Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

विविध

भारत-पाकिस्तान चर्चेत सहभागी होण्यासाठी आयएसआय प्रयत्नशील
इस्लामाबाद, २३ जुलै/पीटीआय

भारत व पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या चर्चेत सहभागी करून घेण्यात यावे अशी इच्छा पाकिस्तानी लष्कर व इंटर-सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संघटनेने व्यक्त केली असून, त्यासाठी सक्रिय प्रयत्नही सुरू केले आहेत. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानची धोरणे ठरविण्यात तेथील लष्कर व आयएसआय यांचाच प्रमुख वाटा असतो. त्यामुळे भारत व पाकिस्तान दरम्यानच्या चर्चेमध्ये आपण महत्वाची भूमिका बजावू शकतो असे पाकिस्तानी लष्कर व आयएसआयला वाटते.

इंदिरा गांधी शांतता पुरस्कार बिल गेट्स स्वीकारणार
नवी दिल्ली, २३ जुलै/पी.टी.आय.

प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार स्वीकारण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’चे जनक बिल गेट्स सध्या येथे आले आहेत. बिल आणि मेलिन्डा संस्थेतर्फे जगभर होत असलेल्या आरोग्य सुधारणा तसेच एचआयव्ही बाधितांसाठी सेवा मोहीमेनिमित्त हा पुरस्कार जाहीर झाला असून बिल गेट्स तो स्वीकारणार आहेत. गेट्स हे आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांचीही भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘श्रीलंका क्रिकेटपटूंवर हल्ला आम्ही घडविला हा कांगावाच’
भारताने सुनावले!

नवी दिल्ली, २३ जुलै/पी.टी.आय.
लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर झालेल्या हल्ल्यामध्ये हात असल्याचा आरोप हा पाकिस्तानचा हा नवा कांगावा असल्याचे सांगत भारताने तो फेटाळून लावला तसेच त्याबाबतची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे पाकिस्तानने सोपविली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

मध्य प्रदेशात पावसाचा धुमाकूळ, इंदूरमध्ये सहा ठार
इंदूर, २३ जुलै/पी.टी.आय.

मध्य प्रदेशात, विशेषत: माळव्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून इंदूरमध्ये सहाजणांचा मृत्यू ओढवला आहे. पावसाने या भागातील रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीचे पार तीनतेरा वाजविले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. इंदूर शहरात वीजतारेचा धक्का लागून चारजण तर जोरदार प्रवाहात बुडून दोनजण दगावले आहेत.

देशमुख-राणे भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
नवी दिल्ली, २३ जुलै/खास प्रतिनिधी

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांची आज राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीतील उद्योग भवनात भेट घेऊन सुमारे सव्वा तास चर्चा केली. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसमधील या दोन कट्टर प्रतिस्पध्र्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

‘कॉन्टिनेन्टल’चे माफीपत्र मिळाले नाही -डॉ कलाम
कोची, २३ जुलै/पी.टी.आय.

शिष्टाचाराचा भंग करीत अंगझडती घेतल्याप्रकरणी माफी मागितलेल्या अमेरिकेच्या ‘कॉन्टिनेन्टल एअरलाइन्स’ कडून आपणास अद्याप तसे माफीपत्र मिळाले नसल्याचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आज येथे बोलताना सांगितले. ‘कॉन्टिनेन्टल’ ने तसे पत्र पाठविले असले तरी ते त्याबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचेही डॉ. कलाम म्हणाले. एप्रिल महिन्यात नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर डॉ. कलाम यांची सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे अंगझडती घेण्यात आली.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नाही
नवी दिल्ली, २३ जुलै/खास प्रतिनिधी

महाराष्ट्रात राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी स्वतंत्रपणे मतदान करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या ३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. १० ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या या पोटनिवडणुकांना स्थगिती देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. पण या निवडणुकांसाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज भरता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांच्या आसनाजवळ दिसला नाग
भुवनेश्वर :
ओरिसाच्या विधानसभेत मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या आसनाजवळच आज नाग दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे पाचावर धारण बसलेल्या मंत्र्यांची भीती घालविण्यासाठी साप पकडणाऱ्या गारुडय़ांना विधानसभेत पाचारण करावे लागले. नागाचा शोध घेण्यासाठी श्वानपथकालाही बोलावण्यात आले.

