Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

विधानसभा निवडणुकीपूर्वी जकातीचा प्रश्न मार्गी लावणार
राहुल गांधी यांचे दिल्लीत आश्वासन
सांगली, २४ जुलै / प्रतिनिधी
मुख्यमंत्री अशोक चव्हाण व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करून विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्यातील जकातीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे युवा नेते व महासचिव राहुल गांधी यांनी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिल्ली येथे ‘दहा जनपथ’ या निवासस्थानी दिले.
महाराष्ट्र सोडला, तर देशात कोठेच जकात नाही. महाराष्ट्रातील जकात रद्द करावी, या मागणीसाठी गेली चार वर्षे व्यापाऱ्यांनी प्रचंड आंदोलन उभे केले आहे.

शेट्टी-मंडलिक-महाडिक गटांत काटेंच्या उमेदवारीने संभ्रम
कोल्हापूर, २४ जुलै / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या येथे झालेल्या मेळाव्यात भगवान काटे यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे खासदार राजू शेट्टी, खासदार सदाशिवराव मंडलिक व आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संभाव्य आघाडीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. याच मतदारसंघातून महाडिक गटाचे धनंजय महाडिक यांनी उमेदवारी जाहीर करून प्रचारालाही सुरुवात केली आहे.

डॉ. द. ता. भोसले व बाबा आढाव डॉ. फडकुले पुरस्काराचे मानकरी
सोलापूर, २४ जुलै/प्रतिनिधी

दिवंगत ख्यातनाम साहित्यिक आणि ओजस्वी वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान, संभाजीराव शिंदे विद्यामंदिर व सुशील रसिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा साहित्यसेवा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांना आणि समाजसेवा पुरस्कार ज्येष्ठ माथाडी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना जाहीर झाला आहे.

यशस्वी आंदोलनानंतर शिराळ्यात नागपंचमीवरील र्निबध शिथिल
सांगली, २४ जुलै / प्रतिनिधी

शेकडो वर्षाची धार्मिक परंपरा जपण्यासाठी केलेल्या यशस्वी आंदोलनानंतर शिराळ्याची नागपंचमी रविवार दि. २६ जुलै रोजी मोठय़ा उत्साहात व धार्मिकतेने साजरी होत आहे. राज्य समितीच्या काही अंशी या उत्सवाला दिलासा देणाऱ्या सूचना व कायद्याचे पालन करण्याचा येथील नागमंडळांचा निश्चय आहे. नाग पकडण्यावर निर्बंध आल्यावर शिराळ्याच्या इतिहासात निषेध म्हणून आठवडाभर शिराळा बंद ठेवण्यात आले होते. सर्व व्यवहार ठप्प होते. राज्य शासनाने हे निर्बंध सध्या तरी उठविल्यामुळे नागमंडळात उत्साह आहे.

जुगार अड्डय़ावरील छाप्यात ११ लाखांचा ऐवज हस्तगत
सोलापूर, २४ जुलै/प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपजवळ वांगी तांडय़ावर एका बंद घरात राजरोसपणे चालणाऱ्या एका जुगार अड्डय़ावर पोलिसांनी धाड टाकून ३५ जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून ११ लाख ४५ हजार ३२५ रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. मात्र या जुगार अड्डय़ाच्या मालकासह काहीजण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

खतटंचाईप्रश्नी ‘जनसुराज्य’चे कपडे फाड आंदोलन
कोल्हापूर, २४ जुलै / प्रतिनिधी

जिल्हास्तरावर खतांचा पुरवठा कोणत्या पद्धतीने करण्यात आला याची माहिती शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी आज जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आर.सी.एफ.च्या येथील क्षेत्रीय कार्यालयात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी शाहुपुरी पोलिसांनी जनसुराज्य शक्तीच्या अध्यक्षांसह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. जनसुराज्य शक्तीच्या वतीने खते आणि बियाण्यांच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे.

