Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

..तर ‘त्या’ अधिकाऱ्यांवरही गुन्हे नोंदविण्याची मागणी
वार्ताहर / धुळे

लोकसेनेचे संस्थापक अध्यक्ष वाल्मिक दामोदर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांच्यासह

 

कार्यकर्त्यांनी धुळे शहर पोलीस खात्याचे पथक, तहसीलदार व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांसह पोलीस मुख्यालय वसाहतीवर छापा टाकला. या छाप्यात अवैध गॅस सिलेंडर सापडले असते तर पोलीस खात्याची बदनामी झाली असती, त्यामुळे असे होऊ नये म्हणूनच दामोदर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा करतानाच दामोदर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अन्यथा सोबतच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
लोकसेनेचे संस्थापक वाल्मिक दामोदर हे राजकारण-समाजकारणात प्रदीर्घ काळ कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलित मित्र पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. त्यामुळेच आजही जिल्ह्य़ात ज्येष्ठ नेते म्हणून ते लोकप्रिय आहेत. शहरात आणि जिल्ह्य़ात अवैध धंदे फोफावल्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. परिणामी, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सर्वसामान्य माणसांना शहरात जगणे मुश्कील झाले आहे. यामुळेच गॅस, रॉकेल तसेच रेशनचा काळाबाजार, डांबर, स्पिरीट आदी मालाचा काळाबाजार सुरू असल्यामुळे पोलीस खात्याच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली होती. त्यातच दामोदर यांनी अवैध धंदे बंद करण्याचा विडा उचलला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत शहरात आणि जिल्ह्य़ात विविध ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल पकडून दिला. तर अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एवढेच नव्हे तर जिल्हा पोलीस प्रमुख सुनिल कोल्हे यांच्यासमोर अवैध धंद्यांचे प्रत्यक्षात पुरावे सादर केले. एकामागून एक छापे टाकून मुद्देमाल पकडून देत असातना सर्वसामान्य जनतेकडून दामोदर यांना गुप्त माहिती मिळू लागली होती, याची जाणीवही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनातून करून दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलीस मुख्यालयात विभाग १२ मधील ब्लॉक नं. २४ व २५ या ठिकाणी अवैध गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळताच दामोदर यांनी अपर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांना ही माहिती दिली. त्यांनी तहसीलदार भामरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तपासणी पथक पाठविण्याचे निश्चित झाले. त्यानुसार स्वत: दामोदर यांच्यासह तहसीलदार भामरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन गवळी, पुरवठा निरीक्षक पवार आणि शहर पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले. तथापि, ब्लॉक नं. २४ व २५ या खोल्यांना कुलूप लावलेले दिसून आले. यानंतर स्वत: तहसीलदारांनी डी.वाय.एस.पी. धोबी यांना घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, संबंधितांना वरील दोन्ही खोल्यांच्या चाव्या देण्यात आल्या नाहीत. तेव्हा धोबी यांनी हरकत घेतली व परवानगी न घेता तुम्ही पोलीस मुख्यालयात तपासणी करण्याासाठी का गेले, अशी विचारणा केली. यानंतर पोलीस खात्याची बदनामी होऊ नये, म्हणून शासकीय वसाहतीतील काही पोलीस कुटुंबियांनी मोर्चा काढून दामोदर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. हा गुन्हा खोटय़ा स्वरुपाचा आहे. पोलीस कुटुंबियांनी मोर्चा काढलाच कसा, मोर्चाला परवानगी देण्यात आली होती काय, परवानगी नसेल तर कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही, याशिवाय जर तपासणी पथकात वाल्मिक दामोदर यांच्यासह इतर अधिकारीही होते, तर त्यांच्यावर आजपर्यंत हा गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.