Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

..तर गुन्हेगारीचे विदारक चित्र बदलू शकते
नाशिक, धुळे या उत्तर महाराष्ट्रातील शहरांत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कारवायांमध्ये

 

लक्षणीय वाढ झाल्याची ओरड होत आहे. विशेष म्हणजे, या गुन्हेगारी कारवायांना स्थानिक पातळीवर राजकीय नते-पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे अलीकडे वारंवार दिसून येते. त्या अनुषंगाने एका ज्येष्ठ नागरिकाचे मनोगत..
राजकारण व सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार-गुंडगिरी आज हातात हात घालून वाटचाल करीत आहे. भ्रष्टाचाराचा भस्मासूर दहशतवादाची व गुंडगिरीची शक्ती वाढवत असल्याने लोकशाही आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर, जागृत सत्प्रवृत्त नागरिकांनी संघटित होण्याची कधी नव्हती एवढी गरज निर्माण झाली आहे. शहराच्या सिडको परिसरातील मोटार सायकली जाळण्याच्या गुंडगिरी प्रकरणात काही राजकीय तथाकथित राजकारण्यांचा संबंध व पाठींबा असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे. ही घटना गंभीर व धक्कादायक आहे. अशावेळी सज्जन शक्ती संघटित झाली पाहिजे. या गुंडगिरीच्या विरोधात भ्रष्टमुक्त कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा व त्यांच्या सहकाऱ्यांना पाठींबा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी राजकारणाच्या व विविध नेत्यांच्या दबावाला-प्रभावला न जुमानता कायदेशीर कारवाई निर्भिडपणे केली पाहिजे. प्रसिद्धी माध्यमांद्वारे राजकीय पक्षाचे नेते-पुढारी, पदाधिकारी सांगत आहे की, आमच्या पक्षाचा गुंडगिरीला विरोध असून गुंडांवर कारवाई केली पाहिजे. त्यांचे हे वक्तव्य किती खरे आणि किती खोटे याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
वस्तुत: लोकसभा निवडणुकीत गुंडगिरीची पाश्र्वभूमी असलेल्या या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात आघाडी घेतली होती. तेव्हा त्यांच्या सोयीचे असते त्यावेळी ते गुंड नसतात आणि गुंडगिरी चव्हाटय़ावर आल्यानंतर त्यांना आमचा पाठींबा नाही, आम्ही त्यांना पक्षातून निलंबित केले आहे, त्यांच्या राजीनामा घेतला आहे, अशी पहाडी आवाजात वक्तव्य केली जातात, ही सत्यता नाकारता येणार नाही.
राजकारणाचं अवमूल्यन
आज आपण जीवनमूल्य हरवलेल्या काळात व नीती-भीतीपासून दूर गेलेल्या राजकीय वातावरणात वावरत आहोत. सत्ता-संपत्तीच्या नशेत दुराचार अन्याय-अत्याचार, भ्रष्टाचार गुंडगिरीला जोपासत आहोत. अशांचा गौरव-सत्कार करण्याची अहमहमिका लागल्याचे दिसून येते. राजकारणाच्या प्रकाशात आलेली आणि स्वार्थाने धुंद झालेली बहुतांश माणसं काय करतात तर माणसामाणसात भांडणं लावणं, त्यांना झुंजवत ठेवणं, द्वेष वाढवणं, अनेकांना लाचार बनवणं, सज्जन-सरळ असणाऱ्यांना किडय़ामुंगीसारंख तुच्छ लेखणं, गप्पांमध्ये व भाषणात चारित्र्याचं (नसलेल्या) भूषण मिरवणं, भ्रष्टाचार करणं, जातीयवादाला खतपाणी घालणं, दारूच्या पाटर्य़ा झोडणं, घराणेशाही कारणं, नातलगांना पोसणं, गुंडशाहीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणं अशा अनेक दुर्गुणांना राजकारणात संरक्षण व महत्व देण्यात धन्यता मानतात. एकूणच आजचं राजकारण-सार्वजनिक जीवन कीडलं-सडलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
तटस्थांचे असेही विचार
आज सर्वत्र असे अनुभवास येते की, सज्जनता म्हणजे भित्रेपणा आणि सभ्यता म्हणजे पलायनवाद. परिस्थितीमुळे असे समीकरण रुढ झाले आहे. काही तथाकथित विचारवंत, समाजधुरीण, राजकीय अभ्यासक, तटस्थवृत्तीची माणसं सहजपणे बोलतात ‘एखाद्यामध्ये असतात काही दुर्गुण, भ्रष्टाचार-दुराचार कोण करीत नाही ? तेव्हा आपण त्यांच्या गुणांकडे पाहावं’, घटकाभर असं गृहित धरलं आणि दुर्गुणांच्या गंजीत सद्गुणांची, सदाचाराची टाचणी शोधून काढावी म्हटलं तरी ती सापडणं अशक्यच! परंतु अशांच समर्थन करण्यात अनेकजण आघाडीवर असतात. अशावेळी वाटतं ही माणसं एवढी आंधळी कशी होतात? असंस्कृतांचा, गुंडगिरीचा दुराचाराचा सर्वत्र विजय होतो आहे की काय? अशी भीती निर्माण होण्याची परिस्थिती आहे. तेव्हा सत््प्रवृत्त नागरिकांनो जागे व्हा, विवेकी व्हा, जरा विचार करा. सज्जनांची-सत्याची शक्ती प्रगट झाली नाही तर दुर्जनांचे-गुंडगिरीचे निर्दालन होणार कसे ? शक्ती-भक्ती शिवाय युती नाही’ याची जाणीव सज्जनांना व राजकाणातील विचारी-सदाचारी नेते-कार्यकर्ते यांना होत नाही तोपर्यंत नाशिकमधील आणि राजकारणातील गुन्हेगारी नियंत्रणात येणार नाही. विवेकाच्या प्रकाशामध्ये पावले टाकण्याचे धैर्य असले पाहिजे. गुंडगिरी कमी होऊ शकते, आपल्या चिंतेला चिंतनाची धार आली तर नाशिकचे आजचे गुन्हेगारीचे विदारक चित्र बदलू शकते, यावर विश्वास ठेवा म्हणून हा
विचारप्रपंच !
पां. भा. करंजकर