Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ जुलै २००९
  कुठे गेले हे पदार्थ?
  पण बोलणार आहे!
मग मी काय करू?
  व्हू पॉइंट
बाटलीतल्या राक्षसिणीचं मनोगत
  प्रतिसाद
  स्मरण कारगिलचं!
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
  थँक्यू मॅडम
  स्त्री हितकारिणी
  परिवार मंगलम्
  चिकन सूप...
मनाला सुविचाराची साथ
  'ती'चं मनोगत
कोवळी पालवी
  चाफ्याच्या झाडा..
  भावगीतांची मोहरलेली गुहा
  वेलीवरचा खोपा आणि खारीचा वाटा
  खूबलेई शिलाँग!
  अमेरिकन रामायण

 

कुठे गेले हे पदार्थ?
विस्मृतीत गेलेल्या पदार्थाचं नाव काढताच तुमचीही रसना पाझरत असेल. मग तुम्हीही कळवा अशा विस्मृतीत गेलेल्या पदार्थाच्या कृती.. त्यांच्या सांस्कृतिक संदर्भासह ! पत्ता- ‘कुठे गेले हे पदार्थ?’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यलय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ किंवा chatu.lok@gmail.com पाठवण्याची अंतिम तारीख- ५ ऑगस्ट.

श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा काळ. श्रावणमासात पूर्वी प्रत्येक सणाला खास वेगळे पदार्थ बनवले जात. ग्रामीण भागांत आजही काही अंशी त्यांना स्थान आहे. मात्र, हळूहळू त्यातले काही पदार्थ आता विस्मृतीत जात चालले आहेत. आपल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीला एक प्रकारे लागलेले हे ग्रहणच आहे. विस्मृतीत चाललेल्या अशा काही पदार्थाबद्दल..
पूर्वी आषाढ अमावस्येला- दिव्याच्या अवसेला घरातले दिवे घासूनपुसून लख्ख केले, उजळलेल्या ज्योती खडीसाखरेच्या खडय़ाने पुढे केल्या की सणावारांच्या आनंदाची चाहूल लागायची. भिंतीवर जिवतीचा कागद चार चुकांमध्ये (खिळ्यांमध्ये)

 

झळकला की श्रावण आला, हे समजायचं. घरातल्या कर्त्यां स्त्रियांच्या तोंडी ‘पुरणावरणाचा स्वयंपाक’ असं वारंवार ऐकू येऊ लागायचं. श्रावणाचा रसरशीत ताजेपणा असा चहूबाजूंनी दाटून यायचा. आणि जेवताना- विशेषत: दिवसभराचा उपास केळीच्या पानावर जेवून सोडताना त्या पानावरही उतरायचा.
श्रावण हा खास धार्मिक व्रतवैकल्यांचा महिना. धार्मिक अधिष्ठान असल्याने नेमस्त खाण्याचा महिना. आज समाजविचारांत फरक झाल्यामुळे या शास्त्र-रूढींबद्दलच्या कल्पना लवचिक झाल्या आहेत. ५०-६० वर्षांपूर्वी शाकाहारींसाठी कांदेनवमी आणि मांसाहारींसाठी गटारी हे ‘असलं तसलं’ खाण्यासाठीचे श्रावणपूर्व स्टॉप होते. आज परिस्थिती इतकी कडक राहिली नसली, तरी बऱ्याच प्रमाणात श्रावण ते गणपती विसर्जन या काळात मांसाहार वज्र्य केला जातो. परंपरेने चालत आलेल्या या आहार-विभागणीमागे ऋतुमान आणि शरीराची चयापचय क्रिया यांचा विचार केलेला दिसतो. अलीकडचा पावसाचा लहरीपणा सोडला तर सर्वसामान्यपणे आषाढापासून सुरू झालेल्या पावसाळी काळात पचनाचं प्रमाण कमी होतं. अग्निमांद्य होतं. त्यावर तोडगा म्हणजे दिवसभराचा उपास आणि संध्याकाळी लवकर जेवणं. म्हणूनच आहारही साधा हलका, पचण्यास सुलभ असा! श्रावणाचं हे चित्र डोळ्यासमोर आलं आणि केळीच्या पानावरचा नैवेद्य, पावसाळ्यात जंगलरानात, दऱ्याखोऱ्यांत वाढणाऱ्या औषधी गुणधर्माच्या पावसाळी भाज्यांची, पुरणावरणाची, गव्हल्याच्या खिरीची, मुगाच्या बिरडय़ाची, सुधारस, शिकरणीची, सोजी-पंचामृताची सय आली. सयीबरोबर एक सलही होता. आज हे सारं पूर्णपणे हरवलं नसलं, तरी त्या दुरातल्या प्रतिमा झाल्या आहेत. उपयुक्तता, नावीन्य, सहजप्राप्तता, गुणवत्ता या आणि अशा अनेक व्यावहारिक निकषांसोबत येणारा कोणताही बदल- मग तो आहारातला असो की इतर- खुल्या मनाने स्वीकारणे हे विशाल दृष्टीचं द्योतक असतं. पण त्याच वेळी ती आपल्या मुळांशी नातं दुरावणारी आणि त्यापायी खंतावणारी बाब ठरू नये.
केवळ श्रावणातल्या पदार्थाचाच विचार केला तरी त्यातले किती पदार्थ आज निगुतीने घरी केले जातात? श्रावण सोमवारी संध्याकाळच्या नैवेद्यावर वाढण्यात येणारी रव्याची किंवा बोटव्याची खीर आजच्या बालपिढीला कितपत माहीत आहे? टीव्हीवरच्या जाहिरातीत दिसणारी व्हर्मिसिली शेवयांची खीर मात्र त्यांना ओळखता येते. आज मुलांना मिल्कशेक्स माहीत असतात, पण सरळ-साधी मराठमोळी शिकरण किती घरांतून होते? आणि आवडीने खाल्ली जाते? आजही मी कुणीतरी आपल्याला मंगळागौरीचं पारंपरिक जेवणाचं बोलावणं करील, या आशेवर असते. वालाची किंवा मटकीची उसळ, मसालेभात, भाजणीचे वडे, दही.. व्वा! काय मेन्यू असतो! पुरणपोळ्या आजकाल सर्रास विकत मिळतात. पण नुसतं पुरण करायचं असेल तर ते कसं व्हायला हवं? डाळ तर शिजली पाहिजे; पण त्याचा दळदारपणा जाता कामा नये. श्रावण शनिवारी कहाणीत वर्णन केलेली केनीकुर्डूची भाजी नाही केली, तरी फक्त पावसाळ्यात येणाऱ्या करटोली, भारंग, टाकळा, शेवळं यांसारख्या भाज्या करून बघायला काय हरकत आहे? श्रावण महिन्यात ‘सोजी’ नावाचा भाताचाच एक प्रकार केला जातो. तांदूळ तुपावर भाजून शिजवायचे- की झाली सोजी! भाताचा असाच दुसरा प्रकार- जो पूर्वी आजारपणात दिला जायचा, तो म्हणजे कण्हेरी. तांदळाच्या कण्या भाजून शिजवायच्या. हलका आहार म्हणून. पावसाळ्यात दोडकी- शिराळी भरपूर येतात. त्याची साल काढून टाकून दिली जाते. पण तीच साल बारीक चिरून, तेलावर परतून, त्यात तीळ, सुकं खोबरं किसून, तिखट, मीठ, चिंच, गूळ घालून केलेली चटणी रुचिपालट करू शकते. अशाच पद्धतीने दुधीच्या सालीचीही चटणी करता येते. लेखाच्या सुरुवातीला सुधारसाचा उल्लेख केला आहे. एवढं सुंदर नाव असलेला पदार्थ बनवायला किती सोपा! साखरेचा पातळ पाक करायचा आणि त्यात लिंबू पिळायचं. त्याला अधिक फॅन्सी करायचा असेल तर पिक्क्या केळ्याचे काप, बेदाणे, वेलची पूड असं घालवून तो नटवायचा. ५०-६० वर्षांपूर्वी पोळीबरोबरचा (आणि झटपट होणारा) गोड पदार्थ म्हणून हा लोकप्रिय होता. आज ए टू झेड या आद्याक्षरांनी सुरू होणाऱ्या सगळ्या फळांचे जॅम्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे मुरांबा, गुळांबा कालबाह्य़ होण्याच्या मार्गावर आहेत. ब्रेड स्लाइसवर जॅम लावून बाळराजांचा टिफिन सजवणं नक्कीच व्यवहार्य आहे. पण घरात असताना मऊसूत पोळीबरोबर चकचकीत मुरांब्याची ओळख आपणच त्यांना करून द्यायला हवी ना!
प्रत्येक समाजाची विशिष्ट खाद्यसंस्कृती असते आणि त्या- त्या प्रदेशाच्या हवामान, पीकपाणी या घटकांवर ती आधारित असते. लहानपणापासून माणूस पोसतो तो याच खाद्यसंस्कृतीवर. पोसतो म्हणण्यापेक्षा पोसत होता, असं म्हणणं आता योग्य ठरेल. कारण आता जग छोटं होत चाललंय आणि विकासाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. kYou cannot educate your tonguel ’ असं म्हटलं जातं. माणूस कितीही फिरला, समृद्ध झाला, तरी लहानपणाच्या घासाची चव विसरू शकत नाही. त्याला नेहमी त्याचीच ओढ वाटते. म्हणूनच तर अनेक सेलिब्रिटीज एखाद्या निवांत क्षणी त्यांच्या बालपणीच्या अन्नाची दिलखुलास तारीफ करताना दिसतात. पण सध्याच्या बाल व किशोर पिढीचं आपल्या संस्कृतीशी नातं जुळायच्या आधीच जगभराशी परिचय होतो आहे. खाद्यसंस्कृतीपुरतं बोलायचं झालं तर पोरं जराशी भुईतून वर येऊन टीव्हीसमोर बसण्याच्या वयाची झाली की त्यांच्या फर्माईशी सुरू व्हायला लागतात. कुटुंबाचाही आकार बदलल्यामुळे बाळराजे एकटेच असल्याने आणि आई-वडील दोघांचाही अर्थार्जनात सहभाग असल्यामुळे बऱ्याचदा या मागण्या पूर्णही होतात. खिमट, वरण-भाताच्या जागी बेबी फूडस् आली. सांजा, शिरा, पोहे, उकड कालबाह्य़ झाली. बेकरी प्रॉडक्टस्, नूडल्स, बर्गर, वडापाव, सामोसे जवळचे झाले. या सगळ्या म्हणण्याचा अर्थ आपण आपल्याच संस्कृतीला कायम चिकटून राहावे, असा मुळीच नाही. प्रगतिपथावर वाटचाल करताना ‘नवे नवे ते मज सर्व हवे’ हा अनुभव डोळसपणे घ्यायलाच हवा. परंतु त्याच वेळेस आपल्या सांस्कृतिक संचिताचंही मोल जाणायला हवं. आणि त्यात तोटा तर काहीच नाही. असलाच तर डबल फायदाच आहे.
या विषयाचा विचार करीत गेले आणि विस्मृतीत जात चाललेले कितीतरी पदार्थ डोळ्यांपुढे आले. हे निव्वळ स्मरणरंजन नाही, तर अस्तंगत होत चाललेल्या आपल्या खाद्यप्रकारांची नव्या पिढीला ओळख व्हावी, त्यांनीही त्यांचा मजा लुटावा आणि खूश व्हावं, ही या खवय्यीची त्यामागची कळकळ आहे. मध्यंतरी आम्ही शाळासोबत्यांनी ‘गेट टुगेदर’ केलं. सकाळच्या न्याहारीला जेव्हा भाजणीचे वडे, दह्य़ाचा कवडा आणि चटणी दिली तेव्हा मंडळी अशी खूश झाली! भाजणीवरून आठवलं- भाजणीचं थालीपीठ, वडय़ांव्यतिरिक्त मोकळ भाजणी असाही एक खाद्यप्रकार केला जातो. साधारणत: वाटली डाळीसारखा हा प्रकार भरपूर नारळ घालून खायचा. पूर्वी गणपती विसर्जनाच्या वेळेस वाटली डाळ खिरापत म्हणून वाटली जायची. गणपतीच्या वास्तव्यकाळात खिरापत म्हणून किसलेल्या सुक्या खोबऱ्यात पिठीसाखर मिसळून वाटण्याची प्रथा होती.
आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीत खाण्यापिण्याची भरपूर रेलचेल आहे. जेवणाचं पान कसं वाढावं, याचंही एक व्याकरण आहे. डावीकडचे पदार्थ आणि उजवीकडचे पदार्थ अशी त्यांची विभागणी केलेली आहे. डावीकडे मीठ (नैवेद्याचं पान असेल तर ते वाढायचं नाही!), लिंबाची फोड, चटणी, कोशिंबीर, खीर, पुरण, उजवीकडे पातळ भाजी, सुकी भाजी, मध्यभागी वरणभाताची मूद, त्याच्यासमोर पोळी, पुरी आणि पक्वान्न (गोड पदार्थ) या क्रमाने पदार्थ वाढले जात. डावीकडच्या ‘तोंडी लावण्यांचा’ विचार केला तरी त्यात किती विविधता आहे! चटण्यांचेच प्रकार किती! ओल्या नारळाची चटणी ही सण-समारंभाची फेव्हरिट्. तर इतर वेळेस झणझणीत लसूण चटणी, तिळाची चटणी, कारळ्याची, कढीलिंबाची, दाण्याची या सगळ्या सुक्या चटण्या. ओली चटणी वाटल्यानंतर पाटा-वरवंटय़ावर पाणी, नाही तर ताक घालून निपटून काढलेला प्रकार फारच चविष्ट.
कोशिंबिरीमध्येही दोन प्रकार : दाण्याचं कूट घातलेल्या आणि दही घातलेल्या. काकडी, टोमॅटो, केळी, कोवळी कोबी, भोपळा अशा विविध भाज्यांच्या कोशिंबिरी होतात. काकडीत दाण्याचं कूट, तुपाची फोडणी, मिरच्या, मीठ, लिंबू घातलं की खमंग काकडी. भोपळा उकडवून दह्य़ातलं भरीत केलं तरी त्यात थोडासा ‘पंच’ येण्यासाठी मोहरी खरंगटून घालायलाच हवी. भाजलेले शेंगदाणे, तीळकूट, दाण्याचं कूट, सुक्या खोबऱ्याचे काप, हिरव्या मिरच्या, मीठ, चिंच, गूळ, गोडा मसाला, फोडणी घालून केलेलं पंचामृतही डावीकडचं आकर्षण ठरतं. उजवीकडच्या भाज्यांमध्ये सुक्या भाज्या बदलू शकतात, पण पातळ भाजीचा मान अळूच्याच भाजीला. वरण-भाताच्या मुदीवरचं वरणही दळदार हवं. बाहेर पातेल्यात हिंग, हळद घालून शिजवलेल्या वरणाची चव प्रेशर कुकरच्या वरणाला येत नाही. पक्वान्नांमध्ये श्रीखंड, बासुंदी, ओल्या नारळाच्या करंज्या, दिंड पुरणाचे कडबू, खीर-पुरी, घावण घाटलं, तऱ्हेतऱ्हेचे लाडू, घारगे, साखरभात, नारळीभात आणि लग्नकार्यात जिलबी असा साधारण प्रघात होता. आज महाराष्ट्रीयन लग्नातही अनेक ‘छत्र्यां’खाली जाऊन ‘बे-महाराष्ट्रीयन’ जेवण जेवावं लागतं.
उकडीचे मोदक हा मराठी मनाचा जिव्हाळ्याचा विषय. आज बाजारात तेही उपलब्ध आहेत. पण त्याच्याबरोबरचा एक अविभाज्य भाग- मिरचीचा ठेचा, जिरं, मीठ उकडीत घालून केलेल्या निवग्य््राा- त्या कुठे मिळणार? गरम निवग्री कच्च्या तेलात बुडवून खायचा आनंद काही औरच.
आपल्याकडे न्याहारीचे पदार्थही किती आहेत! फोडणीचे पोहे, दडपे किंवा बैठा पोहे, जाड रव्याचा तिखटामिठाचा सांजा (उपमा नव्हे!), केळं, वेलची-बेदाणे घातलेला गोड शिरा, ताकातली उकड, केळ्याच्या पानातली पानगी, धिरडी, साधे घावन, काकडीचे घावन, मालवणी पद्धतीची घावने, आंबोळ्या, साबुदाण्याची खिचडी, शिळ्या पोळ्यांचा पोळीचा लाडू नाही तर फोडणीची पोळी, शिळ्या भाताचा कांदा, शेंगदाणे घालून केलेला फोडणीचा भात.
पिठलं हा खास महाराष्ट्रीय पदार्थ. झुणका हे याचं घट्ट, सुकं रूप. त्याच्याबरोबर भाकरी हवीच. पिठलं-भाताच्या जेवणातलं पिठलं मात्र पातळ असतं. कै. रवींद्र पिंग्यांच्या लेखनात वारंवार उल्लेखित होणारी कुळथाची पिठी हा कोकणवासीयांचा खास आवडता आणि चविष्ट प्रकार. या कुळथाच्या पिठल्याच्या चवीचं रहस्य कुळीथ भाजून पीठ करण्यावर आहे. आंबट म्हणून यात आमसुलं, कैरी, पिक्के कोकम असे पदार्थ ऋतुमानानुसार अदलून-बदलून घातले जातात. अतिशय कमी वेळात झटपट तयार होणारं जेवण म्हणजे पिठलं-भात आणि मुगाच्या डाळीची खिचडी. याबरोबर पापड किंवा लोणचं घेतलं की झालं जेवण.
पापडावरून आठवण झाली- आपल्याकडे साठवणीचे पदार्थही बरेच आहेत. साध्या पापडांचेच किती प्रकार- उडीद, पोहे, बटाटे, ज्वारी, नाचणी वगैरे. याशिवाय बऱ्याच प्रकारचे सांडगे, चिकवडय़ा, कुरडया, फेण्या. काही ठिकाणी भाज्या, पालेभाज्याही वाळवून ठेवल्या जातात. विदर्भातली भुरका भाजी अशा वाळलेल्या पालेभाज्यांचीच करतात. याशिवाय उकडांबा, मेथ्यांबा, आंबोशी, आंबापोळी हे आंब्यापासून केलेले साठवणीचे पदार्थ, तर मेतकूट, वेसवार ही सुकी तोंडीलावणी.
सारस्वतांचं पारंपरिक जेवणही रसिलं असतं. ओल्या नारळाचा भरपूर वापर आणि मसाले माफक प्रमाणात; त्यामुळे त्या- त्या पदार्थाची चव खुलून येते. सारस्वत मत्स्याहारी असल्यामुळे जास्तीत जास्त प्रकार माशाचेच केले जातात. हळदीच्या पानातला बांगडा हा खास सारस्वती प्रकार. याशिवाय शाकाहारी पदार्थात खदखदं ही मिश्र भाजी, अननस-फणसाची भाजी, रायवळ आंब्याचं सासव, मुगाचं बिरडं, मुगाचं आंबट हे पारंपरिक पदार्थही केले जातात.
हरितालिकेच्या आदल्या दिवशी कायस्थ घरांत आवर्जून होणारा पदार्थ म्हणजे निनावं. दिवाळीत केले जाणारे खाजाचे कानवले म्हणजे कायस्थ गृहिणींचा अभिमानाचाच विषय. अत्यंत मेहनतीने आणि निगुतीने केलेल्या या अरुवार करंज्यांना जेव्हा खाणाऱ्याकडून दाद मिळते तेव्हा गृहस्वामिनीच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचा आनंद उजळतो. म्हणूनच आपला हा वारसा पुढे चालू राहावा, या ओढीने प्रत्येक पिढी नवीन पिढीला घडवत असते. याशिवाय, वालाचं बिरडं, वालाची खिचडी, सोडय़ाची खिचडी, शेवळाची भाजी, मसुराची आमटी हे काही खास कायस्थी पदार्थ.
मांसाहाराची मेजवानी लुटायची तर मालवणी पदार्थाना पर्याय नाही. मालवणी जेवण म्हटलं की चटकन् आठवतात कोंबडी-वडे. याशिवाय मटणाचे प्रकार, मालवणी मसाला, तिसऱ्याचं (शिंपल्या) सुकं, चिंबोऱ्या, आंबोळ्या, घावने असा अस्सल मराठी बाण्याचा खाद्यसोहळा. गोकुळाष्टमीला केले जाणारे गोपाळलाडू ही खास मालवणची खासियत आहे. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे ऑल टाइम फेव्हरिट सोलकढी आहेच.
