीवर, नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात पाण्याची डबकी साचणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच जर साचली तर औषध फवारणीसाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जोरदार पावसाने धरणसाठय़ांत वाढ
* इगतपुरी तालुक्यातील ३८ गावांचा संपर्क खंडित
* गंगापूर धरण निम्मे भरले
* पाणी कपातीच्या संकटातून मुक्तता होण्याची चिन्हे
* गोदावरी खोऱ्यातील धरणांमध्ये सरासरी ३४ टक्के जलसाठा
* जळगावच्या हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले
प्रतिनिधी / नाशिक
सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी नाशिक जिल्ह्य़ात पावसाने दमदार हजेरी कायम ठेवल्याने गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या जलसाठय़ात जलदगतीने समाधानकारक वाढ होत आहे. यंदा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या पहिल्याच समाधानकारक पावसाने गंगापूर धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर असून त्यामुळे नाशिक शहरात लागू केलेली २० टक्के पाणी कपातही लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. पावसाअभावी अनेक दिवसांपासून स्तब्ध असणारी गोदावरीही दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील दारणा व कडवा नद्यांना आलेल्या पुराने ३८ गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरातील भातशेती पूर्णत पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक
एनडीसीए विरुध्द एनसीए यांच्यातील वाद हा मुख्य मुद्दा
अविनाश पाटील / नाशिक

मुंबईसह इतर अनेक बडय़ा क्रिकेट संघटनांवर खेळाडूंपेक्षा राजकारणी मंडळींनीच अधिक वर्चस्व प्रस्थापित केले असताना आतापर्यंत या ‘राजकीय लागण’ पासून दूर राहिलेली नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना येत्या निवडणुकीतही आपली ही प्रतिमा कायम ठेवण्यात यशस्वी होईल अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. गेल्या दोन निवडणुकांपासून जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी मांड ठोकलेले विनोद उर्फ धनपाल शहा यांच्याकडे आपल्या कारकिर्दीत रणजी सामन्यांच्या यशस्वी आयोजनाचा मान जात असला तरी नाशिक क्रिकेट अकॅडमीविरुध्दच्या वादविवादांच्या घेऱ्यात तेही सापडल्याने आगामी निवडणुकीत हाच महत्वाचा मुद्दा राहणार, हे निश्चित.

पॅकेजवर संमिश्र प्रतिक्रिया
नाशिक / प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाच्या नाशिकला झालेल्या बैठकीत नाशिक महसूल विभागासाठी बहुचर्चित पॅकेजची घोषणा करण्यात आली. सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्य़ातील विकास कामांसाठी घसघशीत आर्थिक तरतूद केल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात पदरात काय पडेल अन् काय पडणार नाही याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. या पॅकेजकडे निवडणुकीची नांदी म्हणूनच पाहिले जात आहे. या पाश्र्वभूमीवर काही उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवाभावी संस्थांना या पॅकेजबाबत काय वाटते हे त्यांच्याच शब्दात..

ही तर नाशिकच्या सर्वागीण विकासाची नांदी -समीर भुजबळ
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक विकास प्रश्नधिकरण स्थापन करण्याची घोषणा महसूल विभाग विकास पॅकेजमध्ये प्रश्नधान्याने करण्यात आल्याबद्दल खा. समीर भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे. पॅकेज अंतर्गत मार्गी लावलेली कामे म्हणजे नाशिकच्या विकासाची नांदी आहे. येत्या पाच वर्षात मतदारसंघाचा पूर्णपणे कायापालट करण्यास आपण कटीबद्ध असल्याचा पुनरूच्चार भुजबळ यांनी केला आहे.

लघु उद्योजकांसाठी छोटे भूखंड निर्माण करण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

लघुउद्योजकांसाठी छोटय़ा भूखंडांची निर्मिती करावी तसेच औद्योगिक भूखंडांचा दर माफक असावा यांसह इतर अनेक मागण्या पूर्ण करण्याची मागणी भाजपच्या उत्तर महाराष्ट्र उद्योग आघाडीतर्फे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या अनेक मागण्या गेल्या १५-२० वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांची मागणी इतर राज्यांसाठी असलेला कोटा रद्द करा
नाशिक / प्रतिनिधी

राज्यातील औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २००९-१० या वर्षाकरिता होम युनिव्हर्सिटीसाठी ६० टक्के, इतर युनिव्हर्सिटीसाठी २० टक्के तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी २० टक्के कोटा ठेवण्यात आल्यामुळे बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. इतर राज्यांसाठी ठेवण्यात आलेला कोटा रद्द करण्याची मागणी बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. बाहेरील राज्यांसाठी असणारा २० टक्के कोटा रद्द करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. मुळात राज्यात बी. फार्मसीच्या उच्च शिक्षणासाठी मोजक्या जागा असतांना त्यामध्येही परप्रश्नंतीय विद्यार्थ्यांना आरक्षण दिल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मनसेच्या विद्यार्थी आघाडीने केला आहे. शिक्षणाच्या व्यापारीकरणाला आपला विरोध असून कोटा रद्द न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी सेनेचे वैद्यकीय विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. किरण कातोरे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.