Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अतिक्रमण हटाव मोहीम वादाच्या भोवऱ्यात
वार्ताहर / जळगाव

शहरात सद्यस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम पूर्णपणे थंडावलेली असताना बळिराम पेठेत

 

अचानकपणे ही मोहीम पुन्हा राबविण्यात आली. प्रमुख रस्ते व चौक अतिक्रमणाच्या विळख्यात असताना त्या भागात मोहीम राबविण्याऐवजी जेथे फारशी आवश्यकता नाही, अशा ठिकाणी मोहीम राबविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात अतिक्रमणमुक्त असा एकही प्रमुख मार्ग व चौक नाही. महापालिकेची व्यापारी संकुले, वाहनतळांच्या जागा सर्वत्र अतिक्रमण आहे. महापालिका प्रशासनाने या गंभीर व वाहतुकीची समस्या निर्माण करणाऱ्या प्रश्नाकडे विकासाच्या दृष्टीने कधीही लक्ष दिले नाही. उलट महापालिका अतिक्रमण हटाव पथक व अतिक्रमणधारकांची मैत्री असल्याचे चित्र येथे दिसते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयीच अनेक शंका घेतल्या जातात. अतिक्रमण धारकांकडून महापालिका पथकाचे कर्मचारी व प्रशासनाला लाखोंची प्रति महिना कमाई मिळते असा आरोप झाल्यानंतर महापालिका सभेत हा विषय चांगलाच गाजला होता. त्यावरून दोन महिन्यापूर्वी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी या विषयाकडे लक्ष दिले. रस्ते, चौक, व्यापारी संकुले अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याने मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले. महापालिकेने अतिक्रमण हटविताना राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले होते.
आयुक्तांनी सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर अतिक्रमणधारकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. या आवाहनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला, पण ती कारवाई पोकळ ठरल्याने पुन्हा अतिक्रमण फोफावल्याचे दिसू लागले. अतिक्रमण हटाव मोहीमेचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असताना ही मोहीम अचानक कोणाचे हितसंबंध जपण्यासाठी थांबविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच अचानक बळिराम पेठ परिसरात वाहतुकीला कोणतीच अडचण न ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे पथक धडकले. छोटय़ा व्यावसायिकांनी आपल्याकडून रहदारीला कोणतीच अडचण होत नसल्याचे विनवणी करून सांगितले. परंतु चौक व प्रमुख मार्गावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पथकाने त्यांच्या विनवणीकडे दुर्लक्ष केले. अतिक्रमण हटाव विभागाने आता न थांबत संपूर्ण शहरात ही मोहीम राबवावी व सतत सुरूच ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.