Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

जि. प. शाळांची स्थिती सुधारण्याची मागणी
चांदवड / वार्ताहर

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या शाळांची स्थिती

 

सुधारण्याकडे लक्ष देण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य अरविंद रकिबे यांनी निवेदनाव्दारे केली आहे. याप्रश्नी त्वरीत कार्यवाही न झाल्यास सरपंच, ग्रामस्थ शिक्षण विभागास टाळे ठोकतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शाळांची स्थिती दयनीय झाल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. शासन शिक्षणावर कोटय़वधी रूपये खर्च करीत असले तरी शिक्षकांची भरती करीत नसल्यामुळे शिक्षणाच्या दर्जात फारसा फरक पडलेला नाही. गेल्या दहा वर्षापासून जिल्हा परिषदेत रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. शिक्षक सेवानिवृत्ता झाल्यामुळे पदे रिक्त असल्याचे कारण शिक्षण खात्यातर्फे दिले जाते. सर्व शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या तारखा प्रशासनाला माहीत असतानाही पर्यायी व्यवस्था का केली जात नाही, असा सवालही रकिबे यांनी केला आहे. चांदवड तालुक्यात २००२ पासून २००८ पर्यंत १५ केंद्र प्रमुखांची पदे मंजूर आहेत. शिक्षक रजेवर गेल्यास अशा वेळी तालुकास्तरावर पर्यायी शिक्षक ठेवण्याची व्यवस्था करावी, अन्यथा टाळे लावले जातील, असा इशारा रकिबे यांनी दिला आहे.