Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

लोकमानस

..पण रसिकांनीच कट केला
ल्ल पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये तब्बल पंधरा वर्षे माळ्याची नोकरी करणाऱ्या निळू फुले यांनी कला क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर, चित्रपट-नाटय़क्षेत्रात जम बसवल्यानंतरही आपली ‘माळ्या’ची भूमिका एखाद्या ‘जागल्या’प्रमाणे सतत जागती ठेवली ती लोकशिक्षणाच्या, संस्कारांच्या माध्यमातून. व्यवसाय म्हणून निळूभाऊ नाटकं-सिनेमा करीत राहिले, पण त्याचबरोबर समाजाला आणि सहकारी कलाकारांना थेट काळजाला भिडणारे संदेश देत राहिले. विचारांचे पक्के असलेले निळूभाऊ शब्दांचेदेखील तितकेच पक्के होते. त्याचाच हा किस्सा मी प्रत्यक्ष अनुभवलेला.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात १९७८ साली मी मेहबूब स्टुडिओत सुषमा शिरोमणी आणि रमेश देव यांना भेटण्यासाठी गेलो होतो. एका गाण्याचे चित्रीकरण चालू होते. सुषमाजी-रमेशजींशी गप्पा

 

चालल्या असताना निळूभाऊ लांबूनच माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. रमेश देव यांचे त्या दिवशी रात्री साहित्य संघात ‘गहिरे रंग’ हे नाटक होते. त्यांच्याबरोबर नाटकाकरिता निघण्यासाठी बाहेर पडणार तोच निळूभाऊ मला म्हणाले, ‘शेवडे, दोन मिनिटं तुमच्याशी बोलायचंय.’ मी त्यांना म्हटलं, ‘निळूभाऊ, अहो मुद्दामच मी आज या मंडळींशी गप्पा मारल्या. उद्याचा दिवस मी फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.’ त्यावर निळूभाऊ म्हणाले, ‘पण माझं आजच पॅकअप होणार आहे. उद्यापासून मी सिनेमाच्या शूटिंगसाठी महिनाभर कोल्हापुरात आहे. नाटकाचा दौरा आटपूनच मी डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत मुंबईत परतणार आहे. मला मुद्दाम एक महत्त्वाची मुलाखत द्यायचीय. मराठी चित्रपटात ते ठरीव ठशाचे पाटील आणि भ्रष्ट पुढारी करून मी जाम कंटाळलोय. मी या चाकोरीत घुमणाऱ्या भूमिकांनाच रामराम ठोकणार आहे.’
मग मी त्यांना म्हणालो, ‘मी रमेश देवबरोबर आता जात नाही. आपण ही मुलाखत आजच करू..’ त्यावर निळूभाऊ म्हणाले, ‘घाई करू नका. मी महिनाभर या विषयावर कुठल्याही फिल्म पत्रकाराशी बोलणार नाही. डिसेंबरच्या पंधरा-सोळा तारखेला मी डबिंगसाठी बी. आर. साऊंड सव्‍‌र्हिसेसमध्ये येणार आहे, तिथे मला फोन करा. मग आपण निवांतपणे या विषयावर बोलू. पण लक्षात ठेवा, मुलाखत तुम्हीच घेणार आहात.’
महिनाभर माझ्या मनात एकच विचार धुमाकूळ घालत होता. निळूभाऊ या विषयावर कुठे बोलणार तर नाहीत ना.. माझ्यावरच्या विश्वासामुळे निळूभाऊंनी खरोखरच ती ग्लॅमरस मुलाखत माझ्यासाठी राखून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे मी त्यांना फोन केला आणि निळूभाऊ त्यांच्या टिपिकल आवाजात म्हणाले, ‘शेवडे, उद्या सकाळी दहा वाजता राम निवासवर या.’
राम निवासच्या दुसऱ्या मजल्यावरील एका छोटय़ाशा खोलीत कॉटवर बसून निळूभाऊ माझी मोठय़ा आतुरतेने वाट पाहत होते. मी वेळ घालवला नाही. दोन-अडीच तास त्यांच्याशी सखोल चर्चा केली. निळूभाऊ काळजापासून बोलत होते. झपाटल्याप्रमाणे मीही ती मुलाखत दमदारपणे लिहिली आणि ‘चित्रानंद’ साप्ताहिकाच्या ३१ डिसेंबर १९७८ च्या अंकात ती ‘कव्हर स्टोरी’ म्हणून झळकली. इसाक मुजावर यांनी ती छान ले-आऊटसह प्रसिद्ध केली होती. मराठी चित्रपट व्यवसायात आणि महाराष्ट्रात या मुलाखतीने विलक्षण खळबळ माजवली. निळूभाऊंनी मला दिलेला शब्द पाळला होता! त्यांना दाद द्यावी तेवढी थोडीच.
अर्थात, निळूभाऊंचे चित्रपट संन्यासाचे हे प्रकरण जेमतेम पाच-सहा महिनेच टिकले. निर्माता-दिग्दर्शकांनी त्यांचा हा ‘रामराम’ स्वीकारला नाही. प्रेक्षकांनादेखील रुपेरी पडद्यावर अगदी त्याच त्याच भूमिकेतसुद्धा निळूभाऊच हवे होते त्याला कोण काय करणार? त्यानंतर निळूभाऊ जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा म्हणायचे, ‘तुमच्याशी मी एवढे भावनेने बोललो, पण सगळ्यांनी कट करून माझा निर्धार हाणूनच पाडला!’ मी त्यांना हसत म्हणे, ‘निळूभाऊ, तुमच्यातल्या कलाकाराचा हा विजय आहे. त्याला मात्र माझा आणि महाराष्ट्राचा सलाम!’
अशोक शेवडे, मुंबई