Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

बेफाम वारा, उसळणाऱ्या लाटा आणि जन‘सागर’!
खास प्रतिनिधी

वरळीच्या ‘सी फेस’वर रोजच भरती पाहायला मिळते आणि अनुभवायलासुद्धा! उधाण तसेच आले होते, लाटा त्याच होत्या, वारासुद्धा बेफाम सुटला होता, पण आजचे वेगळेपण म्हणजे ही भरती पाहण्यासाठी सी-फेसवर जन‘सागर’ लोटला होता आणि लाटांचा हा थरार अनुभवत प्रत्येकजण त्यात रोजच्या भरतीपेक्षा वेगळेपण शोधत होता! बृहन्मुंबई महापालिका आणि माध्यमांनी निर्माण केलेल्या वातावरणामुळे आजची भरती पाहण्यासाठी मुंबईकरांनी सर्वच किनाऱ्यांवरमोठी गर्दी केली होती.

‘दिल्ली मेट्रो’ मुळे हादरली ‘मुंबई मेट्रो’
विकास महाडिक

‘दिल्ली मेट्रो’च्या बांधकामात होणाऱ्या अपघातांची मालिका थांबत नसल्याने ‘मुंबई मेट्रो’चे बांधकाम करणारी यंत्रणा चांगलीच हादरली आहे. ‘मेट्रो’शी संबधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक अलीकडेच घेण्यात आली. दिल्लीनंतर मुंबईतही छोटासा अपघात झाल्याने वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचे पुन्हा नव्याने सुरक्षाविषयक परीक्षण (सेप्टी ऑडिट) करण्याचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत.

‘एनबीटी’चे फिरत्या चाकांवरती पुस्तकांचे दुकान!
प्रतिनिधी

दूरचित्रवाहिन्या आणि इंटरनेटच्या आक्रमणातही वाचन संस्कृती कमी झालेली नाही. विविध मार्गाने जर वाचकांपर्यंत थेट पुस्तके पोहोचवली तर साहित्यप्रेमी आणि वाचकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. मुंबईसह महाराष्ट्रात वाचन संस्कृती वाढीस लागावी, या उद्देशाने नॅशनल बुक ट्रस्टने फिरत्या चाकांवरील पुस्तकाचे दुकान तयार केले आहे.

विमानतळावरील ‘एटीसी’ टॉवरच्या आराखडय़ास पुरस्कार
प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित हवाई नियंत्रण केंद्राच्या(एटीसी) टॉवरच्या आराखडय़ास ‘ऑटोडेस्क हाँगकाँग बिल्डिंग मॉडेलिंग अवॉर्ड २००९’ हा नामांकित पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे मुंबई विमानतळाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाचा विकास करण्याचे काम मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) कंपनीने हाती घेतले आहे.

मुंबईनगरी बडी बाका..
लंडन, न्यूयॉर्क, मास्को, हाँगकाँग, टोकियो, सिंगापूरपाठापोठ मुंबईतील जागांचे दर आहेत. मुंबईचे शांघाय राज्यकर्त्यांना करता आले नसले तरी जागांच्या किमतींमध्ये मुंबईने शांघाय, बँकॉक, बीजिंगला कितीतरी पटीने मागे टाकले आहे. मुंबईत नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा प्रति चौरस मीटर दर सरासरी पावणेपाच लाख रुपये आहे. तोच दर शांघाय, बँकॉक, बीजिंगमध्ये अनुक्रमे दीड ते एक लाख रुपये आहे. भाडय़ाने मिळणाऱ्या मालमत्तांमध्येही मुंबई शहराची आघाडी कायम आहे.

स्वातंत्र्यसैनिकाचा सन्मान मिळण्यासाठी ८६ व्या वर्षीही देशपांडे यांचा लढा सुरूच!
विवेक दिवाकर

ऐन उमेदीचा काळ गोवा मुक्तीसाठी घालविल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांसाठी देण्यात येणारे निवृत्ती वेतन राज्य शासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे मिळत नसल्याने वध्र्यातील (सध्या वास्तव्य नागपुरात) दिवाकर देशपांडे हे हताश झाले आहेत.गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्तीवेतन मंजूर होऊन १५ वर्षे झाली. त्यांच्या बरोबर काम केलेल्या बहुतेक सर्वाना केंद्र तसेच राज्य शासनातर्फे पेन्शन मिळत आहे.

