Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

व्यक्तिवेध

एखादे शिखर सर करणे हे गणित सोडवण्यासारखेच असते. त्याचे अवयव पाडावे लागतात आणि त्यानंतर त्यानुसार चढाई करावी लागते. एखादे समीकरण सोडवावे, त्याचप्रमाणे हे सारे असते..! - जगभरातील अनेक शिखरे आणि पहाड गिर्यारोहणाच्या कोणत्याही साधनांशिवाय केवळ हात आणि पायाचा वापर करून चढणाऱ्या एका अवलियाचे हे उद्गार आहेत. या अवलियाचे नाव जॉन बाचर. अलीकडेच ५ जुलै रोजी त्याच्याच कर्मभूमीवर म्हणजे पूर्व सिएरामध्ये डाईक वॉलवर चढाई करताना त्याला मृत्यूने कवटाळले. घोरपडीने पाहाता पाहाता थेट पहाड सर करावा, तसे बाचरच्या बाबतीत घडत असे. जे पहाड सर करणे केवळ गिर्यारोहणाच्या साधनांसहच शक्य होते असे अनेक पहाड त्याने

 

लीलया पार करून दाखवले. जॉनला विचारले की, त्याचे उत्तर ठरलेले असायचे. तो सांगायचा की, हे सारे गणिताप्रमाणेच असते. स्वत गणितज्ज्ञ असलेल्या जॉनचे वडीलही गणितज्ज्ञ होते. जॉन युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत होता. मात्र नंतर त्याला दगडांच्या देशाचेच वेध लागले आणि त्याने विद्यापीठ सोडून दगड आणि पहाडांचे गणित सोडविण्याचा निर्णय घेतला. पहाड चढताना त्याची चढाई समुद्रातील तारा माश्याप्रमाणे असायची. त्याचे साधन म्हणजे केवळ एक छोटीशी पिशवी, जिच्यात एक प्रकारची पावडर ठेवलेली असायची. या चढाईदरम्यान आद्र्रतेमुळे हात ओले झाले की त्या पावडरने ते तो कोरडे करायचा. तेवढेच एक साधन. तो म्हणायचा की, हात आणि पाय व्यवस्थित असताना बोल्टस्, कॅराबिनर्स किंवा रोप्स हवेतच कशाला. एखाद्या गणिताप्रमाणेच तो चढाईची चाल निश्चित करायचा. प्रथमच ठिकाणाचे निरीक्षण करून त्याचे समीकरण मांडायचा आणि त्यानंतर त्या समीकरणाची तीन भागात विभागणी करून गणितात अवयव पाडतात त्याप्रमाणे समीकरणाच्या माध्यमातून चढाई करायचा. तीन भागांपैकी पहिला भाग असायचा खाली पडल्यास कोणताही धोका नाही, दुसरा भाग खाली पडल्यास धोका आणि थेट रुग्णालय आणि तिसरा भाग चूक झाल्यास थेट मृत्यू. या तिसऱ्या भागातच बाचरला प्राण गमवावा लागला. जगातील सवरेत्कृष्ट फ्री- क्लाइंबरचा मान त्याने १९७०पासून कायम राखला. त्यामागे त्याची वर्षांनुवर्षांची तपश्चर्या होती. १४ वर्षांचा असताना तो केवळ दोन पुलअप्स काढू शकायचा. १६ वर्षांचा असताना मात्र त्याने जोशुआ ट्रीवर पहिली यशस्वी चढाई केली. कोणत्याही प्रकारच्या साधनांशिवाय गिर्यारोहणाचा प्रयत्न करणारा बाचर हा या क्षेत्रात जगभरात आश्चर्य म्हणूनच गणला गेला. मध्यंतरी एका प्रयत्नात तो ५० फुटांहून अधिक उंचीवरून खाली पडला, त्यानंतर त्याला काही काळ उंचीची भीती वाटू लागली होती. मात्र त्यानंतर त्याने प्रयत्नपूर्वक आपली ती भीती घालवली आणि पुन्हा नेटाने यशस्वी चढाई करण्यास सुरुवात केली. आता पुन्हा खाली पाहतोस का कधी, असे विचारले असता तो सांगायचा की, ‘खाली पाहताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायला शिकलो. मग तोच आनंद लुटायचो. आता खाली पाहताना काहीच वाटत नाही.’ व्यायामाची आवड असणाऱ्या जॉन बाचरने झाडांवरच आपली व्यायामशाळाही थाटली होती. अचानक अवसान गळल्यासारखे वाटते त्यावेळेस काय करतोस, असे विचारले असता तो सांगायचा की, ‘डोळे बंद करून शरीराला थेट ऊर्जाप्रवाह जोडल्याची कल्पना करतो’ आणि मग त्याला खरोखरच ऊर्जा मिळायची..! अशा या अवलियाची ती सळसळणारी ऊर्जा आता मात्र थंडावली आहे. मात्र येणारा काळ त्याचे हे गणिती धाडस कायम स्मरणात ठेवेल, यात शंका नाही.