कोल्हापुरात महिलेचा लेप्टोस्पायरेसिसने मृत्यू
कोल्हापूर, २४ जुलै/प्रतिनिधी

येथील मंगला सुधाकर जोशी (वय ५२, रा.कपिलतीर्थ मार्केट परिसर) यांचा आज येथील एका खासगी रुग्णालयात लेप्टोस्पायरेसिसने मृत्यू झाला. यंदाच्या पावसाळ्यात लेप्टोस्पायरेसिसच्या विषाणूमुळे एका महिलेचे निधन झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. २००५ सालच्या महापुराच्या पाण्यात लेप्टोस्पायरेसिसचे विषाणू पसरल्यामुळे शुक्रवार पेठेतील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचले आणि या पाण्यात जनावरांचे मलमूत्र मिसळले की, त्यातून लेप्टोस्पायरेसिसचे विषाणू तयार होतात. अशा साचलेल्या मलमूत्रयुक्त पाण्याशी एखाद्याच्या शरीरावरील जखमेशी संपर्क आला तर अशा पद्धतीचे विषाणू संबंधिताच्या शरीरात झपाटय़ाने पसरतात. वेळीच निदान होऊन उपचार झाले नाहीत तर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. मंगला जोशी यांना तीन-चार दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना लेप्टोस्पायरेसिस झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले.

यशवंत बँकेचा परवाना रद्द
मिरज, २४ जुलै / वार्ताहर
मिरज शहरातील पददलितांना पत मिळवून देणाऱ्या यशवंत सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी रद्द केला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या बँकेवर आर्थिक निर्बंध घालूनही परिस्थिती आटोक्यात आली नसल्याने आता रिझव्‍‌र्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केला आहे.
यशवंत सहकारी पतसंस्था म्हणून स्थापन झालेल्या या वित्तीय संस्थेने गेल्या २० वर्षात बँकिंग व्यवसाय सुरू केला. शहरातील हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या बँकेकडे पाहिले जात होते. आबासाहेब शिंदे व एम. ए. नरवाडे यांनी या बँकेची स्थापना केली होती. सुमारे ११ हजार सभासद असणाऱ्या या बँकेच्या मिरज, सांगली, मालगाव व म्हैसाळ अशा चार शाखातून कार्यभार चालत होता. बँकेची पंचवार्षिक निवडणूक दोन महिन्यांपूर्वीच झाली असून दीपक शिंदे- म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. नूतन संचालक मंडळाची केवळ एकच बैठक झाली असून तोपर्यंत बँकेला टाळे लागले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने दि. २ फेब्रुवारी रोजी यशवंत बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत या बँकेचा आर्थिक डोलारा सावरता आला नाही. बँकेत व्यवस्थापकासह ४५ कर्मचारी असून १४ कोटी रूपयांच्या ठेवी आहेत.

तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेस फौजदाराची मारहाण
सोलापूर, २४ जुलै / प्रतिनिधी

पतीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका गरीब महिलेची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी उलट तिला व तिच्या सोबत आलेल्या दोघा जणांना मोहोळ पोलीस ठाण्यातील फौजदार एम. बी. शिसाळ यांनी चामडी पट्टय़ाने बेदम मारहाण केल्याची तक्रार समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील वंदना रफिक पवार (वय ३०) ही महिला आपला पती रफिक याच्या विरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल करण्यासाठी मोहोळ पोलीस ठाण्यात काल गुरुवारी रात्री आली होती. त्या वेळी पोलीस ठाणतील फौजदार शिसाळ यांनी तिची तक्रार ऐकून न घेता उलट तिलाच चामडी पट्टय़ाने बेदम मारहाण केली. तसेच तिच्या समवेत आलेल्या बापू तुकाराम मोहिते (वय ३५) व तुकाराम मोहिते (वय ५५) या बाप-लेकासही त्यांनी मारहाण करून हुसकावून लावले, असे नंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल झालेल्या वंदना पवार हिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पी. आर. पाटील यांच्याकडे चौकशी सुपूर्द केली आहे.

बिरनाळे फार्मसी कॉलेजच्या दोघांना संशोधन अनुदान
सांगली, २४ जुलै / प्रतिनिधी
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रश्नध्यापिका डॉ. निलोफर नाईकवाडे व सह प्रश्नध्यापिका श्रीमती पद्मा लड्डा यांना केंद्र शासनाच्या नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून अनुक्रमे आठ व नऊ लाख रुपयांचे संशोधन अनुदान प्रश्नप्त झाले आहे.डॉ. निलोफर नाईकवाडे यांनी ‘ब्रेन टार्गेटिंग इफिशियन्सी ऑफ एल डोपा फ्रॉम नेझल म्युकोअॅडेझीव्ह मायक्रोइमल्शन्स’ या विषयावरील संशोधन प्रकल्प सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पात पार्किन्सन्स या रोगामुळे व्याधिग्रस्त रुग्णांना मेंदूद्वारे कमीप्रमाणात औषध देता येईल का व एल डोपा या औषधाचे शरीरावरील इतर दुष्पपरिणाम कमी करता येईल का, हा या संशोधनाचा विषय होता.श्रीमती पद्मा लड्डा यांच्या ‘काही नैसर्गिक वनस्पतिजन्य औषधांचा क्षयरोगावरील इलाजासाठी उपयोग’ या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे क्षयरोगावरील संशोधनासाठी महाविद्यालयात काही महागडी चाचणी इक्विपमेंट खरेदी होऊन बाजारात क्षयरोगावरील औषधांच्या कार्यक्षमतेवरही संशोधन करता येईल. या त्यांच्या संशोधन कार्यास संस्थेचे अध्यक्ष बबनराव बिरनाळे व प्रश्नचार्य डी. डी. चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले

पुणे-सोलापूर ३०० किमी स्केटिंगचा विक्रम करणार
सोलापूरचा १७ वर्षाचा युवक
सोलापूर, २४ जुलै / प्रतिनिधी
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी पुणे ते सोलापूर ३०० किलोमीटर अंतराचे स्केटिंग करण्याचा निर्धार सोलापूरच्या सैफन जब्बार बागवान या किशोरवयीन मुलाने केला आहे. ३ ऑगस्ट रोजी हा विक्रम करण्याचा त्याचा मनोदय आहे. सैफन बागवान हा १७ वर्षाचा असून मुरारजी पेठेतील जुना हिरज नाका येथील मनोहरनगर झोपडपट्टीत राहतो. तो शरदच्चंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. त्याचे वडील रिक्षा चालक आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीतून इंडियन रोलर स्केटिंग क्लबच्या माध्यमातून सैफन याने हा ३०० किलोमीटर स्केटिंग करण्याचा विक्रम येत्या ३ ऑगस्ट रोजी नोंदविणार आहे. पाऊस आल्यास ३ ते १२ ऑगस्टच्या दरम्यान स्केटिंग करण्यात येणार असून त्यासाठी स्केटिंगप्रेमींनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन क्लबचे अध्यक्ष दीपक घंटे (९८९०६०४५०३) यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिक संघाचा सांगलीत वर्धापनदिन
सांगली, २४ जुलै/प्रतिनिधी
वसंतदादा मार्केट यार्डासमोरील हुतात्मा स्मारकात येथील श्री सद्गुरू ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.सांगली शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक भ. रा. नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून बळवंत जोशी, उपाध्यक्ष डॉ. दिगंबर कुलकर्णी, कार्यवाह मोहन लेले, तर कोषाध्यक्ष म्हणून विठ्ठल क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. या वेळी सुधीर देशपांडे, सुरेंद्र कांते, दत्तात्रय कुलकर्णी, पांडुरंग खोकडे, सुमती क्षीरसागर आदी उपस्थित होते.

पाटण तालुक्यातील आठ घरांची पडझड; पावसाचा जोर कायम
कराड, २४ जुलै/वार्ताहर
कराड व पाटण तालुक्यांत पावसाचा जोर कायम असून, संततधार पावसामुळे पाटण तालुक्यातील सहा गावांतील आठ घरांची पडझड झाली आहे. या पावसामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेतीच्या कामाला गती आली आहे.पाटण तालुक्यातील पळशी, गोकुळतर्फे हेळवाक, काढणे, कोरविळे, गारवडे या पाच गावांतील प्रत्येकी एक, तर बहुले येथील तीन अशा आठ घरांची पडझड झाल्याचे पाटण तहसील कार्यालयाने सांगितले. आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत पाटण येथे ३०, एकूण ७३० मि.मी., तर कराड येथे ६, एकूण २८४.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कृष्णा-कोयना नद्यांची पाणी पातळी स्थिर असून, कराडच्या कोयना पुलाजवळ पाणी पातळी २५ फूट, तर कृष्णा पुलाजवळ पाणी पातळी १८ फूट इतकी राहताना या पाण्याचा विसर्ग ३४ हजार ६५५ क्युसेक्स होता.

विद्यार्थिनीचा सत्कार
सांगली, २४ जुलै / प्रतिनिधी
श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयात सन २००९-२०१० या शासनमान्यताप्रश्नप्त बी. सी. ए. प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रथम प्रवेश घेतलेल्या योगिता भुईटे या विद्यार्थिनीचा महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. बी. एस. बाबर यांनी सत्कार केला.बी. सी. ए. साठी प्रथम प्रवेश घेणाऱ्या ५० विद्यार्थिनींना मातृसंस्था श्री गुजराती सेवा समाज संस्थेच्या वतीने खास शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.