न्यायाच्या बदल्यात अतोनात छळ; संजय पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा
प्रतिनिधी

कुटुंबियांवर होत असलेल्या अन्यायाबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली म्हणून आधी पोलिसांनी, नंतर मुजोर माहिती अधिकाऱ्यांनी खारघर येथे राहणाऱ्या संजय पाटील यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतोनात त्रास दिला. याच कारणास्तव पाटील यांना वडील आणि भावालाही कायमचे मुकावे लागले. न्यायाच्या बदल्यात अतोनात छळ आणि निराशाच पदरी आलेल्या पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे न्यायासाठी धावा केला आहे.

डॉ. विद्या व्यंकटेशन यांची प्रतिष्ठेच्या फ्रेंच पुरस्कारासाठी निवड
प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाच्या फ्रेंच विभागाच्या प्रमुख डॉ. विद्या व्यंकटेशन यांची फ्रान्सच्या पंतप्रधानांनी ‘चेविलियर दे एल ऑर्डर देज पाल्म्स अ‍ॅकॅडमिक (नाईट ऑफ दी ऑर्डर ऑफ अ‍ॅकॅडमिक पाल्म्स) या प्रतिष्ठेच्या फ्रेंच पुरस्कारासाठी निवड केली आहे.हा वैशिष्टय़पूर्ण पुरस्कार १८०८ मध्ये नेपोलीयन बानोपार्ट यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. डॉ. विद्या व्यंकटेशन यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांनी ज्ञान, विज्ञान व कला क्षेत्रात फ्रान्सने केलेल्या प्रगतीबद्दल जगाला ज्ञान करून देण्याचे कार्य केले आहे. त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. व्यंकटेशन यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून फ्रेंच साहित्यात पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठात प्रश्नवीण्य (मास्टर डिग्री) मिळविले. त्यानंतर त्यांनी मध्ययुगीन फ्रेंच साहित्य या विषयात पॅरिस येथील सोरबोन विद्यापीठात एम.फिल पूर्ण केले. सोरबोन विद्यापीठाने ‘वाल्मिकी रामायणा’मधील सैनिकी साहचर्य आणि ‘ला सायकल दे गिलाग्ने दी ओरंज’ या ग्रंथावर लिहिलेल्या तुलनात्मक प्रबंधाला सोरबोन विद्यापीठाने डिस्टिंक्शन दिले. त्यांनी फ्रान्स व भारतात अनेक नावाजलेल्या शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळविल्या असून जागतिक परिषदांमध्ये भाषणे केली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १३ शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत.

‘मी शिवाजीराजे भोसले..’मधील कलावंतांचा सत्कार
प्रतिनिधी
सेंट अ‍ॅन्जेलोज् कॉम्प्युटर्स एज्युकेशन व सनशाईन हाऊसिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने उद्या, २६ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातील सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर तसेच महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सुचित्रा बांदेकर, प्रिया बापट आदी सर्व कलावंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, चित्रपटाचा विशेष खेळही दाखविण्यात येणार आहे.

विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे
प्रतिनिधी : मराठी बाणा प्रतिष्ठान, हेल्प एज इंडिया आणि डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात ठिकठिकाणी विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. रविवार २६ जुलै रोजी शिवसेना आनंदनगर शाखा-कोपरी, रविवार २ ऑगस्ट रोजी हनुमानगर बस डेपोजवळ, वागळे इस्टेट येथे दुपारी दोन ते तीन या वेळेत ही शिबिरे घेण्यात येतील. संपर्क : ९८३३९९९८८६.

दिनेशचंद्र कर्णिक यांचे निधन
प्रतिनिधी : हौशी रंगभूमीवरील जुन्या जमान्यातील कलावंत दिनेशचंद्र वामराव कर्णिक यांचे वृद्धापकाळामुळे डोंबिवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र, कन्या, नातवंडे, भाऊ आणि बहिणी आहेत. इंग्रजीचे अध्यापक असलेले कर्णिक हे लेखक, कवी आणि ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची आग्य्राहून सुटका या नाटकातील औरंगजेबाची भूमिका विशेष गाजली होती.