Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसचे लक्ष्य १०० जागांचे !
मुंबई, २४ जुलै / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या चांगल्या यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १००च्या आसपास आमदार निवडून यावेत, असा काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील नेत्यांना केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. विधानसभा

 

मतदारसंघनिहाय आढावा घेता काँग्रेस पक्षाने ८१ मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षाची ताकद वाढली पाहिजे, अशी पक्षाच्या नेत्यांची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत पक्षात दोन प्रवाह असले तरी आघाडी कायम राहावी, असाच दिल्लीतील सूर आहे. गेल्या वेळी आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला १५७ तर राष्ट्रवादीला १२१ जागा आल्या होत्या. पाच ते दहा जागा पुढे-मागे होऊ शकतात. पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या आढाव्यात ९० ते १०० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतून जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात, असा पक्षाचा प्रयत्न आहे. कारण
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला मुंबईत १०० टक्के यश मिळाले होते. मुंबईतील ३६ पैकी २५ जागा निवडून याव्यात, असा पक्षाचा प्रयत्न राहणार आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाडय़ातून जास्त जागा निवडून येण्यावर भर देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा पूर्वीसारखा बालेकिल्ला राहिलेला नसल्याने तेथून चांगल्या संख्येने आमदार निवडून येतील, असा पक्षाच्या नेत्यांना विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाडय़ात मर्यादित यश वगळता सर्वत्र चांगले यश मिळाले होते.
लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगले यश मिळाले असले तरी महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये अजिबात एकवाक्यता नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो, याचा अंदाज केंद्रीय नेतेमंडळींना आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीमध्ये राहुल गांधी यांनी लक्ष घातले आहे. मध्यंतरी अहमद पटेल यांनीही राज्यातील काही नेत्यांना बोलावून घेतले होते. राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता दिग्विजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. एकूण दिल्लाचा रोख बघूनच विलासराव देशमुख व नारायण राणे या पक्षातील कट्टर शत्रूंमध्ये कालच भेट झाली. या दोन नेत्यांमधील कोंडी फोडण्याकरिता माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांनी पुढाकार घेतला होता. विधानसभा निवडणुकीची सारी जबाबदारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे या नेत्यांवर संयुक्तपणे टाकण्यात येणार आहे. विलासराव आणि राणे हे पक्षाचे स्टार प्रचारक असतील. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सामना करण्याकरिता विलासराव आणि राणे हेच उपयोगी ठरू शकतात, याची पुरेपूर जाणिव केंद्रीय नेत्यांना आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे मोठे आव्हान आहे. म्हणूनच कोणताही धोका पत्करण्यास ते तयार नाहीत. राज्यातील सर्व नेत्यांशी जमवून घेण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे.