Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

जळगाव जिल्ह्य़ासाठी पॅकेजमध्ये
समाधानकारक तरतूद- डॉ. सतीश पाटील
जळगाव / वार्ताहर

नाशिक येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक जिल्ह्य़ास झुकते माप मिळाले असताना

 

जळगाववर मात्र अन्याय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याने जिल्ह्य़ातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर मत व्यक्त करताना कसरत करावी लागत असल्याचे पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या प्रतिक्रियेमुळे दिसून येत आहे. पॅकेजमध्ये मंजूर झालेल्या कामांमुळे जिल्ह्य़ातील विकासाचा अनुशेष बऱ्याच प्रमाणात दूर होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्य़ासाठी पॅकेजमध्ये शंभर टक्के तरतूद नसली तरी समाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील अमळनेर येथील पाडळसरे धरण दुर्लक्षित होते. त्यासाठी फक्त २५ कोटींची तरतूद होती. आपण पाठपुरावा केल्याने आता ७५ कोटींची तरतूद पॅकेजमध्ये करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील छोटे बंधारे तसेच नाटय़गृह, पर्यटन प्रकल्प व जळगाव विमानतळाच्या कामाला पॅकेजमुळे चालना मिळेल. अमळनेर येथे मुलींच्या वसतीगृह बांधकामासाठी २.२६ कोटी तर रावेर येथेही मुलींचे वसतीगृह बांधकामासाठी ३.२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रावेर व जळगाव येथेही मुलींचे वसतीगृह, अमळनेर व चाळीसगाव येथे निवासी शाळा बांधकामासाठी १८.८२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्य़ात नाटय़गृहाची उभारणी करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात दोन बडे पाणलोट क्षेत्र, जिल्ह्य़ात ३०० डय़ुएल पंप बसविण्याची कार्यवाही, फळे व भाजी पाल्यासाठी शीतसाखळी प्रकल्प, जिल्ह्य़ातील दोन कृषी प्रक्रिया संस्थांना प्रतिवर्षी २० कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि पाल या पर्यटन क्षेत्राचा विकास पॅकेज अंतर्गत करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.