Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

प्रादेशिक

बेहरामपाडय़ातील आगीचा चटका सर्वसामान्य नागरिकांना
मुंबई, २४ जुलै/खास प्रतिनिधी

वांद्रे पूर्व येथील बेहरामपाडय़ात लागलेल्या भीषण आगीनंतर स्थानिक प्रशासनाने तेथील अनंत काणेकर मार्गावरील बस व खाजगी वाहतुकच बंद केल्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची कमालीची गैरसोय होत असून ही वाहतूक तात्काळ सुरू न केल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा सेनेचे नगरसेवक बाळा सावंत यांनी दिला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधून १९ निम वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम सुरू होणार
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या साधनसामग्री व मूलभूत सुविधांचा वापर करून १९ निमवैद्यकीय म्हणजे पॅरामेडिकल पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. यामुळे वैद्यकीय क्षेत्राला आवश्यक असे कुशल तंत्रज्ञ उपलब्ध होऊन मोठा रोजगार उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

धनाढय़ांच्या ‘हेलिपॅड’ स्वप्नाला पालिकेचा लगाम!
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

गच्चीवर हेलिपॅड बांधण्याच्या धनाढय़ांच्या स्वप्नाला आज पालिका सुधार समितीने लगाम लावला. राज्य सरकारने याबाबतीत केलेल्या कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवत हा प्रस्ताव आज सुधार समितीने चर्चेसाठी घेतला नाही. त्यामुळे मुकेश अंबानी यांनी अलिशान बंगल्यावरील हेलिपॅड तयार असले तरी तूर्तास त्यांना त्याचा वापर करता येणार नाही. शहरातील उंच इमारतींच्या गच्चीवर हेलिपॅड बांधण्याची परवानगी देणारा नियम राज्य सरकारने केला आहे. यासाठी खास विकास नियंत्रण कायद्यात बदल करण्यात आले आहेत.

नितेश राणे समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या कार्यकारिणीत बदल करण्यात आले असून नितेश राणे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सरमळकर यांनी सांगितले की, संघटनेचा विस्तार राज्यभर व्हावा यासाठी संघटनेच्या कार्यकारिणीत बदल करण्याचा निर्णय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी घेतला. संघटना विविध स्तरांवर काम करणार असून येत्या सहा महिन्यांत विविध उद्योगांतील असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. हॉटेल ओबेरॉय, भारतीय आरोग्य निधी हॉस्पिटल, कंबाटा एव्हीएशन आदी ठिकाणच्या व्यवस्थापनाशी संवाद साधून कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे प्रयत्न केले जातील, असे सरमळकर म्हणाले.

१८ हजार वृद्ध कलाकारांच्या मानधनात दुपटीने वाढ
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

राज्यातील १८ हजार वृद्ध कलाकारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून, त्याची अमलबजावणी एक एप्रिल २००९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाईल. शासनाने काल याबाबत अध्यादेश काढला आहे. महाराष्ट्रातील कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या १८ हजार कलाकारांना दिल्या जाणाऱ्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली असून, ‘अ’ वर्गातील ४०० कलाकारांना ७०० रुपये एवढे मानधन दिले जात होते ते आता १,४०० रुपये एवढे करण्यात आले आहे, तर ‘ब’ वर्गातील ४०० कलाकारांच्या ६०० रुपयांच्या मानधनात वाढ करून १,२०० रुपये तर ‘क’ वर्गातील १७,२०० कलाकारांना ५०० रुपये वाढवून १००० रुपये करण्यात आले आहे. महिला साहित्यिक, कलाकारांसाठी ४५ वर्षांची अट आहे. १९६५ पासून ही योजना राज्यात चालू आहे.

उमेश रावते यांना शिक्षा, जामिनावर सुटका
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

शिवसेना नेते दिवाकर रावते यांचा मुलगा उमेश रावते यांना वृक्ष तोड केल्याप्रकरणी २१ दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आज त्यांना उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले.
दादर येथील पुरंदरेवाडीच्या विकासाचा चार वर्षांपूर्वी वाद सुरू होता. त्यावेळी उमेश रावते यांचे स्थानिक रहिवाशांशी भांडण झाले होते. उमेश यांनी पुरंदरेवाडीतील वृक्षतोड केली होती. या प्रकरणी स्थानिक रहिवाशी गिरीश गाला यांनी कनिष्ठ न्यायालयात तक्रार केली होती. याची सुनावणी होऊन न्यायालयाने उमेश यांना दोषी ठरविले आणि २१ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाने उमेश यांना जामीन दिला नाही. मात्र आज उच्च न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

मराठी ‘बीएमएम’च्या १४ महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

मराठी ‘बीएमएम’च्या १४ महाविद्यालयांचे प्रस्ताव मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत आज मंजूर करण्यात आले असून तीन प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. मंजूर झालेले प्रस्ताव आता राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. उच्च-तंत्र शिक्षण विभागाच्या मंजुरीनंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात मराठी भाषेतील बीएमएम अभ्यासक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. मराठी बीएमएम सुरू करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने खास बाब म्हणून मान्यता दिली आहे.

सी लिंकवर अपघातात तीन जखमी
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

वरळी -वांद्रे सी िलकवर आज संध्याकाळी झालेल्या एका विचित्र अपघातात तीनजण जखमी झाले. त्यांना हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका कार चालकाने दुसऱ्या गाडीला धडक दिली. ही गाडी तिसऱ्या गाडीवर आदळली. या अपघातात तीनजण जखमी झाले. त्यांची नावे समजली नाहीत. सी िलकवरील हा पहिलाच मोठा अपघात आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नियंत्रण कक्षाला अपघाताची रात्री उशीरापर्यंत माहिती देण्यात आली नव्हती.

‘शोध शिवछत्रपतींच्या दुर्गाचा’ पुस्तकाचे आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

सतीश अक्कलकोट यांनी लिहिलेल्या ‘शोध शिवछत्रपतींच्या दुर्गाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या शनिवारी शिवसेना भवनात एका कार्यक्रमात होणार आहे. या पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी किल्ल्यांची काढलेली हवाई छायाचित्रे देण्यात आली आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या किल्ल्यांचा अभ्यास करण्यात आला असून शिवकाळात किल्ल्यांना असलेले महत्व, शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले, त्यांच्या ताब्यातील गडकिल्ले, त्यांनी बांधलेले किल्ले आदी विविध विषयांची सखोल माहिती या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडणार आहे. हा कार्यक्रम २५ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता शिवसेना भवन येथे होणार आहे.

पॉलिटेक्निकची प्रवेश प्रकिया लांबणीवर
मुंबई, २४ जुलै / प्रतिनिधी

पॉलिटेक्निक संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने अचानक घेतला आहे. ही प्रवेश प्रक्रिया कालपासून (गुरूवारी) सुरू होणार होती. नव्या वेळापत्रकानुसार आता २८ जुलैपासून विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम अर्ज सादर करता येतील. प्रवेश फेरीमध्ये नव्याने १८ महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवेश फेरी पुढे ढकलण्याचे आदेश मंत्रालयातून आले होते, असे सूत्रांनी सांगितले.