Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

राज्य

लोकमान्य टिळक जयंतीपासून पुण्यतिथीपर्यंत विविध उपक्रम
रत्नागिरी, २३ जुलै/ खास प्रतिनिधी

सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त येथील शासकीय ग्रंथालय व लोकमान्य टिळक स्मारक मंदिरातर्फे आज लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या मुहूर्तावर १० दिवसीय कार्यक्रम मालिकेचा शुभारंभ झाला.या मालिकेची सांगता येत्या १ ऑगस्ट रोजी लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी होणार आहे.ग्रंथपाल मु. वा. उजळंबकर यांच्या पुढाकाराने आयोजित या मालिकेचे उद्घाटन आमदार उदय सामंत यांच्या हस्ते झाले. आगामी १० दिवसांत या मालिकेमध्ये विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने, ग्रंथप्रदर्शन, प्रकट मुलाखत, परिसंवाद इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी (१ ऑगस्ट) मालिकेची सांगता होणार असून, झी सारेगामा लिटल चॅम्प स्पर्धेतील गायिका शमिका भिडे हिच्या हस्ते ग्रंथालयातील बालविभागाचे उद्घाटन होणार आहे.

आता मतदान ओळखपत्र दाखवा आणि रेशन मिळवा!
पुणे, २३ जुलै/खास प्रतिनिधी

निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र नसेल तर यापुढे तुम्हाला शिधापत्रिकेवर धान्य मिळणार नाही, स्वयंपाकाच्या गॅसचा नवा जोड तर सोडाच, पण जुना सिलिंडर भरून घेणेही शक्य होणार नाही. महापालिकेचा कर व विजेची बिले भरण्यासाठीही हे ओळखपत्र आवश्यक ठरणार असून, बँकेत खाते उघडायचे झाल्यास, इंटरनेट वा मोबाईलचा जोड घ्यायचा झाल्यासही ते सादर करावे लागण्याची शक्यता आहे. महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयाचे ओळखपत्र मिळविण्यासाठी हे ओळखपत्र सक्तीचे केले जाणार आहे.

अशोक पाटलांना वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ
वसंत मुंडे, बीड, २३ जुलै

‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असे खुमासदार शैलीत सांगत, तुम्ही आता जिल्ह्य़ाचे नेतृत्व करा! अशा शब्दात अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी माजी मंत्री अशोक पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेच्या बीड मतदारसंघातून पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इच्छुकांचे दौरे, नेत्यांचे मेळावे रंगत आहेत. काँग्रेस आघाडीबाबत अनिश्चितता असली तरी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा वाऱ्यावर!
जयप्रकाश पवार, नाशिक, २३ जुलै

राज्यातील वाइनवरचा व्हॅट अर्थात मूल्यवर्धीत कर २५ वरून थेट चार टक्क्य़ांवर आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असला तरी वाइन निर्मितीमध्ये कळीची भूमिका निभावणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा वाऱ्यावर सोडले आहे. मंत्रिमंडळाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी ‘लबाडा घरचं आवतन’ ठरणार असल्याची सार्वत्रिक भावना आहे.

कोल्हापूरजवळ सापडली चमचमणारी पाल!
‘क्नेमॅस्पिस कोल्हापुरेन्सिस’ असे नामकरण
पुणे, २३ जुलै / खास प्रतिनिधी

पश्चिम घाटातील संपन्न जैवविविधतेची ओळख पटवून देणारी चमचमणारी पाल कोल्हापूर जिल्ह्य़ात सापडली असून, या नव्या प्रजातीची जगात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस) व कोल्हापूरमधील ग्रीनगार्ड या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी मिळून ही पाल शोधली. ही पाल सरडय़ासारखी दिसणारी आहे, पण सविस्तरपणे तिची वैशिष्टय़े अभ्यासली की ती पाल असल्याचे लक्षात येते. ही पाल जमिनीखाली बिळात राहणारी आहे. ती पाल्यापाचोळ्याखाली किंवा खडकांच्या सापटीतसुद्धा राहते. तिच्यावर विशिष्ट कोनातून प्रकाश पडला तर तिचे अंग चमचमते.

राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
नाशिक, २३ जुलै / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये पहिल्याच दमात द्वितीय क्रमांकाची मते खेचून भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का देणाऱ्या मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच उद्या, शुक्रवारी नाशिकमध्ये दाखल होत आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बेकायदा जप्ती व वसुली विरुद्ध कर्जदार व जामीनदार संघाचा आज मेळावा
नाशिक, २३ जुलै / प्रतिनिधी

अखिल भारतीय कर्जदार व जामीनदार संघाच्या वतीने येथे कर्जदार व जामीनदार यांचा संयुक्त ेळावा शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप पाठक यांनी दिली. बँका तसेच पतसंस्थाकडून थकीत कर्ज वसुली संदर्भात अन्याय, १०१ किंवा १३८ अंतर्गत कारवाई झाली असल्यास, एकतर्फी निकाल लागला असल्यास, आपले वाहन जबरदस्तीने सूचना न देता ओढून नेले असल्यास, वसुलीसाठी जप्ती व पगार कपात होत असल्यास, अशा कर्जदार व जामीनदारांनी मेळाव्यास उपस्थित राहावे.

जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर चाकू हल्ला
जळगाव, २३ जुलै / वार्ताहर

येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आज दुपारच्या सुमारास एका विद्यार्थिनीवर तरुणाने चाकू हल्ला चढविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात संबंधित विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. हल्ल्याचे कारण मात्र सायंकाळी उशीरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.

जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर चाकू हल्ला
जळगाव, २३ जुलै / वार्ताहर

येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आज दुपारच्या सुमारास एका विद्यार्थिनीवर तरुणाने चाकू हल्ला चढविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात संबंधित विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. हल्ल्याचे कारण मात्र सायंकाळी उशीरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या स्नेहल प्रभाकर पाटील या विद्यार्थिनीवर अमित परदेशी नामक तरुणाने गुरुवारी दुपारी अचानक चाकू हल्ला चढविला. या घटनेने महाविद्यालयाच्या आवारात प्रचंड घबराट उडाली. त्यानंतर प्राचार्य एस. बी. जोशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी परदेशी याला अटक केली आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण मात्र सायंकाळपर्यंत उघड झाले नव्हते. अनेकदा महाविद्यालयाच्या आवारात येऊन बाहेरचे तरुण वाद निर्माण करतात. तसाच एखादा प्रकार यामागे असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे वर्षभरापूर्वीच छेड काढल्याच्या मनस्तापातून शहरातील एका शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतरही अधुनमधून छेडछाडीच्या गंभीर घटना घडतच असताना पोलीस यंत्रणा मात्र अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका या घटनेनंतर पुन्हा एकदा होऊ लागली आहे.

शहापूर- शेणवा मार्ग दहा तास बंद
शहापूर, २३ जुलै/वार्ताहर

दोन मालवाहू ट्रक रस्त्यावर आडवे झाल्याने शहापूर- शेणवा मार्गावरील वाहतूक सुमारे दहा तास बंद झाल्याने वाहनचालकांचे व प्रवाशांचे अतोनात हाल झाले. शिलोत्तर गावाजवळील जयदुर्गा राईसमिलसमोर हे ट्रक फसले होते. सायंकाळी सहानंतर वाहतूक सुरळित झाली.शहापूर- शेणवा राज्य महामार्गावरील शिलोत्तर गावाजवळ जडवाहतूक करणारे ट्रक रस्त्याच्या मधोमध आज सकाळी सात वाजता फासले. त्यामुळे एकही वाहन शहापूर व किन्हवलीकडे जाऊ शकले नाही. दोन्हीकडे एसटी, छोटय़ा-मोठय़ा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दुपारी पाच वाजेपर्यंत वाहतूक ठप्पच होती. या वाहतूक ठप्पमुळे सकाळी शहापूरकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, दूधव्यावसायिकांचे प्रचंड हाल झाले. चोंढे, डोळखांब, शेणवा, किन्हवलीला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने या भागातील लोकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते.