Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

नाइट अ‍ॅट द म्युझियम : बॅटल ऑफ द स्मिथसोनियन
मैत्र इतिहासाचे!

जगाच्या इतिहासात ज्यांना रस आहे आणि विनोदाने भावना दुखावून घेण्याची ज्यांना सवय नाही, त्यांच्यासाठी ‘नाइट अ‍ॅट द म्युझियम : बॅटल ऑफ द स्मिथसोनियन’ ही मजेदार करमणूक आहे.
‘म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’चा काही काळापूर्वीचा नाइट गार्ड- रात्रपाळीचा रखवालदार लॅरी (बेन स्टिलर) हा या चित्रपटाचा नायक. बेन स्टिलर हा विनोदी अभिनेता. मात्र या चित्रपटातल्या विनोदाची सगळी भिस्त त्याच्यावर नाही, तर चित्रपटाच्या कथासूत्रावर, पटकथेवर ती आहे. म्युझियममधली, विविध काळातली, पृथ्वीच्या विविध भागातली एक्झिबिट्स- थोडक्यात जगाच्या इतिहासातली विविध पात्रं इथे जिवंत होऊन वावरतात, त्यांचा लॅरी हा वर्तमानकाळातला माणूस केवळ साक्षीदारच नाही, तर त्यांच्या संघर्षातलं, त्यांच्या नाटय़ातलं पात्र असतो.

‘बॉण्ड गर्ल’ नसणारी मेगन फॉक्स
‘ओल्गा क्युरिलेन्को’ किंवा जेमा आर्टरटन’ या टेनिस जगतातल्या उभरत्या खेळाडू नाहीत, तर ‘क्वाण्टम ऑफ सोलॅस’ या गेल्या वर्षीच्या चित्रपटातील ‘बॉण्ड गर्ल्स’ आहेत. त्यापूर्वीची ‘इव्हा ग्रीन’ लोकांना माहिती आहे, ती ‘कसिनो रॉयल’पेक्षा अधिक ‘ड्रीमर्स’नावाच्या चित्रपटात दिगंबर वेशभूषेत वावरण्यामुळे. काही ‘बॉण्ड गर्ल’ कमालीच्या लोकप्रिय ठरल्या तर काही कुठे गेल्या, नंतर त्यांचे काय झाले, याचा पत्ताही लागला नाही.

जोलीचा जळफळाट
‘बॉण्ड गर्ल’ बनण्यास मेगन फॉक्सने नकार दिला आणि हॉलीवूडच्या गॉसिप्स न्यूज एजन्सीजना मोठा खजिनाच हाती लागल्यासारखे झाले. ‘बॉण्ड गर्ल’ न मिळाल्यामुळे आता ‘जेम्स बॉण्ड’चे नाव वधू-वर सूचक मंडळात टाकायचे तेवढे त्यांनी शिल्लक ठेवले. इटालियन अभिनेत्री मोनिका बेल्युसीपासून भारतीय फ्रिदा पिंटोपर्यंत सगळ्या ‘बॉण्ड गर्ल’साठी कशा उपयुक्त आहेत, यावर चर्चा केली. परंतु या सर्व चर्चेपेक्षा मेगन फॉक्सच्या नकारालाच अधिक प्रसिद्धी मिळाल्याने अँजेलिना जोलीचा मात्र जळफळाट झाला.

‘बॉण्ड गर्ल’ व्यतिरिक्त फ्रिदा पिंटो
आगामी बॉण्डपटाच्या स्क्रीन टेस्टसाठी गेलेल्यांमध्ये फ्रिदा पिंटो हा एकमेव भारतीय चेहरा होता. यापूर्वी ऐश्वर्या रॉय आणि प्रिती झिंटा यांची ‘बॉण्ड गर्ल’साठी निवड झाल्याची कंडी भारतातच पिकविण्यात आली होती. (सुदैवाने ‘बॉण्ड सिस्टर’, ‘बॉण्ड आंटी’ ही पात्रे नसल्यामुळे आगामी चित्रपटात त्यांची चर्चा होण्याची कणमात्र शक्यता नाही.) शिल्पा शेट्टीने ‘बिग ब्रदर’च्या यशानंतर योगासने करण्याला अधिक महत्त्व दिल्यामुळे (आणि भारतात लोकप्रियतेत बॉण्डपेक्षा उंचीने जराही कमी नसणाऱ्या रामदेव बाबा यांचे शिष्यत्त्व पत्करल्याने) तिचेही नाव ‘बॉण्ड गर्ल’ यादीतून कटाप करण्यात आले.

बच्चेकंपनीचा ‘सुपर डान्सर’ रिअ‍ॅलिटी शो
‘आजची बच्चेकंपनी खूप हुशार आहे. ती टीव्हीवर किंवा चित्रपटातून एकदा पाहूनसुद्धा चटकन नृत्य करू शकतात. मी आणि शिल्पा दिल्लीत एक नृत्य स्पर्धा पाहायला गेलो होतो. त्यानंतर आम्ही ठरवले की आपल्या मराठी बच्चेकंपनीसाठी डान्स रिअ‍ॅलिटी शो करायचा. खरेतर आमच्या ‘ट्वेन्टी फाइव्ह फ्रेम्स’ या प्रश्नॅडक्शन कंपनीतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची स्क्रिप्ट आम्ही तयार केली होती. पण मग ई टीव्ही मराठीकडे गेल्यानंतर त्यांनी डान्स रिअ‍ॅलिटी शो करण्याबद्दल विचारले आणि आम्हालाही कल्पना आवडली. म्हणून आम्ही ‘सुपर डान्सर’ असा नवीन रिअ‍ॅलिटी शो २७ जुलैपासून दर सोमवार व मंगळवारी रात्री ९ वाजता दाखविणार आहोत’, अशी माहिती अभिनेत्री नम्रता शिरोडकरने ‘वृत्तान्त’ला दिली.

सोमवारपासून चित्रपटांचा ‘श्रावण महोत्सव’
श्रावण महिन्यानिमित्त झी टॉकीजवर विविध गाजलेल्या चित्रपटांचा ‘श्रावण महोत्सव’ सोमवारपासून सुरू होत आहे. यामध्ये २७ जुलैला ‘अगंबाई अरेच्चा’, २८ रोजी ‘यंदा कर्तव्य आहे’, २९ रोजी ‘चष्मेबहाद्दूर’, ३० रोजी ‘पक पक पकाक’, ३१ जुलै रोजी ‘आरं आरं आबा..’ तर १ व २ ऑगस्ट रोजी अनुक्रमे ‘जत्रा’ आणि ‘मातीच्या चुली’ असे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. हे सगळे चित्रपट दुपारी ३ वाजता प्रक्षेपित केले जातील.
प्रतिनिधी