Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

याच कसाबने साळसकरांवर गोळ्या झाडल्या..
कोर्टात अरुण जाधवची साक्ष ’ अभियोगपक्षही अडचणीत
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

याच अजमल कसाबने हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांच्यावर गोळ्या झाडल्या.. त्यांना पोलिसांच्या क्वालीसमधून खाली फेकून दिले.. फेकून देताना त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या घातल्या.. आणि मग त्यांच्याच क्वालीसमधून साथीदारासह पळून गेला.. अशी खळबळजनक साक्ष चकमकफेम विजय साळसकर यांच्या पथकातील पोलीस हवालदार अरूण

 

जाधव यांनी आज दिल्यामुळे कसाब खटल्याला अनपेक्षित वळण लागले. तीन अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा अंगावर काटा उभा करणारा प्रसंग कथन करताना भावनाविवश झालेल्या जाधव यांनी क्वालीसमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याचे कसाबने जर नाकारले तर बघतोच त्याला, असा दम देत भर न्यायालयात त्याला सणसणीत शिवीही हासडली.
कसाबने त्याच्या कबुलीनाम्यात याच गोष्टींचा इन्कार केला होता. आपण जखमी होतो आणि या पोलीस अधिकाऱ्यांना माझ्या साथीदाराने म्हणजे अबू इस्माईलने गोळ्या घातल्या होत्या, असा दावा गुन्ह्याची कबुली देताना कसाबने केला होता. त्याचमुळे नेहमी साक्षी नोंदविण्याचे काम सुरू असताना मजेत दिसणारा कसाब जाधव यांनी त्याच्यावर केलेल्या आरोपांमुळे मात्र अस्वस्थ झाला होता. कसाबप्रमाणेच जाधव यांच्या साक्षीने अभियोग पक्षालाही आज चांगलेच अडचणीत आणले. कसाब आणि इस्माईलने विधानभवन परिसरातून चोरलेल्या स्कोडा गाडीशी संबंधित संपूर्ण घटना अरुण जाधव यांच्या पोलीस जबाबात नोंदविण्यातच आलेली नसल्याचे उलटतपासणीदरम्यान उघड झाल्यावर खुद्द विशेष न्यायालयाचे न्या. एम. एल. टहलियानी यांनी त्याची दखल घेतली व त्याबाबत अभियोग पक्षाकडे विचारणा केली. मात्र त्याबाबत समाधानकारक उत्तर अभियोग पक्षाच्या वकिलांकडून न मिळाल्याने न्यायालयाने पोलिसांच्या ढिसाळ कामाबद्दल कठोर शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केली.
अरूण जाधव यांच्या साक्षीकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले होते. जाधव यांची आज साक्ष नोंदविण्यात आली. मात्र त्यांच्या सरतपासणीपेक्षा त्यांची उलटतपासणीच अधिक खळबळजनक ठरली. २६/११च्या रात्री करकरे, कामटे आणि साळसकर यांच्यासोबत नेमके काय घडले याबद्दलच्या आतापर्यंत पुढे न आलेल्या सर्व खळबळजनक गोष्टींचा खुलासा जाधव यांनी उलटतपासणीत केला.
उलटतपासणीत कसाबच्या वकिलांनी जेव्हा जाधवांवर खोटी साक्ष देत असल्याचा आरोप केला. त्या वेळी त्यांनी माझ्या अधिकाऱ्यांना कसाबने मारले, मी स्वत: जखमी झालो. त्या गोळ्यांच्या आवाजाने आजही मला झोप येत नाही, असा आक्रोश केला. तसेच दहशतवाद्यांनी आमच्या गाडीवर गोळीबार केला त्यावेळी मी त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला असता तर दोघेही तिथेच ठार झाले असते, असे सांगत कसाबला शिवी हासडली.
तत्पूर्वी, सरतपासणीत जाधव म्हणाले की, २६/११च्या रात्री सीएसटी स्थानकात गोळीबार करून दहशतवादी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या गल्लीतून गेल्याचे कळल्यावर साळसकर यांच्यासोबत ते कामा रुग्णालयाच्या मागच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. तेथे करकरे आणि कामटे हे दोघेही त्यांच्या पथकासह आधीच दाखल झाले होते.
अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या जखमी अवस्थेतील ‘वायरलेस ऑपरेटर’ने रुग्णालयातील परिस्थिती सांगितल्यावर करकरेंनी कामटे आणि साळसकर यांच्यासह रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाऊन दहशतवाद्यांना घेरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते पोलिसांच्या क्वालीस गाडीतून रंगभवनच्या दिशेने गेले. त्यांच्यासोबत गाडीत मी आणि अन्य तीन पोलीस होते. रंगभवनच्या दिशेने जात असतानाच ‘रंगभवन येथे एका लाल गाडीच्या मागील झुडपांमध्ये दोन दहशतवादी लपून बसल्याचा संदेश मुख्य नियंत्रण कक्षातून मिळाला’, असे जाधव यांनी सांगितले. गाडी रंगभवनजवळ पोहोचली असतानाच गाडीवर अंदाधुंद गोळीबार होऊ लागला. तीन अधिकारी आणि मी दहशतवाद्यांवर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात कसाबच्या हातातील बंदूक खाली पडली. मात्र आम्हीही सर्वजण त्यांच्या गोळीबारात जखमी झालो. त्यानंतर त्यांनी करकरे, कामटे, साळसकर यांना गाडीतून फेकून दिले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गाडी मेट्रो जंक्शनमार्गे विधानभवनाकडे नेली. तेथे ती बंद पडल्याने त्यांनी समोरून येणारी ‘होंडासिटी’सारखी गाडी थांबवली आणि त्यातून पळ काढला.