एकेकाळी आपल्या जीवनाची तृप्तीरेखा असलेले हे पदार्थ खरंच आपण विसरत चाललो आहोत का? नक्कीच नाही. अजून ते आपल्या निदान मनात तरी रेंगाळत आहेत. कदाचित पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवण्याच्या प्रयत्नांत आपण कमी पडतोय. या पदार्थाना आजही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणारे व्यावसायिक हात आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचे प्रयत्नही स्तुत्य आहेत. पण जिथे आईच्या हातच्या स्वयंपाकाची गोडी बायकोच्या हाताच्या स्वयंपाकात मानून घ्यायला बराच कालावधी जावा लागतो, तिथे ‘मास स्केल’वर तयार होणाऱ्या व्यावसायिक पदार्थाविषयी काय बोलावं?
आज आपली कुटुंबरचना बदलत चाललीय. घरातली इन मिन तीन माणसंही हल्ली वीकएन्डलाच एकत्र भेटतात. नोकरी- व्यवसायाव्यतिरिक्तची कामं त्यात आवरायची असतात. विश्रांतीही हवी असते. तरीही एखाद्या घरकाम करणाऱ्या सहाय्यकाची किंवा थोडी मोठी मुलं असतील तर त्यांची मदत घ्यावी. अशा एखाद्या पदार्थाचा घाट घालावा. सगळ्या कुटुंबाने एकत्र काम करण्यातली मजा काही औरच असते. ब्रँडेड दही माहीत असणाऱ्या मुलांना चिनी मातीची बरणी, विरजण यांचा परिचय करून देऊन दही बनवायला शिकवावं. दह्याचं ताक (छास) होतं, त्यातून लोणी निघतं, हे सांगितलं नाही तर पुढची पिढी फक्त ‘बटर’वरच पोसेल. सॅलड्सची माहिती असणाऱ्या तरुण मुलांना कोशिंबिरीही समजावून सांगायला हव्यात. पुरणपोळ्या, मोदक घरातही करता येतात, हे मुलांना कळायला हवं. आणि खरं सांगू का, काहीतरी करण्याचा घाट घातला ना की घरच कसं बदलून जातं! तयारी, लगबग, पदार्थाची दरवळ, उत्कंठा.. आणि मग ताटात भरून येणारा तो आनंद! जवळपासच्या दुकानातून पैसे मोजून पदार्थ आणता येईलही, पण उत्साहाने, उत्कंठतेने फसफसलेलं ते घर आणि तो आनंद छोटय़ाशा बशीत कुठे सापडणार?
खाण्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी देश-स्थल-कालाची बंधनं कधीच नसावीत. भारतातल्याच रसनाविशेषांनी आपला दिवस घडतो. नाश्त्याला इडली, वडा सांबार, दुपारच्या जेवणात पुलाव- पनीर- छोले- राजमा, संध्याकाळी चटकमटक कबाब कटलेट, याशिवाय पाश्चिमात्य जगतातून आलेले पिझ्झा- बर्गर- पास्ता! आपलं खाद्यविश्व किती समृद्ध झालंय ना! तरीही थकूनभागून घरी गेल्यावर ओढ लागते ती ‘आपल्याच’ जेवणाची. आणि नेमकं हेच आपल्याला जपायचं आहे.. पुढल्या पिढीकडे सुपूर्द करायचं आहे.

गव्हले
खिरीसाठी लागणारे बोटवे किंवा गव्हले काढण्याची एक पद्धत आहे. कणिक आणि बारीक रवा दुधात भिजवून त्याचा सैलसर गोळा ओल्या फडक्याखाली झाकून ठेवायचा. थोडं थोडं पीठ हातात घेऊन त्याचा पातळ रोल करायचा. एका टोकाला अतिशय बारीक करून चिमटीने त्याचे बारीक बारीक नखासारखे तुकडे पाडायचे. एका ताटात ते सुटे सुटे पडायला हवेत. मग ते ताट उन्हात ठेवून गव्हले खडखडीत वाळवून घ्यायचे. डब्यात भरून ठेवायचे. खीर करताना त्यात दूध व साखर घालून शिजवायचे.
चारुशीला धर
charusheela.dhar@gmail.com