Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

धुमाकूळ न घालताच ओसरली भरती आणि भीतीसुद्धा!
मुंबई, २४ जुलै / खास प्रतिनिधी

मुंबईत कोणताही धुमाकूळ न घालता आजची ‘उच्चांकी’ भरती संपली, त्याबरोबरच लोकांमधील ‘काहीतरी अघटित घडण्याची’ धास्तीसुद्धा ओसरली. बृहन्मुंबई महापालिकेचा ‘अतिसावध’ पवित्रा आणि काही वृत्तवाहिन्यांनी निर्माण केलेली घबराट या पाश्र्वभूमीवर आजचा दिवस सामान्यच गेल्याने महापालिकेसह सर्वच यंत्रणांनी सुस्कारा सोडला. हजारोंच्या संख्येने नागरिक किनाऱ्यांवर जमल्याने त्यांच्याच उत्साहाची भरती आल्याचे चित्र आज मुंबईत होते. पावसानेही पूर्णपणे विश्रांती घेऊन परिस्थिती सामान्य राखण्यात मोठा हातभार लावला. मुंबईत आज ‘उच्चांकी’ भरती होणार असल्याचे महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले होते. भरतीची आजची उंची ५.०५ मीटर इतकी असणार होती. कालच ५.०१ मीटरच्या भरतीच्या पाठोपाठ ही भरती येणार असल्याने शहरातील सर्वच यंत्रणा सज्ज होत्या. पालिकेतर्फे दोन महिन्यांपासूनच या भरतीबाबत वातावरणनिर्मिती केली जात होती. त्यामुळे आज काहीतरी अघटित घडण्याची भीती अनेकांच्या मनात होती. त्यातच काही वाहिन्यांनी उलटसुलट व घबराट पसरविणारी वृत्त देऊन त्यात भर टाकली.

प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे आज वितरण
मुंबई, २४ जुलै/ व्यापार प्रतिनिधी

जागतिक वित्तीय अरिष्टापासून भारताचे वित्तीय सेवा क्षेत्र आणि विशेषत: बँकिंग क्षेत्र तुलनेने अलिप्त राहिले असले तरी विद्यमान घडामोडींनी भविष्यासाठी निश्चित काही वस्तुपाठ घालून दिले आहेत. अशा संकटसमयीच व्यावसायिक निपुणता आणि कर्तबगारीचा कस लागतो. बँकिंग क्षेत्रातील हीच निपुणता आणि कस यांचा सन्मान सोहळा ‘एफई- इंडियाज् बेस्ट बँक्स अ‍ॅवॉर्ड्स’, शनिवारी सायंकाळी ६ वाजता हॉटेल ताज महल पॅलेस, कुलाबा येथे योजण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत.
जर भारताने १० टक्के आर्थिक विकास दराचे लक्ष्य गाठायचे झाल्यास, बँकिंग क्षेत्राने त्यापेक्षा दुप्पट अथवा तिपटीने प्रगतीचा दर कायम राखणे आवश्यक ठरेल, असे आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष के. व्ही. कामत यांचे प्रतिपादन आहे.

याच कसाबने साळसकरांवर गोळ्या झाडल्या..
कोर्टात अरुण जाधवची साक्ष ’ अभियोगपक्षही अडचणीत
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

याच अजमल कसाबने हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांच्यावर गोळ्या झाडल्या.. त्यांना पोलिसांच्या क्वालीसमधून खाली फेकून दिले.. फेकून देताना त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या घातल्या.. आणि मग त्यांच्याच क्वालीसमधून साथीदारासह पळून गेला.. अशी खळबळजनक साक्ष चकमकफेम विजय साळसकर यांच्या पथकातील पोलीस हवालदार अरूण जाधव यांनी आज दिल्यामुळे कसाब खटल्याला अनपेक्षित वळण लागले. तीन अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा अंगावर काटा उभा करणारा प्रसंग कथन करताना भावनाविवश झालेल्या जाधव यांनी क्वालीसमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याचे कसाबने जर नाकारले तर बघतोच त्याला, असा दम देत भर न्यायालयात त्याला सणसणीत शिवीही हासडली.

काँग्रेसचे लक्ष्य १०० जागांचे !
मुंबई, २४ जुलै / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या चांगल्या यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १००च्या आसपास आमदार निवडून यावेत, असा काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील नेत्यांना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेता काँग्रेस पक्षाने ८१ मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षाची ताकद वाढली पाहिजे, अशी पक्षाच्या नेत्यांची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत पक्षात दोन प्रवाह असले तरी आघाडी कायम राहावी, असाच दिल्लीतील सूर आहे. गेल्या वेळी आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला १५७ तर राष्ट्रवादीला १२१ जागा आल्या होत्या. पाच ते दहा जागा पुढे-मागे होऊ शकतात. पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या आढाव्यात ९० ते १०० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतून जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात, असा पक्षाचा प्रयत्न आहे.

टॅक्सी भाडे १ रुपयाने वाढले
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

येत्या एक ऑगस्टपासून मुंबईकरांना टॅक्सीच्या किमान भाडय़ापोटी १४ रुपये मोजावे लागणार आहेत. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने टॅक्सीचालकांनी संपाचा इशारा दिला होता. या पाश्र्वभूमीवर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत पहिल्या १.६ किलोमीटरसाठी तेरा ऐवजी १४ रुपये तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरमागे सध्याच्या आठ रुपयांऐवजी नऊ रुपये, अशी वाढ राज्य शासनाने मान्य केली. सीएनजीच्या किमतीमध्ये १८ ऑगस्टपासून प्रती किलो २.९४ रुपये वाढ झाली होती. त्यामुळे टॅक्सीचालकांना दिवसाकाठी ५० ते ६० रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत असल्याचे टॅक्सीमेन्स युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.या पाश्र्वभूमीवर आज मंत्रालयामध्ये परिवहन सचिव संगीतराव, परिवहन आयुक्त दिपक कपूर यांच्यासोबत क्वाड्रोस व इतर टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत भाडेवाढ मान्य करण्यात आली.

 

प्रत्येक शुक्रवारी