Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे आज वितरण
मुंबई, २४ जुलै/ व्यापार प्रतिनिधी

जागतिक वित्तीय अरिष्टापासून भारताचे वित्तीय सेवा क्षेत्र आणि विशेषत: बँकिंग क्षेत्र तुलनेने अलिप्त राहिले असले तरी विद्यमान घडामोडींनी भविष्यासाठी निश्चित काही वस्तुपाठ घालून दिले आहेत. अशा संकटसमयीच व्यावसायिक निपुणता आणि कर्तबगारीचा कस लागतो. बँकिंग

 

क्षेत्रातील हीच निपुणता आणि कस यांचा सन्मान सोहळा ‘एफई- इंडियाज् बेस्ट बँक्स अ‍ॅवॉर्ड्स’, शनिवारी सायंकाळी ६ वाजता हॉटेल ताज महल पॅलेस, कुलाबा येथे योजण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत.
जर भारताने १० टक्के आर्थिक विकास दराचे लक्ष्य गाठायचे झाल्यास, बँकिंग क्षेत्राने त्यापेक्षा दुप्पट अथवा तिपटीने प्रगतीचा दर कायम राखणे आवश्यक ठरेल, असे आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष के. व्ही. कामत यांचे प्रतिपादन आहे. ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’द्वारे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची या सोहळ्यातील उपस्थिती बँकिंग क्षेत्राचे हेच महत्त्व अधोरेखित करते. अर्थमंत्री केवळ पुरस्कारांचे वितरण करणार नाहीत, बँकिंग क्षेत्र आणि एकंदर उद्योगक्षेत्र व अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या मुख्य मुद्दय़ांवर आयोजित परिसंवादातही सहभागी होऊन आपले विचारही प्रगट करणार आहेत. यापूर्वी सलग दोन वर्षे याच सोहळ्यात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम हेही जातीने उपस्थित राहिले आहेत.
‘जागतिक वित्तीय अरिष्टाचे धडे : नफाक्षमता व वृद्धीची नवी आव्हाने’ या विषयावर रंगणाऱ्या परिसंवादात आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर, स्टेट बँकेचे ओ. पी. भट, एचएसबीसी समूहाच्या नैना लाल किडवई, यूबीएसच्या मनिषा गैरोत्रा, बँक ऑफ अमेरिकाचे विश्ववीर आहुजा, आयआयएफसीएलचे एस. एस. कोहल आणि डीएसपी ब्लॅकरॉकचे एस. नागनाथ असे या क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेही प्रमुख अतिथी म्हणून पुरस्कार सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवतील.
पुरस्कार मानकरी बँकांची निवड आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त सल्लागार संस्था अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग तसेच फायनान्शियल एक्स्प्रेसच्या संपादकीय चमूतून बनलेल्या निवड समितीने केली आहे.