Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

धुमाकूळ न घालताच ओसरली भरती आणि भीतीसुद्धा!
मुंबई, २४ जुलै / खास प्रतिनिधी

मुंबईत कोणताही धुमाकूळ न घालता आजची ‘उच्चांकी’ भरती संपली, त्याबरोबरच लोकांमधील ‘काहीतरी अघटित घडण्याची’ धास्तीसुद्धा ओसरली. बृहन्मुंबई महापालिकेचा ‘अतिसावध’ पवित्रा आणि काही वृत्तवाहिन्यांनी निर्माण केलेली घबराट या पाश्र्वभूमीवर आजचा दिवस सामान्यच गेल्याने महापालिकेसह सर्वच यंत्रणांनी सुस्कारा सोडला. हजारोंच्या संख्येने नागरिक किनाऱ्यांवर

 

जमल्याने त्यांच्याच उत्साहाची भरती आल्याचे चित्र आज मुंबईत होते. पावसानेही पूर्णपणे विश्रांती घेऊन परिस्थिती सामान्य राखण्यात मोठा हातभार लावला. मुंबईत आज ‘उच्चांकी’ भरती होणार असल्याचे महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले होते. भरतीची आजची उंची ५.०५ मीटर इतकी असणार होती. कालच ५.०१ मीटरच्या भरतीच्या पाठोपाठ ही भरती येणार असल्याने शहरातील सर्वच यंत्रणा सज्ज होत्या. पालिकेतर्फे दोन महिन्यांपासूनच या भरतीबाबत वातावरणनिर्मिती केली जात होती. त्यामुळे आज काहीतरी अघटित घडण्याची भीती अनेकांच्या मनात होती. त्यातच काही वाहिन्यांनी उलटसुलट व घबराट पसरविणारी वृत्त देऊन त्यात भर टाकली. त्याचा परिणाम म्हणून अनेक कार्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहण्यास सांगितले होते. काहींनी तर कार्यालयांजवळच्या हॉटेल्समध्ये त्याची राहण्याची व्यवस्था केली होती. याशिवाय काही शाळा व खासगी संस्थांनी सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे शहरात आणि (वाहिन्यांमुळे) इतर ठिकाणच्या नागरिकांचेही मुंबईत काय होणार याकडे लक्ष होते. मुंबईत आज दुपारी २.०३ वाजता सर्वाधिक भरतीचा काळ होता. त्यानुसार बारा वाजल्यापासूनच समुद्र खवळलेला होता. त्याच्या मोठय़ा लाटा किनाऱ्यांवर आदळत होत्या. वरळीसारख्या किनाऱ्यालगतच्या वस्त्यांमधील रहिवाशांना काही काळासाठी इतरत्र हलविण्यात आले होते. तेथील मरकडेश्वरनगर व मद्रासीनगरसारख्या वस्त्यांमध्ये काही लाटांचे पाणी शिरले व तेथील काही कच्च्या भिंतीसुद्धा पडल्या. मात्र, कोणालाही इजा झाली नाही. किनाऱ्यांवर अतिउत्साही लोकांना आवरण्यासाठी पोलीस, अग्निशमन कर्मचारी व जीवरक्षक नेमण्यात आले होते. दोन-अडीचच्या सुमारास लाटांचा वेग वाढत गेला आणि लाटांचे पाणी किनारा ओलांडून बाहेर पडू लागले. मात्र, नंतर हळूहळू पाण्याची पातली ओसरली. मात्र, आज पावसाने पूर्णपणे सुट्टी घेतल्याने शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडलेच नाही. महापालिकेने सखल भागातून पाणी उपसण्यासाठी पंप सज्ज ठेवले होते, पण त्याचा वापर करण्याची वेळ आली नाही. मुंबईमध्ये लोकांच्या मनात धास्ती असली तरी त्यांनी आज भरती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने सर्वच किनाऱ्यांवर गर्दी केली होती. या सर्वच ठिकाणी त्यांचाच उत्साह पाहायला मिळाला. दुपारी उधाण कमी झाले तेव्हा पोलिसांनी लोकांना फार किनाऱ्यावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे आज भरतीमुळे विशेष काही न घडता भीतीचे रूपांतर उत्साहामध्ये झाल्याचे पाहायला मिळाले.