इम्फाळमध्ये भर बाजारपेठेत चकमक; दोन ठार
इम्फाळ, २३ जुलै/वृत्तसंस्था

इम्फाळच्या गजबजलेल्या बाजारपेठेत आज पोलीस कमांडो आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक अतिरेकी आणि एक महिला ठार झाली तर पाचजण जखमी झाले. खबर मिळाल्यावरून पोलिसांनी या संशयित अतिरेक्यांचा पाठलाग सुरू केला व त्यांच्यावर गोळीबार केला तेव्हा ही चकमक सुरू झाली. यात जखमी झालेल्या पाचजणांमध्ये दोन महिला व एका कमांडोचा समावेश आहे.

गोल्डन चॅरियटच्या वैभवात गोल्फची भर
बेंगळुरू, २३ जुलै / पीटीआय

गार्डन सिटी ते हम्पी असा राजेशाही प्रवास घडविणाऱ्या गोल्डन चॅरियट या रेल्वेच्या वैभवात आता आणखी एक भर पडली आहे ती गोल्फची. जपानसारख्या देशातील लोकांना गोल्डन चॅरियटकडे आकर्षित करण्यासाठी पुरस्कर्त्यांनी ही शक्कल लढविली आहे. बेंगळुरूसारख्या भागात गोल्फ खेळण्यासाठी फार चांगले वातावरण आहे. याचमुळे गोल्फचा विचार करण्यात आला, अशी माहिती गोल्डन चॅरियटचे प्रकल्प संचालक आनंद मेनन यांनी सांगितले.

विहिंपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओंकार भावे कालवश
नवी दिल्ली :
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओंकार भावे यांचे अल्प आजाराने आज निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. भावे यांना गेल्या २७ जूनपासून राम मनोहर लोहिया इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काल रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. फुफ्फुसे निकामी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रावर ठेवण्यात आले होते. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ओंकार भावे ब्रह्मचारी होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य हिंदू धर्माच्या प्रचारासाठी वेचले. १९३८ पासून ते राष्ट्रीय संघाचे प्रचारक म्हणून काम करू लागले. यानंतर त्यांनी विश्व हिंदू परिषदेसाठी काम सुरू केले. प्रयाग विद्यापीठातून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले. राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

स-गोत्री विवाह केल्याबद्दल पतीची दगडांनी ठेचून हत्या
चंदिगढ :
आपली नववधू सोनिया हिला परत घेऊन जाण्यासाठी आलेला तिचा पती वेद पाल याची पोलिसांच्या उपस्थितीतच संतप्त जमावाने दगडांनी ठेचून हत्या केल्याची भीषण घटना हरयाणातील जिंद जिल्ह्यातल्या सिंघवाल गावामध्ये बुधवारी रात्री घडली. वेद पाल याने आपल्याच उपजातीतील सोनियाशी चार महिन्यांपूर्वी विवाह केला होता. मात्र हा विवाह ‘स-गोत्री’ असल्याने तो सोनियाच्या घरच्यांना नापसंत होता. वेद पाल (२१ वर्षे) हा आपली पत्नी सोनिया हिला परत घेऊन जाण्यासाठी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने नियुक्त केलेला वॉरंट अधिकारी व हरयाणाचे १५ पोलिस अशा फौजफाटय़ासह सिंघवालला होता.

बहुउद्देशीय ओळखपत्र देणाऱ्या निलकेणींच्या प्रकल्पाचे काम सुरू
नवी दिल्ली, २३ जुलै/वृत्तसंस्था

देशातील १.१७ अब्ज लोकांना विशेष बहुद्देशीय ओळखपत्र देण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नंदन निलकेणी यांनी आजपासून आरंभ केला. ‘युनिक आयडेंटिफिकेशन डाटाबेस ऑथिरिटी ऑफ इंडिया’चा गुरुवारी निलकेणी यांनी पदभार स्वीकारला. या प्राधिकरणाचा मुख्य उद्देश हा देशातील प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करून त्यांना बहुद्देशीय ओळखपत्र देण्याचा आहे, असे निलकेणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशातील प्रत्येक व्यक्तींची ओळख विश्वासार्हपणे या योजनेमध्ये एकत्रित केली जाणार आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट ओळख असणे आवश्यक आहे. नोकरी मिळविताना प्रत्येकाला या ओळखीचा उपयोग होऊ शकतो. विशेषत देशातील गरीब लोकसंख्येला या ओळखपत्राचा फायदा होऊ शकतो. प्रत्येकाच्या व्यावसायिक कौशल्यांच्या मूलभूत माहितीसह नोंदणी या ‘बायोमेट्रिक’ ओळखपत्रात करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.