Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

..तर ‘त्या’ अधिकाऱ्यांवरही गुन्हे नोंदविण्याची मागणी
वार्ताहर / धुळे

लोकसेनेचे संस्थापक अध्यक्ष वाल्मिक दामोदर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी धुळे शहर पोलीस खात्याचे पथक, तहसीलदार व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांसह पोलीस मुख्यालय वसाहतीवर छापा टाकला. या छाप्यात अवैध गॅस सिलेंडर सापडले असते तर पोलीस खात्याची बदनामी झाली असती, त्यामुळे असे होऊ नये म्हणूनच दामोदर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा करतानाच दामोदर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अन्यथा सोबतच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम वादाच्या भोवऱ्यात
वार्ताहर / जळगाव

शहरात सद्यस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम पूर्णपणे थंडावलेली असताना बळिराम पेठेत अचानकपणे ही मोहीम पुन्हा राबविण्यात आली. प्रमुख रस्ते व चौक अतिक्रमणाच्या विळख्यात असताना त्या भागात मोहीम राबविण्याऐवजी जेथे फारशी आवश्यकता नाही, अशा ठिकाणी मोहीम राबविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरात अतिक्रमणमुक्त असा एकही प्रमुख मार्ग व चौक नाही.

जळगाव जिल्ह्य़ासाठी पॅकेजमध्ये
समाधानकारक तरतूद- डॉ. सतीश पाटील
जळगाव / वार्ताहर

नाशिक येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक जिल्ह्य़ास झुकते माप मिळाले असताना जळगाववर मात्र अन्याय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याने जिल्ह्य़ातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर मत व्यक्त करताना कसरत करावी लागत असल्याचे पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या प्रतिक्रियेमुळे दिसून येत आहे. पॅकेजमध्ये मंजूर झालेल्या कामांमुळे जिल्ह्य़ातील विकासाचा अनुशेष बऱ्याच प्रमाणात दूर होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

बनावट नोटांच्या सूत्रधाराचा शोध सुरू
मनमाड / वार्ताहर

येथे दोन बिहारी युवकांकडे ५०० रूपयांच्या दहा बनावट नोटा आढळून आल्यानंतर या प्रकरणातील सूत्रधाराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. बनावट नोटा तयार करणारी मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता मनमाड पोलिसांनी व्यक्त केली आहे. येथील एका हॉटेलमध्ये मद्यपान केल्यानंतर मधुरंजन गणेशसिंग (२९), तेजनारायण रामप्रितसिंग (३८, रा. खपरीला, बिहार) यांनी ५०० रुपयांच्या दोन नोटा बिलापोटी दिल्या.त्या बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल चालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित धाव घेत या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या तीन बनावट नोटा जप्त केल्या. मनमाड न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. कसून चौकशीनंतर आणखी दहा बनावट नोटा आढळून आल्या.

असंघटित महिलांना शिबिराद्वारे मार्गदर्शन
मनमाड / वार्ताहर

लायन्स व लायनेस क्लब व केंद्रीय कामगार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गायकवाड चौकात मागासवर्गीय असंघटित महिलांसाठी दोन दिवसीय शिबीर घेण्यात आले. उद्घाटन लायन्स क्लबचे झोन अध्यक्ष महेश पोफळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी लायनेसच्या नियोजित अध्यक्षा पुष्पा मतकर होत्या. अध्यक्ष विवेक बरडिया, अॅड. आर. व्ही. पाटील, अॅड. पी. बी. कुलकर्णी, योगेश पारीख, अध्यक्षा कुंदा कुलकर्णी उपस्थित होते. शिक्षण मंडळ सभापती नविद शेख यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय कामगार केंद्राचे शिक्षणाधिकारी डॉ. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात ४० महिलांनी सहभाग घेतला. शिबिरात स्त्री संघटना, महिला सक्षमीकरण, आरोग्य, विमा संरक्षण, कौटुंबिक नातेसंबंध, कौटुंबिक हिंसाचार तसेच कायदेविषयक सल्ला कलम ४९८ सह अनेक कलमांची माहिती, त्यांचे होणारे दुरूपयोग, स्वयंरोजगाराच्या दिशा, यावरही मार्गदर्शन करण्यात आले. कामगार कल्याण मंडळातर्फे प्रमाणपत्र व १५० रुपये देण्यात आले. आभार सुमन रणदिवे यांनी मानले.