Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

‘बंदोबस्त पाठविल्यानंतर कारवाईस विलंब’
पालिका आयुक्तांवर पोलीस आयुक्त नाराज
ठाणे/प्रतिनिधी

अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईसाठी पोलिसांची मदत मिळत नाही, हा ठाणे महापालिकेकडून सातत्याने होणारा आरोप धादांत खोटा आहे. सकाळपासून बंदोबस्त पाठविल्यानंतर कारवाई मात्र उशिरा केली जाते, अशी खंत व्यक्त करीत ठाणे पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी ठाणे महापालिकेने पोलिसांच्या पगाराचे चार कोटी रुपये थकविले असल्याचे सांगितले.

‘अनधिकृत कार्यालयात विरोधी पक्षनेता बसणार नाही ’
ठाणे/प्रतिनिधी

पालिका मुख्यालयातील विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालय अधिकृत असल्याची घोषणा जोवर पालिका आयुक्त करीत नाहीत, तोवर विरोधी पक्षनेता त्या कार्यालयात बसणार नाही. तसे आदेश पक्षाने दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

.. तर एनआरसीत टाळेबंदी
* कामगारांचा बिल्डरविरुद्ध अखेरचा लढा
* जून २००८ पासून उत्पादन पूर्णपणे बंद
* २००६ पासून निवृत्त झालेल्या १३०० कामगारांचे हिशेब अद्याप बाकी
ठाणे/प्रतिनिधी
अतिरिक्त जमीन खरेदी व्यवहारातील पैसे रहेजा कंपनीकडून उपलब्ध न झाल्यास कल्याणजवळील मोहने येथील नॅशनल रेयॉन (एनआरसी) कंपनीत व्यवस्थापनाने येत्या १ ऑगस्टपासून टाळेबंदी जाहीर केली असून तशी रीतसर नोटीस कामगारांना २ जुलैच रोजी बजावण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी कर्मचारी न दिल्याबद्दल पालिका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
ठाणे/प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या कामाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून न दिल्याला ठपका ठेवत ठाणे महापालिकेतील एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेत खळबळ उडाली असून निवडणूक विभागाच्या मनमानी कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे.

खंडणीप्रकरणी शिवसेना नगरसेविकेच्या मुलाला अटक!
ठाणे/प्रतिनिधी : खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका शांता सोलंकी यांचा मुलगा नरेश शामजी सोलंकी (२५) याला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली.ठाणे महाविद्यालयासमोरील एका चिकन विक्रेत्याकडे वर्गणी मागण्यावरून सोलंकी व दुकानाचे मालक जलालउद्दीन खान यांच्यात वाद झाला. जलालउद्दीन खान यांनी या प्रकरणी नगर पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार केली. नगर पोलिसांनी नरेश सोलंकी याला खंडणीप्रकरणी अटक केली. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचे शांता सोलंकी यांनी सांगितले.

अंबरनाथमध्ये आज वर्षा मॅरेथॉन
बदलापूर/वार्ताहर
अंबरनाथ नगर परिषदेच्या शिक्षण समिती तसेच महिला बाल कल्याण समितीच्या वतीने शुक्रवार, २४ जुलै रोजी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विविध गटांत होणाऱ्या स्पर्धेत चार हजार स्पर्धक धावणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शहराच्या विविध ठिकाणांहून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या तसेच युवकांच्या युवती गटांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी यांच्यासाठी देखील स्पर्धा होणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता शिवाजी चौकातील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये दुपारी १२.३० वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.

अमेय भिंगार्डेचे सुयश
डोंबिवली- येथील पी.आर. म्हैसकर प्रश्नथमिक विद्यामंदिर शाळेतील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या अमेय अजय भिंगार्डे या विद्यार्थ्यांने मराठा मंदिर महाराष्ट्र ज्ञानपीठामार्फत घेण्यात आलेल्या गणित परीक्षेत ५० पैकी ४९ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वसुधा पाटील यांनी त्याला मार्गदर्शन केले.

विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे
ठाणे-मराठी बाणा प्रतिष्ठान, हेल्प एज इंडिया आणि डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे-नवी मुंबईत ठिकठिकाणी विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. रविवार २६ जुलै रोजी शिवसेना आनंदनगर शाखा-कोपरी, रविवार २ ऑगस्ट रोजी हनुमानगर बस डेपोजवळ, वागळे इस्टेट आणि रविवार ९ ऑगस्ट रोजी पावणे गांव, ठाणे-बेलापूर रोड, संत ज्ञानेश्वर मराठी शाळेजवळ, नवी मुंबई येथे दुपारी दोन ते तीन या वेळेत ही शिबिरे घेण्यात येतील. परिसरातील संबंधितांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क-कुलदीप पोखरकर-९८३३९९९८८६.

डिग्निटीतर्फे ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रे
बदलापूर- येथील दत्तवाडी शिवसेना विभागप्रमुख शैलेंद्र वडनेरे यांनी डिग्निटी फाऊंडेशनतर्फे नरेश ठक्कर यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांना मोफत ओळखपत्र देण्याची योजना जाहीर केली आहे.ओळखपत्र मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वयाचा, नावाचा, रहिवासाचा पुरावा आणि तीन स्टॅम्पसाईज छायाचित्रे आणावीत. ही मोहीम २७ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान दत्तवाडी शिवसेना शाखेत राबविली जाणार आहे. संपर्क- ९८९०२४३३०८

शय्यामूत्र निवारण शिबीर
बदलापूर- ‘बिछाना ओला करणे’ ही लहान मुलांमध्ये एक मोठी समस्या असते. यावर संशोधनातून प्रभावी उपचारप्रणाली शोधून काढण्यात आली आहे. अशोक आयुर्वेद व पंचकर्म केंद्रातर्फे रविवार २६ जुलै रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत तपासणी, स्लाईड शो द्वारे शय्यामूत्र निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संपर्क- ९८२२७९५२२२०.

शिवळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश
शहापूर- जनसेवा शिक्षण मंडळ संचालित शिवळे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. कला शाखेचा निकाल ७५.१७ टक्के लागला असून उत्तम गोडांबे, चारुशीला घरत आणि रूपा आईकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. विज्ञान शाखेत संध्या पवार, सचिन धानके आणि चेतन पवार, तर वाणिज्य शाखेत कालीप्रसाद खोत, कोमल मंडलिक आणि शैला विशे अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय आले. संस्थेचे अध्यक्ष आमदार गोटीराम पवार, प्रश्नचार्य डॉ. शंकर पाटील आणि इतरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा
ठाणे- रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पाश्र्वनाथ सभागृह, वागळे इस्टेट येथे अलीकडेच जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धा पार पडली. रोटरी डिस्ट्रिक्टचे माजी प्रश्नंतपाल बन्सी धुरंधर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन माजी उपप्रश्नंतपाल मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते झाले. आकाश दामले, श्रुती तळणीकर या आंतरराष्ट्रीय तसेच झुबीन तारापोरवाला, ऋषीकेश कुलकर्णी या राष्ट्रीय टेबल टेनिसपटूंसह ३८५ खेळाडू सहभागी झाले होते. नॉक आऊट पद्धतीने ११ पॉइंटच्या फेरीमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी पापरीकर
कल्याण- इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षपदी डॉ. माधवी पापरीकर यांची निवड करण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या पदग्रहण सोहळ्यात मावळत्या अध्यक्षा अॅड. सुषमा पटेल यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. सचिवपदी वंदना देशपांडे तर कोषाध्यक्ष म्हणून अपर्णा वैद्य काम पाहणार आहेत. डॉ. छाया भडकमकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

उपायुक्तांवरील अविश्वासाचा ठराव बारगळणार?
भिवंडी/वार्ताहर

महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न करून मुजोर ठेकेदार व गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणणाऱ्या उपायुक्तांवर अविश्वासाचा ठराव मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शिवसेना व राष्ट्रवादी नगरसेवकांनी चांगलेच आव्हान दिले आहे. उद्या होणाऱ्या महासभेत या कार्यक्षम अधिकाऱ्यांसाठी सत्ताधारी व विरोधक यांच्यात सामना रंगणार आहे. महानगरपालिकेचे मुख्यालय उपायुक्त म्हणून भालचंद्र गोसावी हे गेल्या दोन वर्षांपासून काम पाहात आहेत. बदलापूर मनमाड नगरपालिकेत मुख्याधिकारी, तर जळगाव पालिकेत उपायुक्त म्हणून काम करताना गोसावी यांनी आपल्या कामाचा चांगलाच दबदबा निर्माण केला होता. भिवंडी महानगरपालिकेत उपायुक्तपदावरून काम करताना त्यांनी अनेक उपक्रम राबविले. त्यांनी पालिकेला होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.

‘नि:स्वार्थी भावनेने काम केल्यास अंधारावर मात शक्य’
ठाणे प्रतिनिधी

नि:स्वार्थी भावनेने काम केल्यास अंधारावर मात करता येते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले. द ब्लाइंड डॉक्टर जेकब बोलोटीन स्टोरी-अ बायोग्राफी या पुस्तकाच्या ‘अंधारावर मात’ या मधुकर मंडलेकर यांनी केलेल्या अनुवादाचे प्रकाशन व्यास क्रिएशनच्या वतीनेकरण्यात आले असून, या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लहाने उपस्थित होते. सहयोग मंदिर सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अरविंद भानुशाली, व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शनक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, संस्थेचे संचालक नीलेश गायकवाड आणि इतर उपस्थित होते. याच सोहळ्यात योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांचा व्यासरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सूर सप्तकांचे या मराठी गाण्यांच्या मैफलीने कार्यक्रमाची सांगता झाली.