Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नवापूरला उद्या विविध विकासकामांचे उद्घाटन
नवापूर / वार्ताहर

येथील जवळपास ३ कोटी १५ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावित विविध विकासकामांचे उद्घाटन २५

 

जुलै रोजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार आहे. या कामासाठी डॉ. गावित यांनी भरीव निधी दिल्यामुळे पालिकेच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
शहरात नागरी आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अशा १० कामांवर १ कोटी ६ लाख ४७ हजाररुपये खर्च झाला आहे. विविध प्रभागात १२ रस्ते बनविण्यासाठी ३६ लाख २९ हजार १२७ रुपये खर्च झाले असून अन्य काँक्रिट रस्ते व कुंपण भिंतींची कामे प्रलंबित आहेत. नागरी आदिवासी वस्ती सुधारणेंतर्गत कामांसाठी तीन कोटी ८९ लाख निधी डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला आहे. याशिवाय या कामांमध्ये ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेत एक कोटी ३३ लाखांची कामे सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते पुलफळीपर्यंतच्या २५ लाख, स्वस्तिक मिलजवळ रंगावली नदीवर पूल बांधण्यासाठी २ कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
खान्देश विकास पॅकेज अंतर्गत पालिकेने १६ कोटी रुपयांचा विकासकामांचा प्रस्ताव पाठविला असून त्यातून प्रभाकर कॉलनी (साईधाम) परिसरात रस्ते, गटारी ही कामे घेण्यात येणार आहेत. शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी पालिकेला जे ५४ लाख रुपये शासनाला जमा करावयाचे आहेत, त्यासाठी व रंगावली नदीवर केटीवेअर बंधाऱ्याजवळ भराव आणि संरक्षक भिंत उभारण्यासाठी ४२ लाख रुपयाचा प्रस्ताव आहे, अशी माहिती नगराध्यक्ष गोविंद वसावे यांनी दिली. अशा विविध कामांचे उद्घाटन गावित यांच्या हस्ते होणार आहे.